Sign In New user? Start here.
reti marthi movie

"जुहूच्या वाळूवर रेखाटली 'रेती'ची सुंदर कलाकृती

 
 
 
'जुहूच्या वाळूवर रेखाटली 'रेती'ची सुंदर कलाकृती

आजच्या सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारे अनेक सिनेमे मराठीत दाखल होत आहे. विशेष म्हणजे वास्तववादी कथानकावर आधारित या सिनेमांना सर्वाधिक प्रसिद्धीही मिळते आहे. याच धाटणीचा 'रेती' हा मराठीतील आणखी एक वेगळा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट सामान्य माणसांपर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने पोहोचावा यासाठी 'रेती' सिनेमाच्या टीमने एक भन्नाट शक्कल लढवली आहे. मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जुहु चौपाटीच्या वाळूवर 'रेती' सिनेमाच्या पोस्टरची सुबक कलाकृती काढण्यात आली आहे. नारायण साहू या वाळू चित्रकाराने रेखाटलेले रेतीचे हे पोस्टर १० बाय १० लांबीचे असून, ते पाहण्यासाठी मुंबईकरांनी जुहु चौपाटीवर तोबा गर्दी केली होती. विशेष म्हणजे, चिन्मय मांडलेकर, किशोर कदम, संजय खापरे या रेती सिनेमाच्या कलाकारांनीही तिथे उपस्थिती लावली होती. या कलाकारांनी वाळूवर रेखाटलेल्या रेती सिनेमाच्या पोस्टरचे आणि वाळू चित्रकार नारायण साहू यांचे कौतुक केले. त्यासोबतच ही सुबक कलाकृती पाहण्यास जमलेल्या मुंबईकरांसोबत संवाद देखील साधला.

'वाढत्या शहरीकरणासाठी वाळूची मोठ्या प्रमाणात मागणी असून, नद्यानाल्याच्या उदरातून ती अवैध्यरित्या उपसली जात आहे. नद्यांच्या संवर्धनासाठी ही बेकायदेशीर वाळूउपसा तत्काळ थांबवायला हवी. रेती हा सिनेमा याच विषयावर आधारित असल्याचे दिग्दर्शक सुहास भोसले यांनी यावेळी सांगितले. जुहूवर सादर केलेल्या या कलाकृतीमार्फत 'रेती वाचवा' हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

अवैध्य रेती उपसा प्रकरणावर सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या राजकारण उलाढालीवर आणि सामाजिक समस्येवर मार्मिक टिप्पणी करण्याचा प्रयत्न 'रेती' चित्रपटातून करण्यात आला आहे. देवेन कापडणीस यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले असून हिंदीतला सुप्रसिद्ध गायक शान याने या सिनेमाच्या माध्यमातून प्रथमच एका मराठी सिनेमाचे संगीत दिग्दर्शन केल आहे. शानच्या 'सुपरबिया' नामक म्युझिक टीममध्ये रोशन बाळू आणि गौरव देशगुप्ता यांचा समावेश असून, या त्रिकुटांनी संजय कृष्णाजी पाटील लिखित रेती सिनेमाच्या गाण्यांना योग्य न्याय दिला आहे. अथर्व मूव्हीज या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून प्रमोद गोरे हे हया सिनेमाचे निर्माते आहेत. नाशिकमधील सटाणा, नागपूर, देवळा या ठिकाणी चित्रपटाचं चित्रिकरण करण्यात आलं आहे. या सिनेमाचे वितरण डिस्ट्रीब्युटर पीवीआर पिक्चरसोबतच इंटीटी वन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे. रेती माफियांचा पर्दाफाश करणा-या या चित्रपटात किशोर कदम आणि चिन्मय मांडलेकर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर शशांक शेंडे, संजय खापरे, विद्याधर जोशी, गायत्री सोहम, सुहास पळशीकर, दीपक करंजीकर, मोसमी तोंडवळकर, भाग्यश्री राणे आदि कलाकारदेखील आपल्या प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच येत्या ८ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.