Sign In New user? Start here.

आणि आईच्या काळजाचा ठोका नेहमीसाठीच थांबला...!

आज आई सोबत असेल तर त्यासारखा आनंद नाही पण काळाच्या पडद्याआड गेली असेल तर ती आपल्या नजरेत... ह्रदयात ...रक्तातच आहे. कधी विसर पडणार का आपल्याला? मनाचा एक कोपरा असा आहे की, जिथे ती नेहमीच वसत असते. आपण मनोमन सतत तीला स्मरतच असतो, आपल्या प्रत्येक विचारात आई कुठेना-कुठे लपलेली असते. तिच्या शिवाय या विश्वात वावरणं खरं तर अशक्यच असतं.

२९ मार्च २०१२ दिवस असे जाताय...क्षणभर ही माझ्या मनातुन जी गेलीच नाहीये. त्या आईला जाऊन आज एक वर्ष पुर्ण होतंय. सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत प्रत्येक कामात आईची आठवण....आई असं करायची...आई तसं म्हणायची..असं म्हणत म्हणतच मी तीच्या आठवणीत दोन वर्ष घालवले. मी मागच्या दोन वर्षापासुन तिच्या पासुन दुर पुण्यात राहत होते. कधी कधी आठवणीत मन दाटून यायचं, कळत नकळत तिचे काळीज माझ्यासाठी ओले व्हायचे. तिच्या मनात सुरु असलेला आठवणीचा गोंधळ मला अस्थिर करत होता. आता काही दिवसाचा कालावधी, मग मी नेहमीसाठी आई सोबत राहायला जाणार ही उत्सुकता मला तिथे थांबण्याचा धीर देत होती आणि कॉलेजचे दिवस संपत होते, त्याच वेळेला मला आकाशवाणीतून कॉल आला, मी नाही गेले कारण त्याच कालावधीत आईला कर्करोगाने घेरल होते, तिच्या शरीरात ७५% कर्करोग पसरला होता, अशी बातमी कळाली आणि माझं मन सुन्न झालं. तिच्या आजरावर ईलाज सुरु होता. किमो थेरीपी चे पहिले ६ दिवस मी तिच्या सोबत दवाखान्यात होते आणि मला वारंवार आकाशवाणीचे फोन येत होते. आई म्हणाली बेटा मी ठीक आहे, तु जाऊन ये...! तिला फार आनंद झाला होता, की मी आकाशवाणी सारख्या ठिकाणी कामाला लागले. तिच्या आग्रहाने मी पुण्याला निघाले. मी जाता क्षणी तिने धीर सोडला आणि आईची अवस्था आणखीनच वाईट झाली. आणि मी तिची शेवटची भेटही नाही घेऊ शकले.

मला जबाबदारीची जाणीव होण्यापुर्वीच तिच्या जाण्याचा निरोप येणं आमच्या समजण्या पलीकडचं होतं. तिचं जाणं जीवाला इतकं थकवून गेलं, की शब्दांत सांगणं खूपच कठीण. असे वाटत होते की, आमच्या आयुष्यातील सर्व आनंदाचे क्षण, शेवटचे क्षण आमच्याशी जणू काही रूसले होते. सगळंच कसं सुन्नं झालं होतं. कधीच आम्हा कोणाला असं वाटलं नव्हत, की आई आम्हाला असं सोडून जाईल. मग असे का व्हावे? डॉ तरी काय उत्तर देणार..आमचे प्रश्न तर अनंत होते. सगळ्यात वाईट ह्याचे वाटत होतं की, तिला आम्ही कधीच एकटे सोडले नव्हते, बाहेर बसून सतत तिच्या बरोबर असण्याचे आम्हाला भासत होते. पण ती एकटीच असल्याचं आणि तिच्याजवळ कोणी नाहीये असं तिला भासत होते व त्याच दुःखात ती आम्हाला सोडून निघून गेली. 

cssmothersday