Sign In New user? Start here.
yz giri

पुन्हा एकदा शनी शिंगणापूर चर्चेत

 
 
 
पुन्हा एकदा शनी शिंगणापूर चर्चेत

चौथऱ्यावर महिलांना प्रवेश न देण्यावरून शनी शिंगणापूर देवस्थान चर्चेत आलं होतं. आता पुन्हा एकदा शनी शिंगणापूर पुन्हा चर्चेत येणार आहे. त्याचं कारण आहे, 'चौर्य' हा चित्रपट. या चित्रपटाची कथा शनी शिंगणापूरवरून प्रेरित असून, ५ अॉगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून राजन आमले हे सहनिर्माते आहे. चित्रपटाची प्रस्तुती नवलाखा आर्ट्स व साधना सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमानाने केली आहे. याआधी शाळा, फँड्री, सिद्धांत अशा एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईने केली आहे.

समीर आशा पाटील हा नव्या दमाचा लेखक दिग्दर्शक या चित्रपटातून पदार्पण करत आहे. किशोर कदम, गणेश यादव, मिलिंद शिंदे, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास,दिनेश लता शेट्टी, तीर्था मुरबाडकर आणि श्रुती कुलकर्णी आदींच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

जागृत देवस्थान असल्यानं या गावात चोरी होत नाही. चोरी करणाऱ्यांना देव शिक्षा करतो, अशी गावातल्या रहिवाशांची धारणा असते. त्यामुळे गावातल्या घरांना दरवाजे नसतात. परंतु एकाएकी या देवळातच चोरी होते आणि लोकांच्या श्रद्धेला तडा पोहोचतो.…सस्पेन्स थ्रिलरची अनोखी सांगड असल्यामुळे चित्रपटात पुढे नक्की काय घडतं यासाठी आपल्याला हा चित्रपट पहावा लागणार आहे.

मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच Accessibility Format चा अभिनव प्रयोग या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात येणार असून अंध आणि कर्णबधीरांनादेखील ह्या चित्रपटचा आनंद हा सर्वसामान्य लोकांप्रमाणे घेता येणार असल्याचे निर्माते निलेश नवलखा यांनी सांगितले.'उत्तम कथा, लोकेशन्स आणि सस्पेन्स थ्रिलरची योग्य सांगड यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा असल्याचे, दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी सांगितलं.