Sign In New user? Start here.

आई मुळेच कलेशी नातं जडले...!

आई....! आपला जन्म, लहानाचं मोठं करणं, मांडी घालून जेवालयला शिकवण्यापासून सर्व संस्कार आपल्यावर करण्याचं काम आईचंच..! जरी कुटुंब प्रमुख म्हणून वडिल प्रसिद्ध असले तरी आईची भूमिका ही अधिक मोठी असते. जन्म दिलाय म्हणून नुसतं लहानाचं मोठं करणं एवढीच तिची भूमिका नसून आपल्या समोर आ वासून उभं असलेलं आयुष्य चांगलं कसं जगता येईल, ह्याचाही विचार आईच करते. या ‘मदर्स डे’च्या औचित्याने मला असं काही शेअर करावं वाटतंय. तिच्या तेव्हाच्या सर्वच गोष्टी मला आता कळताहेत, कारण आज मी सुद्धा एका मुलीची आई आहे.

माझी आई ही एक चित्रकार असल्याने लहानपणापासून आमच्या नजरेखालून तिची चित्रे जात आली. आम्हाला त्यातील जास्त काही जरी कळत नसलं तरी रंगांकडे मी आकर्षीत होतंच होते. जसजशी मी मोठे होत गेले. तसतसे हळूहळू आम्हाला तिची चित्र समजायला लागलीत. घरात कलेचंच वातावरण असल्याने काही शिकण्याच्या आधीच चित्रांतील बरं काही कळायला लागलं. माझी चित्रकलेची ओढ काही आई पासून लपणार नव्हतीच. माझी हीच आवड तिने हेरली आणि ती कला आमच्यात जोपासण्यासाठी तिने तिच्यापरीने प्रयत्न सुरू केले. आई घरात पेंटीगची क्लासेस घेत होती. त्यामुळे इतरांबरोबर मी सुद्धा पेंटीग शिकायला लागले. पुढच्या जीवनात आपल्या मुलीला कुणावरही अवलंबून रहावं लागू नये. ह्यादृष्टीने तिने मला शिकवायचं ठरवलं. घरात तिला सासू सासरे नसल्याने घर सांभाळून हे सर्व करणं खुप कठीण जायचं. मात्र आम्हाला आमच्या कलेत तरबेज करण्याची तिची ईच्छा तिने अनेक त्रासातून पूर्ण केली. आज तिच्यामुळे मी एक वेब डिझायनर म्हणून काम करते आहे. कदाचित तिने त्यावेळी माझी चित्रकलेची ओढ जाणली नसती तर आज मी या क्षेत्रात येऊच शकले नसते. आईने मुलगी म्हणून कुठलिही बंधने कधी आमच्यावर टाकली नाहीत.

ह्याबरोबरच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, माझी आई अनेक खाद्य पदार्थ अतिशय चांगल्याप्रकारे बनवते. त्यातली एक गोष्ट मी तिच्याकडून खुप चांगली शिकले. ती म्हणजे ‘केक’. मी लहान असतांना माझ्या वाढदिवसाला आई घरीच केक तयार करायची. प्रत्येकवेळी वेगळा केक. पण तेव्हा कधी कळायचं नाही की, आई एवढं सर्व का करते. पण आज ते सर्व कळायला लागलंय. माझी मुलगी अस्मी हिचा जन्म ‘मदर्स डे’चाच त्यामुळे कालच तिचा वाढदिवस झाला. तिच्यासाठी मोठ्या आनंदाने मी केक बनवला. आणि त्या दिवशी कळलं. की, स्वत:च्या मुलांसाठी काही करण्यात किती आनंद मिळतो. खरंतर नुसता केकच नाहीतर आई प्रत्येकच पदार्थ हा वेगळा असायचा. जो तिच्याकडून आम्ही शिकलाय आणि आज मीही तशाच चांगल्याप्रकारे तयार करण्याचा प्रयत्न करते.

सांगायचं हेच आहे की, आईने घडवलं तरच आपण घडतो.

अवंती धर्माधिकारी

 

cssmothersdaycssmothersday