Sign In New user? Start here.

Example of Category Blog layout (FAQs/General category)

पळभरी तू झोप सुर्या जागलो आहोत आम्ही

sudhir mulik सुधीर मुळीक

.

 

पळभरी तू झोप सुर्या जागलो आहोत आम्ही

पळभरी तू झोप सुर्या जागलो आहोत आम्ही
क्षणभरासाठी असेना पेटलो आहोत आम्ही !..

पेटलेला देश विझला मेणबत्त्या संपल्यावर
जाणिवा आहेत जाग्या झोपलो आहोत आम्ही !..

काल रक्तानेच होता रंगला इतिहास इथला
आज षंढत्वात कुठल्या गंजलो आहोत आम्ही ?..

अर्जुनांनो बाण सोडा सोडता कबुतर कितीदा ?
सावळ्या हल्ली तुलाही विसरलो आहोत आम्ही !..

जर कणा सांभाळला तर कापल्या जातात माना
लोकशाहीच्या खुट्याला टांगलो आहोत आम्ही !...

सांग स्वातंत्र्या तुझे रे हेच का प्रारब्ध होते
पारतंत्र्या सारखे का त्रासलो आहोत आम्ही ?..

दाखवा आहे कुठे ? जे रोज मी ऎकून घेतो
"विविधतेने एकतेशी बांधलो आहोत आम्ही..".

- सुधीर मुळीक