Sign In New user? Start here.

एक कविता- कथा.....मोठ्यांसाठी...

आज एका कवितेचा गोषवारा सांगावासा वाटतो आहे. कवीचं नाव ? .....ते नंतर सांगते.कवितेत एक निर्धन, वयस्क व्यक्ती आहे.. काळ खूप जुना ... पुरातन..तो गरीब माणूस बिचारा रस्तोरस्ती फिरत आहे. कुणी काही देईल का?..काही धान्य .. काही पैसे... काही जुने-पाने कपडे.

एक कविता- कथा.....मोठ्यांसाठी...

 

संगीता जोशी

एकदा काय झालं,

आज एका कवितेचा गोषवारा सांगावासा वाटतो आहे. कवीचं नाव ? .....ते नंतर सांगते.

कवितेत एक निर्धन, वयस्क व्यक्ती आहे.. काळ खूप जुना ... पुरातन..तो गरीब माणूस बिचारा रस्तोरस्ती फिरत आहे. कुणी काही देईल का?..काही धान्य .. काही पैसे... काही जुने-पाने कपडे.....? मनात आशा आहे ...खांद्यावर झोळी घेऊन आणखी , दिसेल त्याची विनवणी करायला हवीय्....

पण हे काय ? रस्त्यावर एकदम एवढी गडबड..ही धावपळ कशासाठी सुरू झालीय्? हे तर राजाचे शिपाई ! हुकमी आवाजात ते रस्त्यावर च्या सगळ्यांना पांगावताहेत... सगळ्यांना सांगताहेत, बाजूला व्हा..रस्त्याच्या कडेला व्हा...कडेला जाऊन उभे रहा... राजेसाहेबांची स्वारी इकडून जाणार आहे...रस्ता मोकळा करा....

त्या गडबड-गोंधळात ह्या निर्धन..फाटक्या व्यक्तीवर जो तो खेकसतो आहे....ए।, चल हो बाजूला.... कुणीतरी त्याला ढकलून कडेला नेतं... लक्ष्मीच्या दराऱयापुढे लाचार निर्धनाचं काय चालणार ..?

बिचारा अंग चोरून कडेला जाऊन उभा राहतो..मनात येतं , निदान आज राजाला बघता तरी येईल...!वेडं मन म्हणतं, माझी ह्या राजाशी भेट झाली तर काय बहार येईल !मी त्याच्याकडून धन मागून घेईन.. माझं दारिद्य्र कायमचं नष्ट होऊन जाईल.... गरीबांच्या मनोरथांना कधी अंत असतो का ?

तेव्हढ्यात.... दबक्या आवाजातली गडबड ऐकू आली... आले ।..आले..।तो पहा, रथ दिसतो आहे...

रथ दिसू लागला .. पांढऱया घोड्यांचा ..सोन्यानं मढवलेला.. आणि आत होता स्वत: राजा !! देखणा... तरणा... रुबाबदार... प्रजेचा स्वामी..

ह्या निर्धन माणसाच्या आशा पुन्हा पालवल्या... हा रथ जर माझ्याजवळ येऊन थांबला तर....?..

अन् हे काय? खरोखरच राजाचा रथ येऊन थांबला.. त्याच्याच जवळ... आणि राजाने त्यालाच खूण केली. जवळ येण्याची. ... मनात कितीही कल्पना केली असली तरी प्रत्यक्षात अनपेक्षितपणे तसं घडल्यावर त्या निर्धन व्यक्तीला काही सुचेना... तो जागचा हलूही शकला नाही.विस्फारल्या डोळ्यांनी तो राजाकडे पाहातच राहिला. ..शेवटी राजा स्वत: रथावरून पायउतार झाला. त्या गरीब माणसाजवळ आला..

आ । हा।... काय सौंदर्य ! केवढं लक्ष्मीचं तेज ... गरीब माणसाचे डोळे दिपले...राजा त्याच्यापुढे येऊन म्हणाला, बाबा, अहो बाबा, होय मी तुमच्याशीच बोलतोय... इकडे तिकडे काय पाहताय्? ..तुमच्याशीच बोलतोय् मी ! मला सांगा, तुमच्या झोळीत काय आहे ? मला द्या नं, काय असेल ते... जरा भूक लागलीय् !

काहीही चालेल...

अरे दैवा !! गरीब माणूस मनात म्हणाला, मी काय समजत होतो, की राजाकडून मला काही मिळेल..हा तर उलटा न्याय झाला ... हाच म़ाझ्याकडे काहीतरी मागतोय् ..!!

कल्पनांच्या भराऱया संपून मन एकदम ताळ्यावर आलं . जराशा तुच्छतेनंच गरीब माणसानं आपल्या झोळीतले चिमूटभरच धान्याचे दाणे , राजाच्या पसरलेल्या हातावर ठेवले. राजा हसून निघून गेला. .... रथ दूर दूर गेला.....

हा निर्धन माणूस निराश मनाने घरी निघाला... घर कसलं ! मोडकी-तोडकी झोपडी होती ती एक. नशिबाला दोष देत, हळहळत चालला होता बिचारा.....मनात म्हणत होता ,

घरी पोहोचला.. बायकोनं विचारलं , काय भीक मिळाली ? त्यानं झोळी तिच्यापुढे उपडी केली. ...आणि हे काय ? या झोळीतल्या धान्यात हे काय चमकतंय्? अरेच्या ! हे सोन्याचे कण ?आ़णि ही मौल्यवान हिरे-माणकं ? ... आनंदाश्चर्यानं त्या माणसानं ती धान्यातून वेचून बाजूला काढली...सगळी मिळून हातात घेतली. सगळं मिळून चिमूटभरच होतं ते धन !..आत्ता त्या निर्धनाला अर्थ उलगडला... हिरे – माणकं पाहून झालेल्या आनंदाची जागा आता दु:खानं घेतली. पश्चात्तापाचे अश्रू त्याच्या डोळ्यातून वाहू लागले. अरेरे !! मी फक्त चिमूटभरच धान्य का दिलं राजाच्या हातावर ? सगळी झोळीच का नाही त्याच्या ओंजळीत रिकामी केली ? किती करंटा मी ! किती कंजूष ! किती लोभी मी !जर माझ्याजवळचं सगळं धान्य मी दिलं असतं तर आज मलाही भरभरून मिळालं असतं....

चिमूटभर दिल्यानं चिमूटभरच मिळालं !!

अशी ही कविता ! कोणाची आहे माहित आहे ? भारतासाठी वाङ्मयाचं एकमेव नोबेल पारितोषिक ज्यांनी मिळवलं त्या पूज्य रवीन्द्रनाथ टागोर यांची..गीतांजली हा त्यांचा अनमोल काव्यसंग्रह ! नोबेलविजेता. त्यातली ही कविता ! तिचा हा गोषवारा... किंवा स्वैर भावानुवाद म्हणा हवं तर..

मला ही कविता फार आवडते. किती मार्मिकपणे जीवनाचं मोठं तत्त्वज्ञान कवीनं सांगितलंय् !जेवढं तुम्ही इतरांना द्याल, तेवढंच तुम्हाला मिळेल..! म्हणून स्वत:ला काही मिळण्याची अपेक्षा करण्यापूर्वी आपल्याला जे शक्य असेल ते आधी दुसऱयाला दिलं पाहिजे..भले आपल्याजवळ थोडं का असेना, त्यातला काही हिस्सा आपण दान केलं पाहिजे..( हे फक्त पैशाबाबतच नाही... प्रेमही दिलं तरच मिळतं ..)

तुम्ही म्हणाल, आजच्या लाखो-कोटींच्या भ्रष्टाचाराच्या ह्या काळात ही कविता काय कामाची!!आपले नेते आज जे काही करत आहेत, ते तर याच्या विरुध्दच आहे ! हो , कारण ते संस्कार विसरले आहेत.. ह्या कवितेतून सांगितला आहे तो संस्कार ! आताच्या नेट संस्कारात हे बसत नाही . पण हे पुढे आलं पाहिजे.. सामान्य माणसाच्या मनात ते आहेच, ते जागं केलं पाहिजे...

टागोरांसारख्या कवीच्या शब्दांना काहीतरी तर अर्थ असलाच पाहिजे ! तुम्हाला काय वाटतं ??

--संगीता जोशी