Sign In New user? Start here.

और कुछ देर ठहर.....

उजाडलंय्! पण चंद्र अजूनही पश्चिमेला कललेला दिसतोय्. मधुर रात्र कशी संपली कळलंच नव्हतं..! कळणार तरी कसं ? प्रेमात बुडलेल्या दोन जीवांना सर्वस्व समर्पणाखेरीज दुसरं कशाचं भान असणार? काश्मीरचा रम्य प्रदेश, गुलाबी थंडी आणि फुलांचा वर्षाव करणारा धुंद मोसम...प्रेमी युगुलाला बेभान करणार्याा या अनुकूल वातावारणात प्रेमाची तहान वाढतच राहणार ना...त्याला तर सारं अपूर्णच वाटतंय् आणि तिला आता निघावंच लागणार आहे...मनात नसलं तरी...पाय निघत नसला तरी...कारण तिला तिचा समाज साद घालतोय्.. ती एक स्त्री..तिला भानावर यावंच लागतं.. त्यालाही समजवावं लागतं...पण

और कुछ देर ठहर.....

 

संगीता जोशी

उजाडलंय्! पण चंद्र अजूनही पश्चिमेला कललेला दिसतोय्. मधुर रात्र कशी संपली कळलंच नव्हतं..! कळणार तरी कसं ? प्रेमात बुडलेल्या दोन जीवांना सर्वस्व समर्पणाखेरीज दुसरं कशाचं भान असणार? काश्मीरचा रम्य प्रदेश, गुलाबी थंडी आणि फुलांचा वर्षाव करणारा धुंद मोसम...प्रेमी युगुलाला बेभान करणार्याा या अनुकूल वातावारणात प्रेमाची तहान वाढतच राहणार ना...त्याला तर सारं अपूर्णच वाटतंय् आणि तिला आता निघावंच लागणार आहे...मनात नसलं तरी...पाय निघत नसला तरी...कारण तिला तिचा समाज साद घालतोय्.. ती एक स्त्री..तिला भानावर यावंच लागतं.. त्यालाही समजवावं लागतं...पण तो अजून त्याच्या स्वप्नमय दुनियेतून जागा व्हायला तयार नाहीए...ती जाऊ पहातेय् अन् तो तिला अडवतोय्....

और कुछ देर ठहर, और कुछ देर न जा...
रात बाकी है अभी, रातमें रस बाकी है
पाके तुझको,तुझे पानेकी हवस बाकी है
और कुछ देर ठहर, और कुछ देर न जा.....

ते दोन प्रेमी पुन्हा पुन्हा एकमेकांना नजरेत सामावून घेताहेत... तो पंचविशीतला राजेश खन्ना अन् ती इंद्राणी मुखर्जी....

जिस्मका रंग फजा में जो बिखर जाएगा
मेहरबां हुस्न तेरा और निखर जाएगा
लाख जालिम है जमाना मगर इतना भी नहीं
तू जो बाहों में रहे, वक्त ठहर जाएगा
और कुछ देर ठहर, और कुछ देर न जा....

ब्लॅक एण्ड व्हाईट मधला कोवळा तरुण राजेश.. त्याचा तो कट्स् पाडल्यासारखा रेखीव चेहरा.. आणि तरूणींना मोहवून टाकेल अशी प्रेमाची अदा...त्याचवेळी त्यानं अनेक सुंदरींची हृदयं जिंकली होती....

हा राजेश खन्नाचा पहिला रिलीज झालेला सिनेमा.. रंगित ''आराधना'' तर अजून यायचा होता. पण यशाची नांदी या ''आखरी खत '' नेच सुरू झाली होती ! ( याचं नाव मग 'पहेला खत' शोभलं असतं का?....उगाच आपली शब्दक्रीडा...!) दिग्दर्शक चेतन आनंद नी नायक म्हणून राजेशला निवडतांना बराच विचार करून,दूरदृष्टी वापरली असावी.

त्या काळात देव आनंद फेस-लिफ्ट वगैरे करूनही उतरणीला लागला होता..पडद्याला रोमँटिक हीरोची उणीव भासत होती... आणि राजेश त्या पडद्यावर फिट बसला...इंद्राणी गोड असलेल्या बोलक्या चेहर्यानची नटी होती. पण ती नंतर नायिकेच्या भूमिकेत का दिसली नाही कोण जाणे... हे गाणं 1966 च्या काळातलं. गाण्याच्या सुरवातीवरून, त्या दोघांची सरलेली रात्र कशी गेली असेल याचा प्रेक्षकाला अंदाज येतो. पण सबंध गाण्यात कुठेही भडक शृंगार नाही..हे विशेष. राजेश तर त्यावेळी नवाच होता त्यामुळे त्याचे मॅनेरिझम असे सेट झालेले नव्ह्ते.

पण झलक मात्र आज पाहतांना लक्षात येते... तू जो बाहोमें रहे... ही ओळ गातांना दोघे स्वाभाविक पणे जवळ येतात...

शेवटच्या कडव्यात कैफी आजमी लिहितात,
जिंदगी अब इन्हीं कदमों पे लुटा दूं तो सही
ऐ हसीं बुत, मैं खुदा तुझको बना लूं तो सही
और कुछ देर ठहर, और कुछ देर न जा....

मला माझं आयुष्य तुझ्या पायाशी वाहू तर दे ! तुला देवत्व देऊन मला समाधान तर मिळू दे, मग हवं तर जा.... पण आत्ता थांब ना. आणखी थोडावेळ तरी थांब ग!....गाण्यातल्या ह्या अखेरच्या आर्जवानंतर दहा पावलं लांब गेलेली ती परत फिरली नाही तरच नवल ! ...आणि हलक्याशा मिठीत हे गाणं संपतं.....नायक-नायिकेलाच काय आपल्यालाही हुरहुर लागते....

हा सिनेमा छान चालला. पण पहिल्या रन पेक्षा दुसर्यात रनला धो-धो चालला. आगगाडीच्या दोन रुळांमधून एक बालक पाठमोरं चालतांना दाखविलेली ती छापील जाहिरात आजही आठवतेय्. राजेश खन्ना हे नाव ठळकपणे लक्षात राहिलं. तो चित्रपटसृष्टी गाजवणार हे भाकितही मनात पक्कं झालं होतं.....

'और कुछ देर ठहर' असं काळाला कितीही विनवून म्हटलं तरी तो थोडाच थांबतो?.....

प्रसारमाध्य.मांनी राजेश खन्नाला श्रध्दांजली म्हणून त्याची खूप गाणी त्या काही दिवसात दाखविली. ती आवडीने व दुःखयुक्त अंतःकरणाने पाहिलीदेखील. पण ह्या गाण्याची वाट पाहूनही हे गाणं दिसलं नाही. कदाचित् black & white म्हणून मागे ठेवलं गेलं असावं.

पण शृंगारिक दृश्ये नसूनही ह्या गाण्यातला संयत रोमान्स पाहून कुणीही सुखावून जाईल....

हे गाणं रफीनं गायलं आहे... ते यू-ट्यूबवर ऐकाच.....

संगीता जोशी.