Sign In New user? Start here.

एक मैफल...

तुम्ही शास्त्रीय संगीताची मैफल कधीतरी नक्कीच ऐकली असेल.अशा मैफलींचा शेवट भैरवी ने होतो ही प्रथाही तुमच्या परिचयाची असेल. पण एखाद्या मैफलीची सुरवातच जर भैरवीने झाली तर? तरीही छानच वाटते ! मी ऐकलीय् अशी मैफल. पण ती उर्दू गझलची. गायिका होती आबिदा परवीन. आवाज लागेपर्यंत तिने थोडावेळ यमनकल्याण आळवला.''येरी आली पियाबिन'' ही पारंपारिक चीज ऐकतांना दोन देशातील अतूट सांस्कृतिक बंधाची सुखद जाणीव होत होती. पण उत्सुकता होती ती भैरवीतल्या त्या परिचित गझलेची.

एक मैफल...

 

संगीता जोशी

तुम्ही शास्त्रीय संगीताची मैफल कधीतरी नक्कीच ऐकली असेल.अशा मैफलींचा शेवट भैरवी ने होतो ही प्रथाही तुमच्या परिचयाची असेल. पण एखाद्या मैफलीची सुरवातच जर भैरवीने झाली तर? तरीही छानच वाटते ! मी ऐकलीय् अशी मैफल. पण ती उर्दू गझलची. गायिका होती आबिदा परवीन. आवाज लागेपर्यंत तिने थोडावेळ यमनकल्याण आळवला.''येरी आली पियाबिन'' ही पारंपारिक चीज ऐकतांना दोन देशातील अतूट सांस्कृतिक बंधाची सुखद जाणीव होत होती. पण उत्सुकता होती ती भैरवीतल्या त्या परिचित गझलेची.
ताणलेली उत्सुकता शिगेला पोहोचल्यावर आबिदा परवीन ने तार षड्ज लावून पुढील ओळी म्हटल्या...

 

आप गैरोंकी बात करते हैं, हमने अपने भी आजमाये हैं
लोग कांटोंसे बचके वलते हैं, हमने फूलोंसे जख्म खाये हैं....

यमन-कल्याण ऐकतांना स्तब्धतेने ऐकणारे श्रोते एकदम उसळून दाद देऊ लागले... मला वाटतं एखादा शेर आपल्याला आवडतो कारण त्यात कुठेतरी आपलीच अनुभूती लपलेली असते. त्यामुळेच शब्द काळजाला जखम करतात आणि सूर त्यावर फुंकर घालतात.... काट्यांमुळे जखमा होतील हे निदान माहीत तरी असतं, पण जिथं काही धोका वाटत नाही अशा ठिकाणाहून ...फुलांकडून.. जखमा झाल्यावर वेदना अधिक होतात...

एका शेरात आपण हरवून जातो, तोच आबिदा दुसरा शेर म्हणते,
किसीका क्या जो कदमोंपर जबीने-बंदगी रख दी,
हमारी चीज थी, हमने जहां चाही वहां रख दी....

खरंय न? आपलं मस्तक आहे, आपण ते कुठेही ठेवू !! ते कोणाच्या चरणी ठेवावं हे दुसरे लोक का म्हणून ठरवणार? आपल्याला वाटेल तिथे आपण ते ठेवू शकतो !
यातील गर्भितार्थ लक्षात घ्यायला हवा. कशाची पूजा करायची हे स्वातंत्र्य व अधिकार त्या त्या व्यक्तीचा असतो. ती पूजा कशाचीही असू शकेल..एखाद्या प्रिय व्यक्तीची, प्रिय दैवताची, कामाची, व्यवसायाची किंवा देशाची... कोणी पैशाचीही म्हणेल..!आपल्या विचारांनुसार आपलं श्रध्दास्थान बदलेल...हेच या शेरात सुचवलं आहे.
मुख्य गझलेच्या आधी असे काही पोषक शेर म्हणण्याची गझल-मैफलीची रीतच आहे. नंतर आबिदानं गझलेचा पहिला शेर सादर केला.

 

जबसे तू ने मुझे दीवाना बना रक्खा है
संग हर शख्स ने हाथोमें उठा रक्खा है....

या शेरातला 'मी' प्रेयसीला म्हणत आहे, की मी तुझ्या प्रेमात पडलोय्...फक्त पडलो नाही तर अगदी पागल झालोय्..आणि वेड्याला पाहिल्यावर लोक जसे त्याच्या अंगावर, दगड घेऊन मारायला धावतात, तसे लोक माझ्याकडे धावत येताहेत, प्रत्येकाच्या हातात मला दिसताहेत दगड !

या शेराचा सखोल विचार करायला हवा. एखाद्या व्यक्तीने एखाद्या गोष्टीचं वेड घेतलेलं दिसलं की सामान्य लोक त्याची संभावना खुळचट अशीच करतात. इतिहासाच्या अभ्यासकाला ते म्हणतील,'' ते अमुक-अमुक ना, स्वतःला 'राजे' च समजतात ''!

असे उपेक्षेचे दगड त्या व्यक्तीवर विनाकारण फेकले जातात. देवावर श्रध्दा असणा-यांनाही काही लोक वेडे ठरवितात आणि देवाला रिटायर करा अशी दगडफेक ते करत असतात. ''देव नाही'' या विचारावर त्यांची ठाम श्रध्दाच असते, ही विसंगती त्यांच्या लक्षातही येत नाही. थोडक्यात काय,तर ''दीवाना'' या संज्ञेतून कोणाचीच सुटका नाही. वर वर पाहता प्रेम या विषयावर असलेल्या या शेराला अर्थाची कशी छटा आहे, पाहिलंत ?


गझलेमधील प्रेमी इतका दुःखव्याकुळ झाला आहे की पूर्वी कोणीतरी प्रेमालाच 'शिक्षा' हे नाव दिलं होतं हे त्याला आठवतं. शेर असा आहे—

 

उसके दिलपर भी कडी इश्कमें गुजरी होगी
नाम जिसने भी मुहब्बतका 'सजा' रक्खा है...

---हे प्रेम म्हणजे आपल्याला मिळालेली शिक्षाच आहे असं जो म्हणतो, त्याच्यावर प्रेमामुळे कोणती परिस्थिती गुजरली असेल त्याची कल्पनाच करवत नाही !
किती कष्टमय असतं प्रेमिकाचं जिणं ! शिक्षा सोसून वर इतरांकडून दगडांचा वर्षावही सहन करायचा तो वेगळाच !गझलेतला पुढचा शेर आबिदा म्हणते,

पत्थरों, आज मेरे सरपे बरसते क्यों हो
मैं ने तुमको भी कभी अपना खुदा रक्खा है....

प्रेमिक म्हणत आहे, दगडांनो, आज तुम्ही का माझ्यावर असे निर्दयपणे बरसत आहात ? विसरलात? काल तुमच्यापैकीच एकाला मी देव्हा-यात बसवलं होतं...आणि पूजा केली होती...असं असतांना आज तुम्हीच माझ्यावर उलटलात? असं पहा, दगडांना देवत्व बहाल करणारे आपणच असतो. अपात्र व्यक्तीला उच्चस्थानी बसवतांना विचार करायला हवा. हेच या दोन ओळीत समर्पकपणे सांगितलं आहे. शेवटल्या शेरात काय सांगितलं असेल? ही उत्सुकता श्रोत्यांच्या कानात गोळा होते.

 

पी जा अय्यामकी तल्खी को भी हसकर 'नासिर'
गम को सहने में भी कुदरत ने मजा रक्खा है....

कवी स्वतःलाच समजावीत आहे, ''अरे नासिर, दुनियेतला हा सगळा कडवटपणा एखाद्या मधुर पेयाप्रमाणे आनंदाने पिऊन टाक. अरे, असं हसत हसत दुःख सहन करण्यातही नियतीनं एक वेगळंच सुख दडवून ठेवलंय् बघ. त्या सुखाचीही तू मजा घ्यावीस ! तो दुःखातला आनंद तुला मिळावा म्हणून तर हे दुःख दिलंय् तुझ्या वाट्याला. असा भाग्यवान आहेस तू !

दुःखातल्या आनंदाशी आपण पोहोचतो तेव्हा नकळत डोळे पाणावलेले असतात...तुमचेही डोळे ओलवलेत ना ? मला खरंच ठरविता येत नाही की हा परिणाम कवीच्या ताकदीच्या शब्दांचा की भैरवीच्या करुण-मधुर स्वरांचा ! पण इथं तर फक्त शब्दांचीच मैफल जमली आहे! सूर ऐकायचे तर यू-ट्यूब वर आबिदा परवीन ला नक्की भेटा.....

संगीता जोशी