Sign In New user? Start here.
 
 

'ब्रेव्हहार्ट' चित्रपट ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस

मानवी नातेसंबंधात प्रत्येक नात्याची स्वतःची जागा ठरवलेली असते. त्याची गृहितकं प्रत्येकाच्या मनात घट्ट रुजलेली असतात. पण कधी कधी नियती एखाद्याच्या आयुष्याच्या पटावर असा अगम्य खेळ मांडते की नात्यांची जागा क्षणार्धात बदलते. निखिल आणि सच्चिदानंद कारखानीस... नातं खरंतर पिता-पुत्राचं...पण एका घटनेने निखिलचे वडील क्षणार्धात त्याचे माता, पिता, बंधू, सखा, सोबती असे सर्वस्वच बनून गेले. वडील– मुलाच्या नात्याची ही सत्यकथा आपल्याला ‘निखिल फिल्म्स’ प्रस्तुत ‘ब्रेव्हहार्ट जिद्द जगण्याची’ या आगामी मराठी चित्रपटातून पहायला मिळणार आहे. निर्माते सच्चिदानंद गोपीनाथ कारखानीस व संतोष यशवंत मोकाशी यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली असून अनुभवी बंगाली भाषिक दिग्दर्शक दासबाबू यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. ‘ब्रेव्हहार्ट जिद्द जगण्याची’ हा हृदयस्पर्शी चित्रपट ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अनेक महोत्सवांमध्ये विशेष कौतुक झालेल्या ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटाला नुकत्याच संपन्न झालेल्या १५ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवामध्ये देखील सिनेअभ्यासक, समीक्षकांसह रसिकांची पसंतीची दाद मिळाली आहे. जगण्याची जिद्द असली तरी नियती अखेर आपला घास घेते; परंतु नियती तिला निधड्या छातीने सामोरे जाणाऱ्यांना सलामही करते. निखिल कारखानीस आणि सच्चिदानंद कारखानीस यांना तिने अशीच मनापासून दाद दिली असेल. बाप-लेकाच्या या जिद्दीची, संघर्षाची, अर्थपूर्ण जगण्याची आणि लढण्याची कथा ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटात आपल्यासमोर येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक दासबाबू यांना गेली दोन दशके मराठी मनोरंजनसृष्टीत दर्जेदार मालिका, चित्रपटांसाठी काम करण्याचा अनुभव आहे.

संग्राम समेळ व धनश्री काडगांवकर ही युवा जोडी ‘ब्रेव्हहार्ट’ मधून आपल्यासमोर येतेय. अभिनेते अरुण नलावडे वडिलांच्या म्हणजेच सच्चिदानंद कारखानीस यांच्या भूमिकेत असून संग्राम समेळ या तरुण अभिनेत्याने निखिलची भूमिका साकारली आहे. अरुण नलावडे, संग्राम व धनश्री यांच्यासोबत अतुल परचुरे, सुलभा देशपांडे, किशोर प्रधान, डॉ. विलास उजवणे, विजय चव्हाण, इला भाटे, अभय कुलकर्णी, शमा निनावे, कु. अथर्व तळवेलकर, स्वामीकुमार बाणावलीकर, प्रदिप भिडे, आशिष वड्डे, देव वाघमारे, आप्पा कोरगावकर, धनंजय गोखले, संतोष गाडगे, संतोष पाटील, प्रशांत गुरव, अश्विन साखरे, पूजा होले या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत.अनेक राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर ठसा उमटविणारा ‘ब्रेव्हहार्ट हा हृदयस्पर्शी चित्रपट ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

--------------------