Sign In New user? Start here.
yari dosti film crew celebrating friendship day

यारी दोस्ती'त साजरा झाला फ्रेंडशिप डे

 
 
 
'यारी दोस्ती'त साजरा झाला फ्रेंडशिप डे

आयुष्याच्या वाटेवर दिशादर्शक ठरणारा महत्वाचा वाटसरू म्हणजे मित्र. केवळ आनंदाच्या वेळी नव्हे तर दुःखात निरंतर सोबत करणारा सखा म्हणजे मित्र, तश्या मैत्रीच्या अनेक परिभाषा आणि व्याख्या आहेत. अशीच एक परिभाषा शांतनू अनंत तांबे दिग्दर्शित 'यारी दोस्ती' हा सिनेमा मांडत आहे. किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या चित्रपटाचं ट्रेलर आणि टायटल सॉंग नुकतंच मुंबई येथील साठ्ये महाविद्यालयात प्रदर्शित करण्यात आले. फ्रेण्डशिप डे च्या आठवड्यात आणि महाविद्यालयातील तरुणांसोबत दोस्तीच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करणे ही खरी तर फ्रेण्डशिप डे ची भेटच म्हणायला हवी.

'मैत्री' या विषयाला महत्व देणारा हा ट्रेलर प्रत्येकाला शाळेतील आपल्या 'यारी दोस्ती'ची आठवण करून देणारा आहे.दोन शाळकरी आणि दोन अशिक्षित,गरीब अशी परिस्थितीच्या विरुद्ध असणाऱ्या चार मित्रांची कथा या ट्रेलरमध्ये दिसून येते. अनावधाने एकत्र आलेल्या या चार मित्रांची धम्माल यात पाहायला मिळते, पण त्यासोबतच शाळा, वर्ग आणि शिक्षक हे सुद्धा ओघाने आलंच. किशोरवयीन जीवनात फुलणाऱ्या नाजूक प्रेमाची कळी देखील, या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. शिवाय एकाच नावाची दोन मुले दाखवणारा हा ट्रेलर 'यारी दोस्ती'च्या मैत्रीची ट्युनिंग सिद्ध करते. नॉस्टेलजिक करणाऱ्या या सिनेमाच्या ट्रेलरनंतर 'यारी दोस्ती' चे टायटल सॉंग लॉन्च करण्यात आले.

दिग्दर्शक शांतनू अनंत तांबे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याचे दिग्दर्शन प्रवीण मनोज यांनी केले असून तरुणाईंचा लाडका गायक अवधूत गुप्ते आणि प्रवीण धोने या दोघांनी ते गायले आहे. मस्तीचा जल्लोष आणि महाविद्यालयीन तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात झालेल्या या 'यारी दोस्ती'च्या कार्यक्रमात हंसराज जगताप, आकाश वाघमोडे, आशिष गाडे, सुमित भोकसे, संदीप गायकवाड आणि नम्रता जाधव या सिनेमाच्या कलाकारांनी देखील उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे साठे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील त्यांना प्रतिसाद घेत कार्यक्रम रंगात आणला. या सर्व कलाकारांची ओळखच मुळात मनोरंजक पद्धतीने करण्यात आली होती. सिनेमातील आपल्या भूमिकेविषयी सांगितल्यानंतर या सर्व कलाकारांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद देखील साधला. शिवाय सोशल मीडियावर धूम ठोकत असणाऱ्या 'यारी दोस्ती' सिनेमातील गणपतीवर आधारित 'बाप्पा बाप्पा' या गाण्यावर थिरकत विद्यार्थ्यांनाही आपल्यासोबत ठेका धरण्यास भाग पाडले. आदर्श शिंदे यांच्या भारदस्त आवाजातील हे गाणे आगामी गणेशोत्सवात रसिकांचा उत्साह वाढवण्यास पुरेसा ठरणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी 'यारी दोस्ती' सिनेमाला आणि कलाकारांना चिअर-अप करण्यासाठी हजेरी लावली होती. बिपीन शाह मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट्स निर्मित 'यारी दोस्ती' हा सिनेमा लवकरच १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. यात मिताली मयेकर, श्रेयस राजे, निशा परुळेकर, अशोक पावडे आणि जनार्दन सिंग यांच्यादेखील ठळक भूमिका पहायला मिळणार आहेत.