Sign In New user? Start here.
lal ishq trailer launch

रोमान्स, सस्पेन्स थ्रिलरने भरलेला 'लाल इश्क़'चा ट्रेलर

 
 
 
रोमान्स, सस्पेन्स थ्रिलरने भरलेला 'लाल इश्क़'चा ट्रेलर

हम दिल दे चुके सनम, देवदास, गुजारिश, बाजीराव मस्तानी,गोलीयों की रासलीला-रामलीला यांसारखे अनेक दर्जेदार हिंदी सिनेमे देणारे संजय लीला भन्साळी हे लाल इश्क़ या सिनेमातून मराठीत पदार्पण करीत आहेत. आपल्या प्रत्येक सिनेमात प्रेक्षकांना वेगळं देणारे संजय लीला भन्साळी यावेळीही या सिनेमाद्वारे आपलं वेगळेपण सिध्द करायला सज्ज झाले आहेत. बाजीराव मस्तानी या सिनेमातून आपल्याला त्यांचं मराठी भाषा तसेच संस्कृतीवर असलेलं प्रेम दिसून आल आहे. 'लाल इश्क़' या त्यांच्या आगामी सिनेमातून मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. त्यांच्या सिनेमांमध्ये दिसणारी भव्यता आपल्याला या सिनेमातही अनुभवता येईल. नुकतच 'लाल इश्क़' या सिनेमाचा ट्रेलर मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे या तिघींच्या हस्ते लाँच करण्यात आला. या तिन्ही अभिनेत्रीनी स्वप्नीलसोबत हिट सिनेमे दिले आहेत. यावेळी त्यांनी स्वप्नीलच्या लाल इश्क़ सिनेमाच्या नव्या जोडीसाठीही शुभेछा दिल्या.

सिनेमात दडलेलं रहस्य, सस्पेन्स आणि रोमान्स या सगळ्याचा थोडा भाग या ट्रेलरमध्ये दाखवलाय. एका रिसोर्टमध्ये नाटकाची रिर्हसल चालू असताना रहस्यमय पद्धतीने खून होतो. या खुनाचे संशयित म्हणून चौकशी केल्या जाणा-या दोन व्यक्तिरेखांभोवती सिनेमाची कथा फिरतेय हे ट्रेलरमधून दिसून येतं. स्वप्नील जोशी याचा हटके लूकही आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. या कार्यक्रमाला सिनेमाची सगळी टीम उपस्थित होती. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलं असून शिरीष लाटकर यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. प्रसाद भेंडे यांनी सिनेमाचे छायाचित्रण केले असून निलेश मोहरीर आणि अमितराज या दोघांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. स्नेहा चव्हाण, जयवंत वाडकर, पियुष रानडे, यशश्री मसुरकर, प्रिया बेर्डे, मिलिंद गवळी, उदय नेने, कमलेश सावंत, समिधा गुरु, फार्झील पेर्डीलवाला या कलाकारांचादेखील अभिनय आपल्याला सिनेमात पाहायला मिळेल. रावडी राठोर आणि गब्बर या सिनेमांच्या सहनिर्मात्या शबीना खान हया सिनेमाच्यादेखील सहनिर्मात्या आहेत. भन्साळी प्रॉडक्शन निर्मित लाल इश्क़ गुपित आहे साक्षीला हा सिनेमा २७ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.