Sign In New user? Start here.

सुखविंदर सिंग यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्याने मराठी चित्रपटाचा मुहूर्त

 
 

सुखविंदर सिंग यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्याने  मराठी चित्रपटाचा मुहूर्त

मराठी चित्रपटाच्या बदलत्या परिभाषेने रुपेरी पडदा अधिक विस्तारु लागला आहे. मराठी सिनेमा आशय–विषय तसेच सुमधुर गाण्यांमुळे आज ओळखला जाऊ लागला आहे. आपल्या गायकीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केलेल्या गायक सुखविंदर सिंग यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्याने नुकताच राजा या मराठी चित्रपटाचा मुहूर्त उत्साहात संपन्न झाला. ‘सत्यसाई मल्टीमिडीया प्रा.लि’ या चित्रपट निर्मिती संस्थेचे निर्माते प्रवीण काकड यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून सहनिर्मिती नरेश साखरे यांची आहे. या मुहूर्त प्रसंगी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, डॉ.अजिंक्य डी.वाय.पाटील (चेअरमन- डी. वाय.पाटील ग्रुप), प्रवीण दराडे (मुख्यमत्र्यांचे सचिव), अतिरिक्त महासंचालक सुरेंद्र पांडे, डॉ. हुज खोराकीवाला (चेअरमन– वोकार्ड ग्रुप), प्रताप दिघावकर (अतिरिक्त पोलिस आयुक्त), रणजीत ढाकणे (महानगरपालिका उपायुक्त), उद्योजक गौरव खाडे, प्रवीण तलरेजा व दिलीप पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

‘रातभर... गावभर... होऊ दे बोभाटा झन झन झनन झनन वाजवू झन्नाटा...’ हे गाणे सुखविंदर सिंग यांनी गायले असून, या गाण्यात स्वतः सुखविंदर सिंग थिरकताना दिसणार आहे. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केलं आहे. ‘या गाण्यावर परफॉर्म करताना खूपच मजा आली’ असं सांगत प्रेक्षक हे गाणं नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास सुखविंदर सिंग यांनी व्यक्त केला.

पॉप सिंगरच्या आयुष्यावर राजा ची कथा बेतली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून संवाद मिलिंद इनामदार व शशिकांत देशपांडे यांनी लिहिले आहेत. वलय मुळगुंद यांच्या लेखणीने सजलेल्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. सौरदीप कुमार, स्वरदा जोशी, निशिता पुरंदरे, शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, पौरस देशपांडे आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन दामोदर नायडू याचं आहे. निर्मिती व्यवस्थापक पूनम घोरपडे तर कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आहेत. वेशभूषा पूर्णिमा ओक यांची असून रंगभूषा शरद सावंत यांनी केली आहे.

--------------------