Sign In New user? Start here.
kanti film depend on transgender

महोत्सवांमध्ये गौरवलेला 'कोती' प्रदर्शनासाठी सज्ज!

 
 
 
महोत्सवांमध्ये गौरवलेला 'कोती' प्रदर्शनासाठी सज्ज!!

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कारांनी गौरवलेला ओएमएस आर्ट्स निर्मित 'कोती' हा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तृतीयपंथीय असलेल्या भावाला समाज का झिडकारतो.....या विचारातून त्या विरोधात दुसऱ्या भावाने दिलेला लढा या आशययसूत्रावर 'कोती' बेतला आहे. दोन भावंडांतील संवेदनशील नातं हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. काही मोजके अपवाद वगळता मराठी चित्रपटसृष्टीत तृतीयपंथीयांचा विषय हाताळलेला नाही. या पार्श्वभूमीवर, 'कोती' महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे.

बालकलाकार अज्ञेश मुडशिंगकर, दिवेश मेदगे अभिनेते संजय कुलकर्णी अभिनेत्री विनीता काळे यांनी चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ओएमएस आर्ट्सच्या डॉ. संतोष पोटे व डॉ. सुनीता पोटे यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुहास भोसले यांनी केलं आहे. वाळू माफियांवर आधारित "रेती" या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून भोसले यांनी लक्ष वेधून घेतलं होतं.

'कोती' हा ह्रदयाच्या खूप जवळचा चित्रपट आहे. या चित्रपटानं अनेक मानसन्मान मिळवून दिले. अतिशय महत्त्वाचा विषय चित्रपटात हाताळण्यात आला आहे. महोत्सवांमध्ये कौतुक झाल्यानंतर आता प्रेक्षक चित्रपटाला कसं स्वीकारतात याची उत्सुकता आहे. या चित्रपटानंतर समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल अशी अपेक्षा आहे, अशी भावना दिग्दर्शक सुहास भोसले यांनी व्यक्त केली.

आजवर अनेक महोत्सवांमध्ये "कोती" चित्रपटाचा गौरव झाला आहे. इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) प्रतिष्ठेच्या 'इंडियन पॅनोरमा' विभागात या चित्रपटाची निवड झाली होती या महोत्सवातही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. भारत सरकारने कान महोत्सवासाठी या चित्रपटाची प्रवेशिका पाठवली होती. त्याशिवाय दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात परीक्षक पुरस्कार, संस्कृती कलादर्पण पुरस्कारांमध्ये लक्षवेधी चित्रपटासह चार पुरस्कार, कोल्हापूर महोत्सवात पाच पुरस्कार पटकावले आहेत.

"कोती" चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद राजेश दुर्गे यांचे असून कॅमेरामन म्हणून भरत आर. पार्थसारथी यांनी काम पाहिले आहे. संजय नवगिरे यांनी लिहिलेल्या गीताला बबन अडगळे आणिमनोज नेगी यांचे उत्तम संगीत लाभले असून पार्श्वसंगीत ही त्यांचेच आहे. सागर वंजारी यांनी चित्रपटाचे संकलन केले असून शंकर धुरी हे कार्यकारी निर्माते आहेत तर कला दिग्दर्शन देवदास भंडारे यांचे आहे. तर असा हा वेगळ्या धाटणीचा "कोती" चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे.