Sign In New user? Start here.

* यंत्र, तंत्र, मंत्र *

 

* यंत्र, तंत्र, मंत्र *

 

प्रभात फिल्म कंपनीचा पहिला बोलपट करायचा ठरला तेव्हा संगीतकार गोविंदराव टेंबे यांनी माझे आजोबा, शंकरराव बिनीवाले यांना या चित्रपटासाठी व्हायोलिन वाजवण्याकरता बोलावून घेतले. त्यानंतर माझ्या आजोबांनी व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, मा.विनायक यांच्या अनेक चित्रपटांमधून व्हायोलीनवादन केलं. १९३१-३२ सालचा तो काळ होता. मूकपटांचा कालखंड संपून चित्रपट आता बोलपटाच्या कालखंडात प्रवेश करत होते. तंत्राने एक प्रचंड झेप घेतली होती. गोविंदराव टेंबे यांनीच राजा हरिशचंद्राची प्रमुख भूमिका वठवली. प्लेबॅकचं तंत्र तेव्हा विकसित झालं नव्हतं, त्यामुळे नटांना गाताही आलं पाहिजे अशी अटच असायची. वादक ईन मीन तीन असायचे. एक तबला, व्हायोलीन आणि पायपेटी! नट अभिनय करता करताच (संगीतनाटकांसारखे) गाण्यात शिरायचे. संगीतनाटकामधले वादक थिएटर पिटात बसायचे तर इथे वादक नटांच्या मागे किंवा आजूबाजूला, झाडाझुडुपांमध्ये दडलेले असत.

‘सावित्री’ चित्रपटाची एक गंमत माझे आजोबा अतिशय रंगवून आम्हाला सांगत असत. तांत्रिकदृष्ट्या ‘सावित्री’ मधल्या स्पेशल इफेक्ट्सची तुलना त्या काळच्या कुठल्याही हॉलिवुड चित्रपटाशी करता येईल. पण तेव्हाही नटच चित्रपटातली गाणी म्हणायचे. चित्रपटाचं पार्श्वसंगीत सुद्धा चित्रिकरणाबरोबरच ध्वनिमुद्रित व्हायचं. ‘सावित्री’ मधल्या एका प्रसंगामध्ये यम सत्यवानाला त्याच्याबरोबर मृत्युलोकांत घेऊन जातो. आणि माझे आजोबा सांगत,

" ..आधी यम...यमामागे सत्यवान...सत्यवानामागे सावित्री...सावित्रीमागे तबला...तबल्यामागे ऑर्गन....ऑर्गनमागे व्हायोलीन !अशी ही यात्रा चित्रीकरणाच्यावेळी एकत्रच स्वर्गापर्यंत निघत असे...मग त्याचे टेक्स आणि रीटेक्स!"

आज ७५ वर्षांनी आपण एखाद्या स्टुडिओमध्ये फेरी मारली तर कदाचित पुन्हा एकदा आपल्याला ईन मीन तीन वादकच दिसतील. पण याचा अर्थ असा नाही की तंत्रविज्ञान एक वर्तूळ पूर्ण करून पुन्हा एकदा तिथे पोहचलं आहे. कारण २५ वर्षांपूर्वीच्या चित्रपटांमध्ये एखाद्या माथेफिरू वैज्ञानिकाच्या प्रयोगशाळेत जशी अत्याधुनिक यंत्र दाखवली जायची तशी यंत्र आता गल्लीबोळातल्या कुठल्याही ध्वनिमुद्रण करणा-या स्टुडिओत आढळतात! तंत्रविज्ञान जितक्या झपाट्याने बदलतंय तितक्या झपाट्याने पॅरिसमध्ये फॅशन्सही बदलत नाहीत! यंत्रांच्या आणि तंत्रविज्ञानाच्या जंजाळात आपल्यातला माणूस कधी हरवून जाईल सांगता येत नाही, अशी परिस्थिती असतांना संगीतकार म्हणून मी नेमका या जंजाळात कुठे आहे, असा विचार ब-याचदा माझ्या मनात येतो. वर्तमानाकडे येण्यापूर्वी जरा भूतकाळात संगीतामध्ये, विशेषत: चित्रपट आणि सुगमसंगीतामध्ये वापरल्या जाणा-या तंत्रज्ञानातली ढोबळ स्थित्यंतरं काय झाली त्यावर एक दृष्टीक्षेप टाकुया.

वर सांगितलेल्या ‘लाइव’ ध्वनिमुद्रणानंतरचं प्रमुख स्थित्यंतर म्हणजे प्लेबॅकचं युग. पडद्यावरच्या नटाला अथवा नटीला एक दुस-याच गायकाचा आवाज ही कल्पनाच अचाट होती! एका मोठ्या हॉलमध्ये सगळे वादक, संगीतकार, आणि गायक - गायिका एकत्र यायचे. त्या गाण्याची बराच काळ तालीम व्हायची आणि एका माइकवर सगळं ध्वनिमुद्रण करण्यात यायचं. ध्वनिमुद्रकाचं काम सगळ्या वाद्यांचा योग्य समन्वय साधून प्रत्येक वाद्याचे ध्वनिमान(व्हॉल्य़ूम) योग्य पातळीला ठेवणे आणि गायकांचा आवाज पृष्ठभागी राहील याची काळजी घेणे हा असायचा. जसजसा चित्रपटसंगीतात वाद्यमेळ वाढत गेला तसतसं ध्वनिमुद्रकाचं काम अधिक जटिल आणि आव्हानात्मक होत गेलं. संगीतकाराचा पसाराही वाढला आणि त्याला संगीत सहय्यकांची गरज भासु लागली. सुरूवातीच्या काळात गीतांचं ध्वनिमुद्रणही फिल्मवरच होत असे. मग मॅग्नेटिक टेपचा जमाना आला. एका इंचाच्या किंवा दोन इंचाच्या टेपवर गाण्यांचं धनिमुद्रण होऊ लागलं. धनिमुद्रणकक्षात यंत्रसामग्री वाढू लागली. वाद्यमेळ वाढला त्यामुळे एका माइकवर होणा-या ध्वनिमुद्रणाला आता जास्त माइक्सची गजर भासू लागली.

यापुढचं महत्वाचं स्थित्यंतर म्हणजे ‘ट्रॅक’ पद्धती. ही ध्वनिमुद्रण क्षेत्रामधली क्रांती होती. शक्यतांचं एक नवं दालन या पद्धतीने उघडं करून दिलं. सोप्या शब्दात सांगायचं तर ट्रॅक पद्धतीमध्ये एका दोन इंचाच्या टेपवर अर्ध्या अर्ध्या इंचाच्या चार किंवा पाव पाव इंचाच्या आठ रांगा आखल्या जायच्या(4 track recording अथवा 8 track recording). यात एकावेळी एका रांगेत(ट्रॅकवर) ध्वनिमुद्रण करता यायचं. परिणामी एका ट्रॅकमध्ये तालवाद्य धनिमुद्रण केली की ती तशीच ठेऊन त्यावर अन्य वाद्य रेकॉर्ड करता यायची. अर्थ असा की एकदा तालवाद्य रेकॉर्ड करून त्याच टेपवर अन्य वाद्य रेकॉर्ड केली, तर अगोदर ध्वनिमुद्रण केलेली तालवाद्य न पुसली जाता त्यावर बाकी वाद्य ध्वनिमुद्रित होऊ शकायची. लता मंगेशकर, आशा भोसले, किंवा महम्मद रफी आणि किशोर कुमार सारखे गायक खूप व्यस्त असायचे तेव्हां संगीतकार आणि वादक त्यांच्या तारखेसाठी खोळंबून राहात असत. पण या तंत्रज्ञानामुळे आता असं होऊ लागलं की, आधी वाद्यमेळ ध्वनिमुद्रित व्हायचा आणि मग गायक येऊन आपल्या सोयिस्कर असलेल्या वेळेत गाणं गाऊन जायचा.

याच सुमारास हायफाय साऊंड आणि स्टीरियो ही दोन तंत्रसुद्धा रुजू लागली. स्टिरियोमुळे दोन ध्वनिक्षेपकांचा उचित असा वापर होऊ लागला. आता बासरी डावीकडच्या ध्वनिक्षेपकामधून ऎकू येऊ लागली तर गिटार उजवीकडून ऎकू येऊ लागले. व्हायोलीन, ऎकॉर्डियन सारखी ऎकॉस्टिक पाश्चात्य वाद्य तर आपल्याकडे आलीच होती. पण आता हायफाय साऊंडच्या तंत्रज्ञानाबरोबर इलेक्ट्रिक गिटार आणि बेस गिटार सारखी इलेक्ट्रिक वाद्यही आता सर्रास वापरात येऊ लागली. संगीत सहाय्यकांचे संगीत नियोजन होऊ लागले आणि संगीत दिग्दर्शन, वाद्यमेळाचं नियोजन आणि धनिमुद्रण हे स्पेशिअलाइजेशनचे विषय होत गेले.

पण गेल्या वीस वर्षात त्याच्या आधी पन्नास वर्षात झाला नव्हता इतका बदल तंत्रज्ञानात झाला आणि संगीत आणि त्याच्या ध्वनिमुद्रणाचं विश्व पुरतं बदलून गेलं. यात दोन महत्वाचे घटक म्हणजे इलेक्ट्रॉनिक वाद्य(उदा.सिथेंसाइझर्स) आणि संगणक. इतर कुठल्याही क्षेत्राप्रमाणे संगणकाने इथेही सगळ्या कार्यपद्धतीचा कायापालट केला. मॅग्नेटिक टेपच्या बाबतीत असलेल्या सर्व मर्यादा डिजिटल ध्वनिमुद्रणाने आणि संगणकाने मोडित काढल्या आहेत. चार, आठ किंवा सोळा असेच ट्रॅक मिळायचे ते आता अमर्याद ट्रॅक मिळू लागलेत. आता फक्त चार आवर्तनं तबल्याची घेऊन तीच आवर्तनं पुढे ‘कॉपी-पेस्ट’ करून पूर्ण गाण्याला चिकटवता येऊ लागले आहेत. गायकाच्या आवाजाचा टोन तर बदलता येऊ लागलाच आहे पण बेसूर झालेल्या गायकांना सुरातही आणता येऊ लागलंय! हा सगळा बदल जसा अतिशय वेगाने झाला तसा तो अतिशय भयावहही वाटु लागला. संगीताचे काही नवीन प्रकार जसे या तंत्रज्ञानामुळे निर्माण झाले तसे काही नैतिक प्रश्नही निर्माण होत गेले. रीमिक्स सारख्या संगीतप्रकारामुळे मूळ कलाकाराच्या हक्कांच्या उल्लंघनापासून रीमिक्सच्या सौंदर्यविषयक दृष्टीकोनासंबंधीसुद्धा प्रश्न उद्भवू लागले. गायक बेसूर झाले तरी त्यांना सुरात आणता येण्याच्या तंत्रज्ञानामुळे मुळात सुरेल गायकांची नक्की किंमत काय-फक्त उत्तम आवाजाला महत्व आहे का संगीतसाधनेलाही काही किंमत आहे असे प्रश्न निर्माण होऊ लागलेत.

क्रमश:

कौशल इनामदार

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.