Sign In New user? Start here.

आणि तिचे डोळे पाणावले....!

mothers day
mothers day

तसा मी जास्त विचार न करणारा आणि स्वत:च्याच धुंदीत राहणारा मुलगा. नाते संबंध जपणे मोठ्या माणसांचं मन राखणे आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणे मला कधी जमलेच नाही. पण असेही काही प्रसंग आयुष्यात घडून जातात जे सहज शांत बसल्यावर चटकन आठवून जातात आणि त्यातून कधी डोळे ओले होऊन जातात समजत पण नाही. माझे कवी मन नाही किंवा मी लेखक पण नाही. त्या मुळे ना मी माझा आईवर कविता करू शकत ना शब्दात मी सांगू शकत की, माझ्या आयुष्यात तिचे काय स्थान आहे. पण अशाच एखाद्या शांत वेळी आठवणारा प्रसंग सांगू शकतो.

मी पुण्यात काम करतो आणि पुण्याजवळच संगमनेर तालुक्यात बोटा हे माझ गाव आहे. गाव जवळच असल्याने मी प्रत्येक शुक्रवारी गावी जातो आणि सोमवारी सकाळी परत पुण्याला येतो. मला इथून मागचे सगळे दिवस आठवतात. मी कधी घरी गेल्यावर आईला विचारल नाही की, तू कशी आहेस आणि परत पुण्याला येताना साधं चाललो, असं पण आईला मी कधी सांगितलं नाही. असंच एक दिवस माझ्या छोट्या बहिणीने सहज माझ्याशी बोलता बोलता मला म्हणाली, "दादा तुला जर आईला तिच्या आयुष्यात सगळ्यात जास्त आनंदी पहायचं असेल, तर तू सोमवारी पुण्याला जाताना सकाळी आईच्या पाया पड आणि तिच्या चेह-याकडे बघ तुला दिसून येईल...!" मला यात काही विशेष वाटल नाही.

सोमवार उजाडला आणि मी सकाळी लवकर उठून आवरा सावर केली. आईनेही उठून माझासाठी नाश्ता तयार केला. मी नाश्ता करून बॅग पाठीवर चढवून जाण्यासाठी तयार झालो. बहिणीने सांगितलेलं मनात होतंच. पण त्या वेळी मला काहीच सुचत नव्हते. माझा आईच्या पाया पडण्यासाठी सुद्धा माझे शरीर जड झाले होते. कारण बहुदा आज पहिल्यांदाच घराबाहेर पडताना मी माझा आईच्या पाया पडणार होतो. मी पूर्ण तयार होऊन घराबाहेर पडून परत घरात गेलो पायात जोडे तसेच होते. आईला हाक मारली. ती स्वयंपाक घरात माझ्या भांडे धुवत होती. ती "काय..?" म्हणून जवळ आली तसाच मी माझे डोळे सरळ तिच्या पायाकडे स्थिर करून दोन्ही हातांनी तिच्या पायांना स्पर्श केला. ५ - ६ सेकंद डोळे बंद करून तसाच थांबलो आणि उभा राहिलो. आईचा एक हात माझा डोक्यावर होता. तर दुस-या हाताने तिने तिच्या डोक्यावर पदर घेतला होता. तिचे डोळे पाणावले होते. आणि ओठांवर मंद स्मित होत.

मी तसाच सरळ घर बाहेर पडलो आणि त्या दिवशी मी स्वत:ला खूप दोष दिला. मी किती वाईट आहे. मी फक्त आईला तिच्या हक्काचा मान दिला तरी ती इतकी खुश होते. हे मला आगोदर का समजले नाही.. मी त्या सुखाला अजून का तिच्या पासून लांब ठेवलं. मी आज पर्यंत केलेल्या चुकांची मी माझ्या आईकडे क्षमा मागतो. आणि बहिणीला खूप धन्यवाद देतो. जिच्यामुळे मला माझ्या आईच्या भावना समजल्या...Thanks sister ..

I love you आई तुला Mothers Day च्या हार्दिक सुभेछ्या ......!

संदीप कु-हाडे 

cssmothersday