Sign In New user? Start here.

छोट्या, पण मोठ्या गोष्टी

जसं व्यक्तीला नशीब असतं, तसं एखाद्या गावालाही नशीब असतं का? असावं ! कारण अनेक मान्यवर व्यक्ती, अनेक उत्तुंग व्यक्तिमत्वं त्या गावाशी जोडलेली असावीत, हे त्या गावाच्या नशिबातला भाग्ययोगच नाही का? पुण्याचं पुण्य खरंच मोठं की आमच्या पुण्याला असे खूप थोर लोक लाभले आहेत की ज्यांच्यामुळे या शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे..

छोट्या, पण मोठ्या गोष्टी

 

संगीता जोशी

जसं व्यक्तीला नशीब असतं, तसं एखाद्या गावालाही नशीब असतं का? असावं ! कारण अनेक मान्यवर व्यक्ती, अनेक उत्तुंग व्यक्तिमत्वं त्या गावाशी जोडलेली असावीत, हे त्या गावाच्या नशिबातला भाग्ययोगच नाही का? पुण्याचं पुण्य खरंच मोठं की आमच्या पुण्याला असे खूप थोर लोक लाभले आहेत की ज्यांच्यामुळे या शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे..

अशांपैकीच एक आदरणीय व्यक्ती म्हणजे डॉक्टर एच्.व्ही. सरदेसाई. नुकतीच हनुमानजयंती होऊन गेली. त्यादिवशी त्यांचा वाढदिवस असतो. त्यांना शुभेच्छाही दिल्या. ह्या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कारही त्यांनाच देण्यात आला होता, त्याबद्दलही अभिनंदन केलं. अशा मोठ्या व्यक्तीचं मोठेपण नेमकं कशात असतं? असा विचार मनात येऊन गेला. तेव्हा त्यांच्याबद्दल वाचलेल्या काही गोष्टी आठवल्या. त्यातलीच ही एक..

काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा वडिलांचे मित्र, प्रसिध्द उद्योगपती लालचंद हिराचंद हे डॉक्टरांच्या समाचाराला आले. बाकीची बोलणी झाल्यावर त्यांनी डॉक्टरांना विचारले, ''मग आता आई कोठे असतात? तुझ्याकडेच का?'' डॉक्टर उत्तरले, ''नाही.'' लालचंद शेटांनी पुढे विचारले, '' मग, तुझ्या भावाकडे का?'' यावर डॉक्टर म्हणाले, ''मीच आईकडे असतो !'' लालचंद शेटही हे अनपेक्षित उत्तर ऐकून कौतुकमिश्रित समाधानानं हसले.

खरोखर, ह्यातून डॉक्टरांच्या मनावर घडलेले सुसंस्कार दिसतात, नाही का? त्यांचं मोठेपण कळतं. सर्वसाधारणपणे कोणीही असंच उत्तर दिलं असतं की, आई माझ्याकडे असते. पण आपल्यावर आईचं छत्र आहे, आणि घर हे प्रथम आईचं आहे, म्हणून मी तिच्याजवळ राहतो हा व्यक्त झालेला भाव निश्चितच दुर्मिळ आहे !
मोठ्या व्यक्तींचं मोठेपण अशा बारिक-सारिक गोष्टीतूनही व्यक्त होत असतं. व्यवसायात तर ते यशस्वी आहेतच. त्यांच्याकडे येणार्‍या रुग्णांना औषध देऊनच नव्हे तर मानसिक आधार देऊन ते बरं करतात.
ते लहान असतांना एका फकीराने त्यांच्या आईला सांगितले होते की, ''हा मुलगा भाग्यवान आहे. याला साक्षात्कार (देवदर्शन) होईल''

हे समजल्यावर एकाने त्यांना सहज विचारले, ''झालंय् तुम्हाला देवदर्शन?'' ते म्हणाले, ''हो. जेव्हा माझ्या उपचारांनी रुग्ण बरा होतो, तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर जो आनंद दिसतो, त्यातच मला देव दिसतो !''

आहेत ना ही थोर माणसांची लक्षणं? याबद्दल वाचूनही आपल्याला आपल्यात सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते. पुणे शहराचं समाजजीवन समृध्द करण्यात डॉक्टरांचाही वाटा आहे. आम्हा पुणेकरांना त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे ! त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वराजवळ प्रार्थना.

संगीता जोशी.