Sign In New user? Start here.
nivdung music launch

‘निवडुंग’चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न

 
 
 
"‘निवडुंग’चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न

गीत-संगीत हा भारतीय सिनेमांचा आत्मा असल्याचं मानलं जातं. त्यामुळेच केवळ हिंदी चित्रपटच नव्हे, तर प्रादेशिक चित्रपटही गीत-संगीताने सजवले जातात. मराठी चित्रपटांनी यात आपलं वेगळेपण जपत नावीन्याच्या जोडीला पारंपारिक लोककलेची जोड देत रसिकांचं मनोरंजन केलं आहे. अलीकडच्या काळातील निर्माते-दिग्दर्शकही हाच वसा जपत रसिकांची सेवा करीत आहेत. यांच्याच पावलावर पाऊल टाकत निर्माते-दिग्दर्शक मुनावर भगत यांनी ‘निवडुंग’या संगीतप्रधान चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘मीना शमीम फिल्म्स’च्या बेनरखाली तयार झालेल्या ‘निवडुंग’ या आगामी मराठी चित्रपटाची निर्मिती मुनावर भगत यांनी केली आहे. या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच जुहू येथील सी साईड या हॉटेलमध्ये मोठया दिमाखात पार पडला. ‘निवडुंग’ या चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. या सहाही गीतरचना चित्रपटाच्या कथेशी एकरूप होणाऱ्या असून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आहेत. वेगवेगळया मूडमधील या सहाही गीतरचनांना संगीतकार रफीक शेख यांनी स्वरसाज चढवला आहे. या चित्रपटातील “विठ्ठला, विठ्ठला...’’ हे भक्तीपूर्ण गीत झहीर कलाम यांनी लिहिलं असून स्वप्नील बांदोडकरने गायलं आहे. “माझ्या ज्वानीला अंगभर भिजवा...’’ ही या चित्रपटातील झहीर कलाम यांची लावणी उर्मिला धनगरच्या भारदस्त आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आली आह. प्रसाद कुलकर्णी यांनी लिहिलेलं ‘‘माझे मला कळेना...’’हे सेड साँग डॉ. नेहा राजपाल आणि रफीक शेख यांनी गायलं आहे. कवी शरद यांच्या लेखणीतून अवतरलेली ‘‘तिला मी पाहिले...’’ ही गजलही डॉ. नेहा राजपाल आणि रफीक यांनी गायली आहे. याशिवाय रफिक यांनी सुरेश वाडकर यांच्या सोबत गीतकार कलाम यांच्या लेखणीतून साकारलेले "कुबेराच्या घरात..." हे गीतही गायलं आहे. ‘‘धोंडी धोंडी पानी दे...’’ या कलाम यांनी लिहिलेल्या गीतालाही रफीक शेख यांनीच स्वर दिला आहे.

भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असून सारा श्रवण, अस्ताद काळे, प्राजक्ता दिघे, शेखर फडके यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा मुनावर भगत यांनी लिहिली असून महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. शशिकांत मिना या सिनेमाचे सहदिग्दर्शक असून एकेन. सेबास्टेन या सिनेमाचे केमेरामन आहेत. मेघा सपंत यांनी या चित्रपटातील तीन गाण्यांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. या सिनेमातील गीतांना संगीतकार रफिक शेख यांनी संगीत दिले असून कार्यकारी निर्माते आहेत संदिप मोरे.