Sign In New user? Start here.

धर्म...

‘धर्म ‘ हा एक शब्द आपण ऐकला की आपण सावध होतो. त्याबद्दल बोलावं किंवा न बोलावं, काही बोललं तर कुणाच्या भावना दुखावणार तर नाहीत ना, समोरच्याची प्रतिक्रिया काय असेल इत्यादि. कारण आपल्या राजकारणी लोकांनी हा विषय इतका संवेदनशील करून ठेवला आहे की, धर्माबद्दल आपण बोलणं टाळतो. दुसरा एक समज असा, धर्म म्हणजे हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन

धर्म...

 

संगीता जोशी

‘धर्म ‘ हा एक शब्द आपण ऐकला की आपण सावध होतो. त्याबद्दल बोलावं किंवा न बोलावं, काही बोललं तर कुणाच्या भावना दुखावणार तर नाहीत ना, समोरच्याची प्रतिक्रिया काय असेल इत्यादि. कारण आपल्या राजकारणी लोकांनी हा विषय इतका संवेदनशील करून ठेवला आहे की, धर्माबद्दल आपण बोलणं टाळतो. दुसरा एक समज असा, धर्म म्हणजे हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन ...हे धर्म ! ह्या खरं तर मूळ धर्माच्या (विचारसरणीच्या) शाखा आहेत. एखाद्या वृक्षाच्या फांद्या असतात तशा ! हे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. मग मूळ धर्म कोणता? तिकडे आपण शेवटी येऊ या. प्रथम आपण धर्म ह्या संकल्पनेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सूर्याचं तेज घेऊन निघालेला प्रत्येक किरण हा सारखाच तेजःपुंज असतो आणि तो जिथं जिथं पोहोचेल तिथल्या अंधःकाराचा नाश करतोच. म्हणून खरा धर्म तोच की जो आपल्या अज्ञान-अंधःकाराचा नाश करून आपल्याला ‘डोळस’ करील. धर्मांध होणं हा तर मूळ उद्दिष्टाच्या बरोबर उलट दिशेचा प्रवास आहे....!

महाभारतात, कृष्णानं अर्जुनाला पटवून दिले होते की ,’’ह्या युध्दभूमीवर शत्रूसमोर तू उभा आहेस, तुला युध्द केलंच पाहिजे. विजयासाठी लढलंच पाहिजे.हाच या क्षणी तुझा परम-धर्म आहे. तुझं कर्तव्य आहे. तिकडे तुला पाठ फिरविता येणार नाही.’’

थोडक्यात, इथं कसं वागावं, ह्या क्षणाला कोणतं आचरण योग्य आहे हेच कृष्णानं स्पष्ट केलंय्. तोच परम-धर्म असं म्हटलंय्. यावरून धर्म म्हणजे विशिष्ट वेळी विशिष्ट प्रकारचं योग्य आचरण हा अर्थ स्पष्ट होतो.

धर्म ही संकल्पना आपण मुलांमध्ये लहान वयापासूनच रुजवायला सुरवात केली पाहिजे. पण आज प्रचलित धर्माच्या बटबटीत अर्थानं नव्हे! त्तर, योग्य आचरण या धर्माच्या मूळ व्याख्येप्रमाणे. शाळकरी वयात अभ्यास करणं, ज्ञानार्जन करणं व स्वतःला स्वावलंबी होत्ता येईल असं शिक्षण घेणं हा ‘विद्यार्थी-धर्म’ म्हटला पाहिजे. याच वयात, सत्य बोलणं, इतरांवर व निसर्गावर प्रेम करणं, निसर्गातील अद्भुत व गूढ शक्तींबद्दल आदर व जिज्ञासा बाळगणं, या सर्व गोष्टी धर्म या संकल्पनेत अंतर्भूत होतात.एवढंच नाही, सामाजिक जाणिवा निर्माण होणं, देशप्रेम व त्यापुढे जाऊन विश्वबंधुत्व ह्या संकल्पना मनात रुजून त्यानुसार आचरण होणं हे ही त्यातच येतं. थोडक्यात, सर्व सत् (चांगल्या) मूल्याधिष्ठित गोष्टी लहानपणापासून क्रमाक्रमाने आत्मसात करून व्यक्तीचा विकास व्हावयास हवा. मग ती व्यक्ती धर्म-मार्गावर वाटचाल करत आहे असे होईल.

यात कोठेही देव,देवता, पूजा-अर्चा व कर्मकांडाचा समावेश नाही, हे लक्षात घ्यायचे आहे. मूल्याधिष्ठित सत् गोष्टी व्यक्तीला आपोआप कळत असतात. कारण उपजतच आपल्याला सत्-असत् विवेक बुध्दी मिळालेली असते. उदा. एखाद्या लहान मुलानं शाळेत मित्राची पेन्सिल मित्राच्या नकळत उचलून आणली असेल तर तो आईशी काहीतरी खोटं बोलतो, कारण आपण चूक केली हे त्याला आतून कळत असतं. मात्र आईनं त्याच्या खोटे बोलण्याचा पाठपुरावा केला नाही तर तो खोटे बोलण्याबाबत धीट होऊ शकतो. याबद्दलची एक गोष्ट तुम्हालाही माहीतच असेल.म्हणून फक्त आठवण करून देते.

एका अट्टल गुन्हेगाराला पिंजर्यात उभे केलेले असते...त्याला जबर शिक्षा सुनावली जाते... ...तो आपल्या आईला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो... तिच्या कानाला कडकडून चावा घेतो... आई कळवळते... तो म्हणतो, मी लहानपणी पहिली चोरी केली तेव्हा माझा कान धरून मला तू शिक्षा दिली असतीस तर आज मला ही शिक्षा भोगण्याची वेळ आली नसती...(त्यावेळी दुर्लक्ष केल्यामुळे आपण केलं त्यात चूक नाहीच अशी लहान मुलाची धारणा होते.) तेव्हा पालकांची जबाबदारी पालकांनी ओळखून पाल्यांवर योग्य संस्कार केले पाहिजेत हा पालक-धर्म आहे.

कोणताही धर्म वाईट शिकवण देत नाही असे प्रत्येक धर्मातील लोक म्हणतात. शिकवण वाईट असेलच कशी कारण ती मूल्याधिष्ठित संस्कारांवर आधारित असते. विद्यार्थी हा पूर्ण व्यक्ती झाल्यानंतर कुटुंबाचा , समाजाचा व पर्यायानं राष्ट्राचा घटक म्हणून जगतो.आता त्याचा धर्म कोणता असतो? कुटुंबाचं संरक्षण, संवर्धन आणि त्यासाठी योग्य मार्गांनी अर्थार्जन करणं, वयस्क झालेल्या मातापित्यांना आधार देणं,मुलांना सुसंस्कारित करणं ह्या गोष्टी त्याचं कर्तव्य ठरतात.सामाजिक व राष्ट्रीय पातळीवर त्याची जबाबदारी वाढते. सर्वच बाबतीत व्यक्तीने योग्य आचरण ठेवलं तरच त्याच्याकडून अनुकरणाने पुढची पिढी शिकेल. हे आचरण एका पिढीतून दुसर्या पिढीत संक्रमित होत असतं. म्हणजेच धर्म हा एक वाहता प्रवाह आहे. पाण्याप्रामाणे तो कालप्रभावित वळणं घेतो, फरक एवढाच की, पाण्याप्रमाणे तो अधोगामी नाही.उलट समंजसतेच्या एक एक पायरीने ‘वर’ जाणारा हा प्रवाह आहे.

योग्य आचरण हे कालसापेक्ष व उद्दिष्टसापेक्षही ठरू शकेल. उदा. खून करण्यासाठी सुरा चालवणं व डॉक्टरांनी पेशंटचे प्राण वाचविण्यासाठी(हाच त्यांचा धर्म) ऑपरेशनची सुरी वापरणं यात कृती एकच असली तरी एक कृती धर्मदृष्ट्या त्याज्य व दुसरी उचित आहे. डॉक्टरांचे आचरण धर्माधिष्ठित आहे. योग्य आचरण कोणतं हे कधी कधी द्विधा परिस्थितीत टाकतं. उदा.एखाद्या गर्भवती मातेचा जीव वाचविण्याकरता बाळ गमावणे क्रमप्राप्त असेल तर बाळाचा विचार बाजूला सारून डॉक्टरांना कठोर निर्णय घ्यावा लागतो.तरीही ते आचरण धर्मविरोधी ठरणार नाहीच.म्हणजे योग्य-अयोग्य अशा पेचात माणूस सापडल्यास धर्म त्याला मार्गदर्शनही करतो व अधिक चांगल्या निर्णयाप्रत नेतो.

चांगलं काय व वाईट काय हे ज्याला कळतं त्याला धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी कुठलंही पुस्तक वा धर्मग्रंथ वाचण्याची गरज नाही. फक्त सदसद्विवेक बुध्दी जागृत हवी. सोप्या पध्दतीने असे सांगतात, की दुसर्याने आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते, तसे आपण दुसर्याशी वागावे असा धर्माचा सरळ अर्थ आहे.

प्राणिमात्रात फक्त माणसालाच विचार करण्यावी क्षमता मिळालेली आहे. म्हणून त्याच्याकडून योग्य आचरणाची अपेक्षा निसर्ग करतो. यामुळेच त्याच्या आचरणाच्या घालून दिलेल्या नीति-नियमांना ‘’मानवता-धर्म’’, मानव-धर्म..प्रेम-धर्म म्हटले जाते. त्याप्रमाणे आपण वागलो तरच आपण मानव म्हणवून घ्यायला लायक आहोत. अन्यथा नाही. मानवाने प्रेम, सत्य, अहिंसा ही तत्त्वे अंगिकारली पाहिजेत. धारयति इति धर्मः असं संस्कृत वचन आहे. धरून ठेवणारा, बांधून ठेवणारा तो धर्म. प्रेमाने अवघ्या मानव-जातीला एकत्र बांधून ठेवणे हेच धर्माचे उद्दिष्ट आहे. मग भेदभावाला जागाच कुठे आहे?

सृष्टीत असा एक नियम आहे की एखाद्या गोष्टीचे अस्तित्व ज्या गुणधर्मामुळे असते, तो गुणधर्म प्रकट झाला नाही तर ती गोष्ट ‘’ती’’ असू शकत नाही. साधे उदाहरण, साखर गोडच असायला हवी. गोड नसेल तर ती साखर नव्हेच. गोड असणे हा साखरेचा गुणधर्म म्हणजे धर्मच आहे. पोळणे हा उन्हाचा धर्म तर शीतलता हा सावलीचा धर्म. द्रवता व प्रवाहीपणा हा पाण्याचा धर्म. पाणी जर घट्ट झाले तर ते पाणी रहात नाही, त्याला आपण बर्फ म्हणतो. कारण धर्मात म्हणजेच गुणधर्मात फरक झाला. साध्या गोदरेजच्या कपाटाला आपण रेफ्रिजरेटर म्हणणार नाही. कारण त्यच्याकडे शीत करण्याचा धर्म नाही.

मग, आपल्याजवळ मानव-धर्म नसेल तर मग आपल्याला माणूस का म्हणायचे? पशू का नाही ??? आहे उत्तर???

(ह्या ब्लॉगमध्ये धर्म या संकल्पनेचा मर्यादित स्वरूपाचाच विचार मांडला आहे. त्याबद्दल सूक्ष्म रूपाचे हे विवेचन नाही. खूप विस्ताराने मांडण्याची ही जागा नव्हे.)

संगीता जोशी