Sign In New user? Start here.
babachi shala film depend on true story

"सत्यघटनेवर आधारित बाबांची शाळा

 
‘मुंबई पुणे मुंबई-2 सात दिवसात सात कोटीं
 
"‘सत्यघटनेवर आधारित बाबांची शाळा

अलीकडे मराठी चित्रपटांतील कथांमध्ये आलेले वैविध्य पाहता रसिक-प्रेक्षक ही चित्रपटांबाबतीत अधिक चोखंदळ झालेले दिसतात. हीच बाब लक्षात घेत आयडिया एन्टरटेन्मेंट निर्मिती संस्थेने अशाच एका हृदयस्पर्शी कथेवर दर्जेदार चित्रकृती बनवली आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवर ‘बाबांची शाळा’ हा चित्रपट आधारला असून आर. विराज दिग्दर्शित ‘बाबांची शाळा’ २६ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहात दाखल होतोय.

विलास माने आणि उमेश नाथाणी निर्मित ‘बाबांची शाळा’ चित्रपटाची कथा तुरुंगातील कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांवर भाष्य करते. ही कथा आहे महीपत घोरपडेची. रागाच्या भरात हातून घडलेला गंभीर गुन्हा... त्यानंतर न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा... आपल्या कुटुंबापासून झालेली ताटातूट... आणि तरीही या कटू अनुभवावर यशस्वीपणे मात करणारा बंदिवान महीपत घोरपडे या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. एखाद्याने केलेला गुन्हा आणि त्यासाठी त्याला मिळणारी शिक्षा ही केवळ त्याच्यापुरतीच मर्यादित नसते तर त्याची झळ संपूर्ण कुटुंबाला सोसावी लागते याचे विदारक चित्रण ‘बाबांची शाळा’ चित्रपटाद्वारे आपल्याला पहायला मिळणार आहे. आपल्या गुन्हाची शिक्षा भोगणारा महीपत घोरपडे, त्याची मुलगी सोनाली, तुरुंगाधिकारी श्रीकांत जमदाडे आणि सामाजिक कार्यकर्त्या नीता साटम यांच्या भोवती ही कथा गुंफली गेलीये.

‘बाबांची शाळा’ चित्रपटात सयाजी शिंदे, शशांक शेंडे, ऐश्वर्या नारकर, कमलेश सावंत, छाया कदम, आरती मोरे, कार्तिक चव्हाण, उमेश बोळके, मिलिंद अधिकारी यांसह बाल कलाकार गौरी देशपांडे आदींच्या मुख्य भूमिका असून उदय टिकेकर, उषा नाईक, डॉ. विलास उजवणे आणि शरद भुथाडिया हे विशेष भूमिकेत दिसतील. हंसराज पटेल आणि नविन पटेल सहनिर्मित या चित्रपटाची पटकथा आणि संवाद पराग कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. ‘बाबांची शाळा’ या चित्रपटातून विषयाला साजेशा अशा दोन सुमधुर गाण्यांचा आस्वाद ही घेता येईल. श्रीरंग गोडबोले आणि नीला सत्यानारायण यांनी लिहिलेल्या गीतांना सोहम पाठक तसेच स्वतः नीला सत्यनारायण यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या गीतांना सुरेश वाडकर आणि विश्वजित बोरवणकर यांचा स्वरसाज लाभला आहे. छायांकन – अंकुश बिराजदार, संकलन –निलेश नवनाथ गावंड, कला-दिग्दर्शक – राज सांडभोर, रंगभूषा – संतोष गायके, वेशभूषा – संपदा महाडिक अशी इतर श्रेयनामावली तर मंगेश जगताप यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.

आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊन सुधारू पाहणाऱ्या बंदिवानांना त्यांच्या कुटुंबाने तसेच समाजाने मदतीचा हात देणं गरजेचे आहे हा मार्मिक संदेश देणारा ‘बाबांची शाळा’ २६ फेब्रुवारीला आवर्जून पहा.