Sign In New user? Start here.

चला शूटिंगला....भाग - १

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याचं एक टुमदार गाव. त्या गावातला एक जुना वाडा. आधीच सुस्त असलेल्या गावातला तो अधिकच शांत परिसर. उजाडताच नळाला एकवेळ पाणी येई तेव्हाच काय ती धावपळ, तारांबळ. अर्ध्या तासात, पाण्याचा शेवटचा थेंब भरून झाला की पुन्हा शांतता..... हंऽऽ, कधीकधी वाड्यातल्या बिर्हााडकरूंची भांडणं व्हायची तेव्हा त्या शांततेला हजार जिभा फुटायच्या, ते वेगळं ! एरव्हीची सुस्ती पाहिली की वाटायचं, अशी गावं देशात कितीतरी असतील, ज्यांची माहिती नकाशालासुध्दा नसेल....

चला शूटिंगला....भाग - १

 

संगीता जोशी

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याचं एक टुमदार गाव. त्या गावातला एक जुना वाडा. आधीच सुस्त असलेल्या गावातला तो अधिकच शांत परिसर. उजाडताच नळाला एकवेळ पाणी येई तेव्हाच काय ती धावपळ, तारांबळ. अर्ध्या तासात, पाण्याचा शेवटचा थेंब भरून झाला की पुन्हा शांतता..... हंऽऽ, कधीकधी वाड्यातल्या बिर्हााडकरूंची भांडणं व्हायची तेव्हा त्या शांततेला हजार जिभा फुटायच्या, ते वेगळं ! एरव्हीची सुस्ती पाहिली की वाटायचं, अशी गावं देशात कितीतरी असतील, ज्यांची माहिती नकाशालासुध्दा नसेल....

मात्र असं समजू नका हं, की या वाड्यातल्या माणसांना देशाची माहिती नाही ! तसं शक्य तरी आहे का? आता 'तो' खेडोपाडी पोहोचलाय ना. त्यामुळे 'इंडस्ट्रीची' इत्थंभूत ओळख झालेली असते सर्वांना. कुठली इंडस्ट्री, काय विचारताय्? अहो, सिनेमाची! आणि तो म्हणजे टीव्ही हो ! कुठल्याही खेड्यात जाऊन विचारा हवं तर. पण भलतंसलतं नका हं विचारू. मॅगसेसे पुरस्कार कोणाला मिळाला, भारतानं आत्ताच कोणता उपग्रह सोडला, कोणते परदेशी पाहुणे नुकतेच आपल्या देशात येऊन गेले, कोण प्रसिध्द कवी व कादंबरीकार पाठोपाठ निवर्तले... असले कठीण प्रश्न नका विचारू.. किंबहुना देशाचं नावही नका विचारू.. मग कुठले प्रश्न विचारले तर चालतील ते सांगू? अगदी सोपे सोपे हो! कटरीना चा नवा 'पिच्चर' कुठला येतोय्? त्या अमक्या सिनेमात ऐश्वर्याची डान्सच्या वेळची साडी कुठल्या रंगाची आहे? अमक्या सिनेमात अमक्या नटीनं घातलेला ब्रेसलेट डाव्या हातात होता की उजव्या? अशा प्रश्नांना अचूक उत्तरं मिळतील बरं का....

sangita joshi

तर, अशा या गावातल्या त्या वाड्याबद्दल मला सांगायचंय्. तिथे आज अवेळीच धावपळ अन् तारांबळ दिसत होती. विसपुते वहिनी अंथरूणात अर्धवट जाग्या होत्या. पाणी भरून झालं की एक डुलकी काढायचा त्यांचा नेहमीचा शिरस्ता होता. रोजच्यासारखी शांतता का नाही? आज भातेवहिनी, साबळेमावशी इतक्या लवकर कामाला लागल्यात की काय? दोघींच्याहीकडली ' पित्रं ' तर होऊन गेलीत, नि घट बसायलाही अजून उशीर आहे. मग का बरं ही धावपळ? ...पडल्या पडल्या बरेच विचार मनात येऊन गेले... मान तिरकी करून खिडकी वरचा पडदा सारत विसपुते वहिनींनी समोरच्या बिर्हााडाच्या खिडकीकडे पाहिलं. खडकेवहिनी उठलेल्या दिसत नव्हत्या. अर्थात् त्यांच्याशी काय करायचं म्हणा ! त्यांच्याशी विसपुतेवहिनींचा अबोलाच होता. दोघी एकमेकींना 'भांडकुदळ' म्हणत व दोघी कडाकडा भांडत.

विसपुतेवहिनींचा पुन्हा डोळा लागेना. त्यांनी आणखी चाहूल घेतली. अगोबाई ! साबळेमावशीही आवरतांना दिसताहेत. त्यांची सून शाली आणि छोटी नात श्वेताही उठलीय्. आंघोळी वगैरे आटपून तिघी तय्यार! विसपुतेवहिनींना वाटलं, सगळ्या मिळूनच चाललेल्या दिसतायत् कुठेतरी ! देवदर्शनाला की ट्रिपला? कोणास ठाऊक ! पण मला मात्र एकीनंही विचारलं नाही !

या विचारासरशी विसपुतेवहिनी उठल्या आणि ब्रशवर पेस्ट घेऊन (अहो, गावातल्या लोकांनाही जाहिरातींनी आधुनिक राहणी शिकवलीय् म्हटलं ) हौदावर आल्या. घाईघाईनं, धुणं न धुता तसंच आत नेणारी शाली भेटली.

''काय ग,शाले? आज एवढी घाई का, म्हणते मी? कुठं जायचंय् वाटतं?''
''अय्या. तुम्हाला बोलल्या नाहीत सासूबाई? काल रात्रीच आम्हाला कळलं ''—शाली

sangita joshi

''काही बोलल्या नाहीत साबळेमावशी. पण काय, ते तर सांगशील. आता, मला सांगायचं नसेल तर राहू दे हो.'' वि.वहिनी.
''इश्य ! न सांगायला काय झालं ? उलट तुम्ही सुध्दा चला हवंतर आमच्याबरोबर''
'' कुठे, ते तर सांग'' आता वि. वहिनी खुलल्या होत्या..

''अहो, तुम्हाला माहित आहे ना? आपल्या इथल्या खिंडीत शूटिंग चाललंय् रोज. शाहरुख खान आणि राणी मुखर्जीचं. सगळे तिकडेच जाताहेत. काल ती मंगल गेली होती ना, ती सांगत होती, ...केव्हढी गर्दी ! आख्खं गाव लोटलं होतं... म्हणून सगळ्यांनी ठरवलं, आज आपणही जायचं. भातेवहिनीही येताहेत. श्वेतालाही घेऊन जातोय्.

भात्यांची जुही आहेच ना. दोघी असल्या की कंटाळणार नाहीत. ''—शाली.
'' मी पण येते की म तुमच्याबरोबर.'' वि.वहिनी अधिकच खुलल्या.

sangita joshi

'' चला ना. आटपा लौकर. थोडासा डबा घ्या बरोबर.काही घरात असेल ते. आम्ही तर सैपाक करून घेतलाच आहे. मुली आहेत ना...''

'' लग्गेच आवरते बघ मी. नाहीतरी हे आज पुण्याला जायचेत. विशाल (आठवीत असलेला) येईल आपल्यासोबत. पण काय गं? काल तरी बोलायचंस. तुला माहीत नाही का, शाहारूख हा माझा आवडता आहे! बाजीगर मी सात वेळा पाहिला आणि डीडीएलजे चारवेळा ! विसरलीस वाटतं ? ''--- वि. वहिनी.

sangita joshi

''जाऊ दे , आता सांगितलं ना? आटपा आणि चला लौकर.''
'' ए शाले, असं करू या का? खडकेवहिनींनाही तू विचार. नाही, आम्ही भांडतो ग! पण तिचाही अगदी लाडका आहे शाहारूक. आणि पुन्हा पुन्हा येणारै का अशी संधी? ''
'' तुम्हीच विचारा नं एवढा जीव तुटतोय् तर. '' शाली म्हणाली.
काही न बोलताच वि.वहिनी आपल्या घरात आल्या. येता येता ओरडून म्हणाल्या, ''शाले, हाक मार गं निघतांना...''
शाहरुख ला बघायला सगळेच उत्सुक होते. साबळे मावशींचा नवरा—साबळेकाकाही यात मागे नव्हते. सगळे ट्रिपला निघाल्यासारखे डबे, पाण्याच्या बाटल्या इ. सरंजामासह तयार झाले.
(आमच्या वाड्यातल्या या 'सत्यकथेत' पुढे काय झालं, ते पुढच्या भागात...)

संगीता जोशी.