Sign In New user? Start here.

"अक्षय कुमार आणि डिंपल कपाडीया यांच्या हस्ते 'कौल मनाचा’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन

koul manacha music inogration

अक्षय कुमार आणि डिंपल कपाडीया यांच्या हस्ते 'कौल मनाचा’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन

 
 
 
"अक्षय कुमार आणि डिंपल कपाडीया यांच्या हस्ते 'कौल मनाचा’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन

बॉलीवुड स्टार अक्षय कुमार आणि ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडीया यांच्या उपस्थितीत 'कौल मनाचा' या मराठी चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला. जुहू येथील नोव्होटेल या पंचतारांकीत हॉटेलमधील भरगच्च भरलेल्या सभागृहात पार पडलेल्या संगीत प्रकाशन सोहळ्यात पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधत अक्षय कुमार आणि डिंपल कपाडीया यांनी 'कौल मनाचा' चित्रपटाच्या टिमला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते राजेश पाटील, विठ्ठल रुपनवर, नरशी वासानी, दिग्दर्शक भीमराव मुडे, राजेश शृंगारपुरे तसेच इतर कलाकार उपस्थित होते.

'कौल मनाचा' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर अक्षय कुमारने पत्रकारांशी संवाद साधला. 'कौल मनाचा' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे अक्षयने म्हटले. सुरुवातीला हिंदीत संवाद बोलल्यानंतर मराठीत संवाद साधत अक्षयने बालपणी शाळेत घडलेला किस्सा सांगितला. शाळेत झालेल्या आपल्या पहिल्या प्रेमाची कबूलीही यावेळी अक्षयने आपल्या सासूबाईंच्या उपस्थितीत दिली. प्रथमदर्शनी 'कौल मनाचा' हा चित्रपट लक्ष वेधून घेणारा असून प्रदर्शित झाल्यावर खूप व्यवसाय करो अशी सदिच्छा अक्षयने व्यक्त केली. मराठी चित्रपटांच्या सध्याच्या यशस्वी घोडदौडीवरही अक्षयने आपले मत व्यक्त केलं. बॉलिवुडपटांच्या तुलनेत मराठी चित्रपट खूप मोठा असून, बॉलिवुडच्या तुलनेत इथे नुकसान कमी आणि फायदा जास्त असल्याचे अक्षयने म्हटले. 'कौल मनाचा' या चित्रपटाला प्रेक्षकांच्या मनाचा कौल नक्कीच मिळेल अशी आशा डिंपल कपाडीया यांनी व्यक्त केली. या चित्रपटातील गीत-संगीतही श्रवणीय असल्याचं अक्षय कुमार आणि डिंपल कपाडीया यांनी म्हटले.

या चित्रपटाची गीते मनोज यादव यांनी लिहिली असून संगीत रोहन-रोहन यांचं आहे. यातील ‘टिक टॅाक’ हे धमाल गीत प्राजक्ता शुक्रे, रोहन प्रधान व रोहन गोखले यांनी गायलं आहे. तर ‘मनमंजिरी’ या प्रेमगीताला अरमान मलिक व श्रेया घोषालचा स्वरसाज लाभला आहे. ‘कौल नियतीशी’ या गीताला आदर्श शिंदेने आवाज दिला आहे.

रेड बेरी एंटरटेन्मेंटची प्रस्तुती तसेच श्री सदिच्छा फिल्म्सची निर्मिती असलेल्या 'कौल मनाचा' या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, मिलिंद गुणाजी, अमृता पत्की, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, विजय गोखले, वर्षा दांदळे, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, आशुतोष गायकवाड, गिरीजा प्रभू, निनाद तांबडे, गणेश सोनावणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा भिमराव मुडे व श्वेता पेंडसे यांची आहे. नितीन घाग यांनी छायाचित्रणाची व संतोष यादव यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. वेशभूषा नितीन भावसार व कलादिग्दर्शन संजीव राणे यांच आहे. ‘फक्त मराठी’ वाहिनी या चित्रपटाचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत.

रेड बेरी एंटरटेन्मेंटची प्रस्तुती तसेच श्री सदिच्छा फिल्म्सची निर्मिती असलेला 'कौल मनाचा' हा चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.