Sign In New user? Start here.

अमृतवेल...

भरतभूमीचं भाग्य उजळलं...! तिच्यात चांदण्याचं बीज रुजलं.....स्वरांची बरसात झाली .......बीज अंकुरलं...लयीत वाढ़ू लागलं... तालावर डोलू लागलं.... आणि त्या अंकुराची अमृतवेल झाली....! अमृतवेल फोफावली...

अमृतवेल.....

 

संगीता जोशी

एकदा काय झालं,

भरतभूमीचं भाग्य उजळलं...! तिच्यात चांदण्याचं बीज रुजलं.....स्वरांची बरसात झाली .......बीज अंकुरलं...लयीत वाढ़ू लागलं... तालावर डोलू लागलं.... आणि त्या अंकुराची अमृतवेल झाली....! अमृतवेल फोफावली...राग-रागिण्यांच्या पानांनी डवरली...गीतांच्या दिव्यसुगंधी फुलांनी मोहरली....उंचउंच गेली.. अमृतवेल गगनावर चढली..!.. अमृतवेल..अमृताची लता ! लता मंगेशकर..! २८ सप्टेंबर १९२९ हा त्यांचा जन्मदिवस... त्यानिमित्त या वेलीच्या गीतफुलांचं स्मरण होणं अपरिहार्यच आहे..त्यातील हे एक ..

हाले दिल यूं उन्हें सुनाया गया,
आँख ही को जुबाँ बनाया गया...

हे शब्द कवी राजेंद्रकृष्ण यांचे....शब्द.. संत तुकाराम म्हणतात, &&आम्हां घरी आहे, शब्दांचेच धन..& कवींना तर शब्दांचे राजे म्हणतात...तरीही शब्द केव्हा केव्हा ख़ुंटतात... अडखळतात. तोकडे पडतात. माणसाच्या मनाला स्वत:मध्ये सामावण्याचा त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरतो.. शब्द निप्रभ होतात...हा तर आणीबाणीचा प्रसंग !अशावेळी माणसानं भावना व्यक्त करायच्या तरी कशा? पण कवीला व प्रेमिकांना ह्या प्रश्नावरही मात करता येते...वरील दोन ओळीत म्हटल्याप्रमाणे डोळ्यांनाच बोलतं करता येतं..डोळ्यांनीच ह्रदयाची प्रेमामुळे झालेली अवस्था प्रेमी सांगू शकतो.. इन्तज़ार करून शिणलेले डोळेच सांगतात की,

जिंदगीकी उदास रातोंको
आपकी यादसे सजाया गया...

जीवनातल्या त्या काळ्याकुट्ट, उदास अन् एकाकी रात्री ! पण त्याही रात्रींना आम्ही सजविण्याचा प्रयत्न केला, तुझ्या आठवणींनी...!

अशी आठवणींवर गुजराण करण्याची वेळ एखाद्यावर का यावी? पण ती येते. कारण पुन्हा शब्द. माणसं शब्द देतात; पण क्वचितच पाळतात. ही वस्तुस्थिती मानायला प्रेमी मन मात्र तयार नसतं. शब्दांवर विश्वास ठेवायचा आणि स्वत:ची फसवणूक करून घेत रहायचं, हीच एक आंधळी मालिका सुरू राहते..पण अशा वाटचालीतून प्रेमाच्या ईप्सितापर्यंत थोडंच पोहोचता येतं?

इष्क़ की वो भी एक म़ंजिल थी
हर क़दमपर फ़रेब खाया गया..

पावला-पावलांगणिक फसगत (फ़रेब) हा देखील प्रेमाच्या पूर्ततेचा (म़ंजिल) चा एक भागच असावा.

फसगतीच्या अशा ठेचा खात प्रीतीचा खडतर मार्ग अविचलपणे आक्रमत राहणं ही काही सोपी गोष्ट नाही.कारण स्वत:ची फसगत झाल्याची दुष्ट जाणीव माणसाला एकही सुखाचा श्वास घेऊ देत नाही. तो बेचैन होतो..अस्वस्थ होतो.. मन तडफडतं... पण ही तडफड मात्र लपवावी लागते.

दिलपे इक वो भी हादसा गुजरा
आजतक उनसे जो छुपाया गया...

मनावर गुदरलेल्या संकटामुळे (प्रीतीच्या) ते उद्ध्वस्त झालं हे खरं, पण आम्ही मात्र आजवर ते मोठ्या शिकस्तीनं त्यांच्यापासून लपवून ठेवलं आहे..

बिचारं मन !! ते अशा संकटांना सर्व तयारीनिशी सामोरं जातं.झगडतं. सोशिक असूनही जखमी होऊन राहतं... तरीही आपले घाव लपवण्याचा प्रयत्न करतं. अशा घायाळ मनानं जीवन जगण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्या विधात्याला विचारावंसं वाटतं ,

लाख तूफाँ समेटकर यारब
किसलिये एक दिल बनाया गया...?

हे ईश्वरा, लाखो वादळं , संकटं एकत्र केलीस नि हे माणसाचं मन घडवलंस; सांग ना, कशासाठी केलंस असं ? का निर्माण केलंस तू हे मन ? वादळं सामावून घेऊन उद्ध्वस्त होण्यासाठीच ना??

ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यास परमेश्वराजवळ शब्द नसावेत; नाहीतर त्याचं उत्तर कवीनं पुढच्या शेरात नक्की सांगितलं असतं ...

कवीच्या शब्दांचं सामर्थ्य असं काही असतं की ते शब्द आपोआप सुरांना उद्युक्त करतात..शब्दांचा सुगंध जेव्हा सुरांच्या पाकळ्यांच्या कोषात विराजमान होतो, तेव्हा त्याचं एक सुंदर फूल बनतं.. आणि जेव्हा ते लताजींच्या कंठातून उमलतं तेव्हा रसिकांना भृंग होण्यावाचून गत्यंतर नसतं..! जहाँआरा ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मदनमोहन, राजेंद्रकृष्ण आणि लता या तिघांनी मिळून ही पुष्पभेट रसिकांना सादर केली होती...लताजींनी आपल्या सर्वांचं जीवन समृध्द केलंय्......

लताजींना आपण कृतज्ञतेच्या फुलांचा गुच्छ देऊन दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊ या...

संगीता जोशी