Sign In New user? Start here.
sairat music launch

प्रेक्षकांच्या भेटीसाठी ‘सैराट’ सज्ज

 
 
 
प्रेक्षकांच्या भेटीसाठी ‘सैराट’ सज्ज

फॅंड्रीनंतर नागराज मंजुळे आता पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत एक नवा इतिहास रचण्यासाठी आपल्या आगामी ‘सैराट’ या चित्रपटातून. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे ती यातील गाण्यांमुळे. आपल्या जादुई सुरावटींची, तालाची मोहिनी घालण्यासाठी अजय-अतुल पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये यातील रिंकु राजगुरूच्या अभिनयाची विशेष दखल घेण्यात आलीच आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठीही सज्ज झाला आहे. येत्या २९ एप्रिलला तो महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांतील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

या चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाचा शानदार सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. या प्रसंगी बोलताना संगीतकार अजय गोगावले म्हणाले की, “झी सोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय त्यामुळे आमचे सूर चांगलेच जुळलेले आहेत आणि आता नागराजच्या बाबतीतही आम्ही हेच म्हणू शकतो. कोणताही चित्रपट करताना आम्ही त्याची संपूर्ण कथा पटकथा ऐकून मगच तो स्वीकारतो. सैराटची कथा ऐकतानाच त्याची एक धून माझ्या डोक्यात घुमत होती आणि तिथेच ‘याड लागलं’ गाणं तयार झालं. सैराटचं काम करतांना आम्हाला खुप आनंद मिळाला. खास करून यातील जगप्रसिद्ध सोनी स्टुडिओमध्ये जाऊन केलेलं रेकॉर्डींग हे आयुष्यभर लक्षात राहिल.” अतुल गोगावले याप्रंसगी म्हणाले की, “सैराट हा चित्रपट आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. यात आम्ही संगीताचे अनेक प्रयोग केले आहेत. आपल्या मातीतील अस्सल रांगडे शब्द आणि त्याला हॉलीवुड सिम्फनी आणि फ्युजनची सोबत हा प्रकार भन्नाट झाला आहे. सर्वच वयोगटातील श्रोत्यांना ही गाणी आवडतील आणि ती तेवढ्याच सुंदर पद्धतीने चित्रीत केली आहेत त्यामुळे ती देखणीही झाली आहेत.

सैराटमधून नागराज मंजुळे समाजातील आणखी एक दाहक वास्तव मांडणार आहेत. प्रेमाला कुठल्याच बंधनात बांधता येत नाही. भाषा, संस्कृती, जात, धर्म, प्रांत, देश या पलिकडे ते पोहोचलेलं असतं परंतु हे वास्तव आजही समाजात स्वीकारलं जातंच असं नाही. आपण एकविसाव्या शतकात वावरतोय, आधुनिक विचारसरणी त्यातून होणारी जडण घडण, आधुनिक माध्यमे त्यातून होणारी विचारांची आणि विकासाची प्रक्रिया यो गोष्टी एका बाजुला वेगाने घडत असतानाच दुसरीकडे अजूनही जातीपातीचे विचार, धर्मांधता या गोष्टीही समाजात टिकून आहेत आणि हे भीषण वास्तव आहे. याच वास्तवाचं एक रूप सैराटमधून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

सैराटमध्ये अजय-अतुल यांच्या संगीताने सजलेली चार गाणी आहेत आणि सध्या सोशल नेटवर्कवर ही तुफान लोकप्रिय झाली आहेत. यातही विशेष उल्लेख करावा लागेल तो ‘याड लागलं’ आणि ‘झिंगाट’ या गाण्यांचा. काही दिवसांतच लाखाच्यावर हिट्स मिळवलेल्या या गाण्यांबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यातील ‘याड लागलं’, ‘झिंगाट’ आणि ‘आताच बया का बावरलं’ हे गाणं अजय-अतुल यांनीच लिहिलं आहे तर त्यांच्या सोबतीने सैराट झालं जी हे गाणं नागराज मंजुळे यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर अजय गोगावले यांच्या सोबतीने चिन्मयी श्रीपदा आणि श्रेया घोषाल यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. झी म्युझिकच्या द्वारे ही गाणी श्रोत्यांच्या भेटीस आली आहेत.

नागराज मंजुळे यांची कथा पटकथा आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू ही फ्रेश जोडी प्रमुख भूमिकेत बघायला मिळणार आहे. याशिवाय चित्रपटात सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार, तानाजी गलगुंडे, अरबाज शेख, छाया कदम, भुषण मंजुळे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटातील बहुतेक सर्वच कलाकार हे नवखे असले तरी त्यांच्या अभिनयातून ग्रामीण बाज आणि त्या मातीतील अस्सलपण समोर येतं हे विशेष. हा ग्रामिण बाज आपल्या कॅमेरातून उत्तमरित्या टिपलाय छायालेखक सुधाकर रेड्डी यांनी. चित्रपटासाठी संतोष संखद यांनी कलादिग्दर्शन सांभाळलय तर वेशभूषा गार्गी कुलकर्णी आणि प्रियंका दुबे यांनी रंगभूषा समीर कदम तर संकलन कुतुब इनामदार यांनी केलंय.