Sign In New user? Start here.

वन टेक मध्ये चित्रित झाले "देवा वाचून सुनं, माझं झुरतंय मन'

chourya film song

वन टेक मध्ये चित्रित झाले "देवा वाचून सुनं, माझं झुरतंय मन'

 
 
 
वन टेक मध्ये चित्रित झाले "देवा वाचून सुनं, माझं झुरतंय मन'

पारंपरिक लोककला आणि सद्यस्थिती यांचा मिलाफ घडवणारं 'देवा वाचून सुनं, माझं झुरतंय मन' हे गाणं 'चौर्य' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. १९६०मध्ये शंकरराव धामणीकर यांनी लिहिलेलं हे गीत प्रसिद्ध गायक आणि लोककला अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी गायलं आहे. ५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

शाळा, फँड्री असे उत्तमोत्तम चित्रपट केलेल्या नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलाखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून राजन आमले यांची सहनिर्मिती आहे. समीर आशा पाटील हा नव्या दमाचा लेखक दिग्दर्शक या चित्रपटातून पदार्पण करत आहे. किशोर कदम, मिलिंद शिंदे, गणेश यादव, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, जयेश संघवी, तीर्था मुरबाडकर, आरजे श्रुती आदींच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. नव्या दमाच्या मयुरेश केळकरने या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केलं आहे. शैतानमधील पिंट्या गेला, लोकमान्य टिळक एक युगपुरुष मधील पोवाडा, बाजीराव मस्तानीमधील दिवानी मस्तानी अशी गाणी चंदनशिवे यांनी गायली आहेत.

लोककला आणि आताच्या काळाची सांगड घालणाऱ्या या गाण्याविषयी गणेश चंदनशिवे यांनी माहिती दिली. 'दिग्दर्शक समीर आशा पाटील यांना अस्सल लोकगीताच्या शैलीचं गाणं हवं होतं. बरीच गाणी गाऊन दाखवली. मात्र, त्यांना कुठलंच गाणं पसंत पडेना. अखेर, शंकरराव धामणीकर यांचं १९६० मधील पारंपरिक पद्धतीचं गीत 'देवा वाचून सुनं, माझं झुरतंय मन' हे गाऊन दाखवलं. त्यांना ते आवडलं. हेच गाणं वापरायचा त्यांनी निर्णय घेतला. पण या गाण्याच्या सुरुवातीच्या काही ओळीच माझ्याकडे होत्या. बाकीच्या ओळी मिळवाव्या लागणार होत्या. त्यामुळे शोधाशोध करून शंकरराव धामणीकर यांच्या नातेवाईकांकडून गाणं घेऊन रेकॉर्डिंग करण्यात आलं. हे गाणं आताच्या परिस्थितीवरही मार्मिक पद्धतीनं भाष्य करतं,' असं त्यांनी सांगितलं.

'गाणं पडद्यावर अस्सल दिसण्यासाठी समीर आशा पाटील यांनी मलाच त्यात काम करण्याविषयी विचारलं. पारंपरिक लोककलेतील गोंधळ जागरणाच्या माध्यमातून हे गाणं चित्रीत करण्यात आलं. वन टेकमध्येच हे गाणं करण्यात आलं. चित्रीकरणानंतर रात्री उशीरा सुमारे दोन हजार लोक या गाण्यावर नाचत होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.