Sign In New user? Start here.

चला शूटिंगला भाग - २

घाईघाईतही विसपुते वहिनी जरीची साडी नेसल्या. शाहरूखला भेटायला जायचं म्हणजे 'व्यवस्थित नको का?'... हो..नाही..करत त्या खडके वहिनींच्या दरवाज्यापाशी गेल्या व कडी वाजवली. ख.वहिनींनी दार उघडलं अन् त्या सर्दच झाल्या. आधी आश्चर्य व नंतर कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं.

चला शूटिंगला भाग - २

 

संगीता जोशी

घाईघाईतही विसपुते वहिनी जरीची साडी नेसल्या. शाहरूखला भेटायला जायचं म्हणजे 'व्यवस्थित नको का?'... हो..नाही..करत त्या खडके वहिनींच्या दरवाज्यापाशी गेल्या व कडी वाजवली. ख.वहिनींनी दार उघडलं अन् त्या सर्दच झाल्या. आधी आश्चर्य व नंतर कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं.
' हे बघ नलू, भांडणं विसरून मी आलेय्, तुला सांगायला. जवळच्या खिंडीत शाहरूखचं शूटिंग चालू आहे म्हणे. आम्ही सगळे निघालोय्. तुझा चान्स हुकेल म्हणून तुला सांगायला आलेय् बघ. येतेस का?'' वि.वहिनी.
खडकेवहिनी पुरत्या गोंधळल्या. पण मनातून हरखल्याही ! सुनीता म्हणजे विसपुतेवहिनी तशी त्यांची मैत्रीणच होती आधी. ती आपणहोऊन बोलायला आली हे एक आणि शाहरूख ची स्पेशल बातमी हे दुसरं कारण, खूष होण्याचं!
शेवटी सर्व लवाजमा कुलुपं लावून निघाला तो एस.टी.स्टँडवर. तो पायी जाण्याच्या अंतरावरच होता. साबळे काका चौकशीच्या खिडकीवर पोहोचले. ''खोटेवाडीची गाडी केव्हा आहे, हो?''
''ती काय लागलीय फलाटाला.ज्यादा गाडी आहे, पाटी न्हाई त्याच्यावर. इतक्या खोटेवाडीच्या पाट्या आनायच्या कुटनं? सम्दी गर्दी सारखी खोटेवाडीला निघली आहे परवापास्नं. तो शाहरुक आन् ती रानी! त्येंच्यामुळं आमच्यावर केवढा लोड आलाय्, तिच्या ***''
एस्टी कर्मचारी थोडं साबळे काकांशी व थोडं स्वतःशी बोलत होता.
''ए, चला, चला. ती आपली गाडी...'' सगळे कसेबसे गाडीत चढले. गाडी भरतच आली होती. उतरलेले सगळे खुषीत होते. आधीची खूप गर्दी दिसली. डोक्यावर टोप्या असलेले,

sangita joshi

डोक्यावर रुमाल बांधलेले पुरुष, ऊन टाळण्याचा प्रयत्न करीत पदर घेणार्याड बायका, लहान मुले-शेंबडी-उघडी,...सगळा खेडवळ समुदाय. आपल्या गावाजवळ शूटिंग असल्यामुळे त्यांना कृतकृत्य वाटत होतं. नवीन भर पडलेल्या माणसांनी रेटारेटी करत 'जागा' मिळवली.गर्दीच्या डोक्यावरून, आपल्या टाचा उंचावून बघण्याचा प्रयत्न चालवला. आपली वाड्यातली 'बहादुर' मंडळी वाट काढत पुढे घुसली.त्यापेक्षा पुढे जाणं अशक्यच होतं. बंदोबस्त होता, पण पोलीसही वैतागलेले होते. ते फक्त खेकसत होते. नुकताच गणेशोत्सव संपवून जरा कुठे श्वास घेतोय् तर हे लचांड...अर्थात् 'पुढे' उभं राहून नटनट्यांना 'पाहण्याचा' आनंदही काही कमी नव्हता !

'' ए, आनखी फुडं कुटं जाता आता ? व्हा मागं !'' शिपायाच्या दमासरशी साबळे-भाते इ. मंडळींनी मागे हटल्यासारखं केलं. नजरा मात्र शोधत होत्या.'' कुठाय् गं शाहरुक?''...''अगं थांब ना, शूटिंग सरू होईल तवा येईल.'' ''पण, नक्की आहे ना शूटिंग?'' अशी वाक्यं ऐकू येत होती. सूर्य अगदी माथ्यावर होता. उन्हाचा त्रास होत होता. पण सारे तो मनापासून सोसत होते....
शूटिंग होणार होतंच. काल पाहिलेल्यांनी माहिती पुरवली. ''ते पत्रे दिसताहेत ना? त्यांनी लायटी पाडतात, आन् तो बाबा हाए न तो फोटो काढतो.... आम्ही पन कवाचे आलोत. पन अजून सुरू व्हईना....रानी नं? बगितली नं काल...पन लई लाम्बून...काय नीट दिसलीच न्हाई...आन् शारुक? हां.. व्हता तो पन. जीन पँटीत व्हता....पन चेहरा काय येवडा कळला न्हाई...''
''कसलं शूटिंग झालं म्हणता व्हय ? अवो, ती ऽऽ, तिकडनं अशी गाडी येती.
लई झ्याक बगा. त्या गाडीमंदी दोघं असतात. ती रानी त्यातनं उतरती,... येवढंच पाच-सा वेळा बघितलं. सारखं त्येच त्येच. मग कटाळा आला मस्नी...पोलीस जवळ बी जाऊ दीनात...मंग गेलो घरला....'' काल पाहिलेल्यांच्या कडून मंडळी माहिती घेत होती.

sangita joshi

साबळे आणि कंपनी हे किस्से ऐकत होती. बराच वेळ झाला होता... घरून निघतांनाचा उत्साह ओसरू लागला होता...मुलांनाच नाही, सगळ्यांनाच भूक-तहान लागली होती...उन्हातल्या तापलेल्या रस्त्यावर फतकल मारून सगळ्यांनी खाणं सुरू केलं. तेव्हढ्यात गलका झाला, ''गाडी आली.... गाडी आली'' पुन्हा सगळे त्या दिशेला वळले. मेगॅफोन वरून सूचना देण्यात आल्या...सगळी तयारी झाली...तोवर सूर्य कलला होता. लांब कुठेतरी शाहरुख व राणी खुर्चीवर बसले होते. कुणीतरी त्यांच्यावर छत्री धरली होती.... आता 'काहीतरी' बघायला मिळणार ! मंडळी आतुर झाली...! पण पुन्हा बराच वेळ काही नाही. बार्यादच वेळानंतर शूटिंग पुन्हा सुरू झालं. तेच पुन्हा गाडी येऊन थांबणं... तिनं उतरणं... काहीतरी बोलणं... त्याने निघून जाणं...! पण काहीच कळत नव्हतं....राणी व शाहरुख ठिपक्याएवढे दिसले..!
उन्हं पार कलली होती. निराश होऊन साबळे आणि कंपनी परत फिरली. आणखी धीर ताणवत नव्हता...येता येता कळलं आपल्या वाड्याच्या जवळ हॉटेल आहे ना, तिथं रात्री राणी न् शाहरुख लव्याजम्यासह जेवायला येणार आहेत....! मग काय ! मंडळींचा बेत ठरला. आत्ता घरीच जायचं अन् रात्री पुन्हा त्या हॉटेल पाशी जायचं. मीनल हॉटेल.
रात्री मंडळींची संख्या घटली. पण भाते वहिनीं व साबळे वहिनींनी पिच्छा पुरवला....
दुसर्या् दिवशी सलाळी हौदावर सगळ्या जमल्या. भाते वहिनी सांगत होत्या,
''तुम्हाला म्ह्टलं होतं ना, चला म्हणून? का नाही आलात ? आम्ही पाह्यला शाहरुख. जवळून..!

म्हणजे, गाडीतून उतरून आत गेला ना तेव्हा..! मस्त चालत गेला.... हो अगदी नीट बघितला. हॉटेलमालकानं खूप दिवे लावले होते ना ...! अगदी तस्सा दिसतो गं. सिनेमात दिसतो ना तस्साच.''

'' राणी मुखर्जी नं? ती न्हवती आली. दुपारी उन्हात शूटिंग झालं म्हणून दमली होती म्हणे. लोक तसं म्हणत होते....''
''काय? शाहरूख कोणाशी बोलला का?... छेः ग! त्यानं जमलेल्या लोकांकडे बघितलं सुध्दा नाही. पण मला मिळाला बाई तो बघायला.. त्या हॉटेल वाल्यानं गुलाबजाम वाटले सगळ्या जमलेल्या लोकांना ! ते घेतले न् मी आन् साबळेमावशी परत आलो. किती दीड वाजला होता, नाही का हो मावशी?..''

बाकीच्यांना हुरहुर लागून राहिली. ए, आज जाऊ या का पुन्हा? भाते वहिनींनी विचारलं... '' अगं संपलं म्हणे इथलं शूटिंग. सकाळी ती लोकं जातील. तुम्हाला जायचं तर ' शामियाना' हॉटेलवर जा. तिथं उतरलेत शाहरुक अन् राणी. उरलेल्यांच्या मनात जावं असं येत होतं,तेवढ्यात श्वेता झोपेतून उठून रडत शालीकडे आली... रडतांना म्हणत होती,'' मम्मी, मला शारुक बघायचाय्....मला घेऊन चल नं..''

भातेंची जुही पुढे आली. ''रडू नको दीदी, मी पण नाही पाह्यला. बाबा म्हणाले,
त्याला काय पाह्यचं ? आपण सिनेमाच बघू त्याचा. म्हणजे तो अगदी जवळून दिसेल.''
भाते वहिनी अगदी कौतुकानं सांगत होत्या, ''अगदी 'डिक्टो' सिनेमातल्यासारखाच दिसतो गंऽऽ....!...सगळ्या माना डोलवत राहिल्या....

संगीता जोशी