Sign In New user? Start here.

असाच एक अनुभव..!

आईसाठी काय लिहू, आईसाठी कसे लिहू, आईची महती वर्णन करायला पुरतील एवढे शब्द माझ्याकडे नाहीत आणि आईविषयी लिहण्याइतपत माझे व्यक्तिमत्वही मोठे नाही. खरतर आई ह्या विषयावर जितके बोलावे तितके कमीच पडेल. तरी आज मदर्स डे च्या निमित्ताने आईविषयी दोन शब्द लिहावेसे वाटतात.

माझी आई म्हणजे माझे आयुष्य, माझ्यावर तिने घातलेले संस्कार, माझ्यावर तिचे असलेले प्रेम आणि सर्वकाही. याअगोदर मी कधीही घर सोडून, माझ्या आईला सोडून कुठे राहिलो नव्हतो. मी ज्यादिवसापर्यंत घरी होतो त्यादिवसापर्यंत मला आईचे जास्त महत्व कळले नव्हते. आईचे महत्व फक्त शाळेतील कवितेत, धड्यांमध्ये वाचले आणि ऐकले होते. पण मी ज्यादिवशी उच्च शिक्षणासाठी घर सोडून पुण्यात शिकायला आलो त्यादिवशी मी सगळ्यात जास्त काही मिस केले असेल तर ती म्हणजे माझी आई. कारण आता स्वत:च्या सगळ्याच गोष्टी स्वत:ला कराव्या लागणार होत्या. मला माझ्या प्रत्येक कामात मदत करायला आई जवळ नव्हती. आणि ख-या अर्थाने मला माझ्या आईचे माझ्या आयुष्यातील महत्व कळू लागले होते. म्हणून मला माझ्या आयुष्यातील माझ्या आईचे महत्व समजावून देणारा एक अनुभव सांगावासा वाटतो.

मी घरी असताना, एकदा मला चांगले कपडे घालून बाहेर जायचे होते आणि मी आईला माझा आवडता शर्ट धुऊन ठेवायला सांगितला होता. आईने शर्ट धुऊन ठेवला आणि मी तो घालण्यासाठी कपाटातून बाहेर काढला. मला शर्टच्या कॉलरवर थोडा मळ दिसला. मला राग आला आणि मी आईवर मनमन तसा चिडलो. आईला वाट्टेल ते बोललो आणि तसाच निघून गेलो. पण मी ज्यादिवशी पुण्यात आलो त्यादिवशी मी पहिल्यांदाच स्वताचे कपडे स्वतः धुतले. कपडे धुताना खूप जीवावर येत होती आणि कपड्यांचा मळ काढण्यासाठी खूप जोर लावावा लागत होता. आणि जेव्हा मी धुतलेले कपडे हातात घेतले तेव्हा मी पाहिले, मी एवढा जोर लावूनही माझ्या शर्टच्या कॉलरवरचा थोडासाही मळ निघालेला नव्हता. मला त्याक्षणी मी आईला बोललेल्या शब्दांची आठवण आली आणि मी अक्षरश: रडू लागलो. मी लगेच आईला फोन लावला आणि मी आईला जे बोललो होतो त्याबद्दल आईची माफी मागितली.

आजही मी जेव्हा घरी जातो तेव्हा मी माझे कपडे आईला धुऊ देत नाही आणि शक्य असेल तेवढ्या कामात मी आईला मदत करू लागतो. ते करत असतांनाच मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट माझ्या आईला मनमोकळेपणाने सांगतो आणि ह्या गोष्टी सांगताना तिच्या चेह-यावरचा जो आनंद असतो, तो मला तिच्या चेह-यावर तसाच आयुष्यभर ठेवायचा आहे. माझ्या आईने माझ्यावर केलेल्या उपकारांची मी कधीच परतफेड करू शकत नाही. पण मी आयुष्यभर तिला सुख देऊन तिच्या उपकारांचा मोबदला देत राहीन. मला माझ्या वडिलांचं एक वाक्य नेहमीच मनाला भावतं ते म्हणजे, "ज्याला आई नाही, त्याला काही नाही आणि ज्याला आई आहे त्याला सर्व काही आहे...!". म्हणून शेवटी मी जगातील प्रत्येक आईला ‘मदर्स डे’च्या शुभेच्छा देतो आणि नतमस्तक होऊन प्रणाम करतो.

गणेश मिसाळ



 

cssmothersday