Sign In New user? Start here.

एक उन्मळणं...

एखादं जुनं,रुंद खोडाचं घेरदार आणि उंच वाढलेलं झाड एक दिवस अचानक मुळापासून उन्मळतं; विजा चमकल्यासारखा काड् काड् आवाज होतो आणि ते कोसळतं ! जमिनीला कडकडून भेटतं ...... लोक आश्चर्य करतात, ‘ इतकं जुनं,इतकं भक्कम झाड उन्मळलं? विश्वास बसत नाही. कालपर्यंत कधी वाटलं नाही की उद्याच हे पडेल म्हणून !...पण किती उजाड वाटतंय्..ही जागाही भकास वाटतेय्...’

एक उन्मळणं...

 

संगीता जोशी

एखादं जुनं,रुंद खोडाचं घेरदार आणि उंच वाढलेलं झाड एक दिवस अचानक मुळापासून उन्मळतं; विजा चमकल्यासारखा काड् काड् आवाज होतो आणि ते कोसळतं ! जमिनीला कडकडून भेटतं ......

लोक आश्चर्य करतात, ‘ इतकं जुनं,इतकं भक्कम झाड उन्मळलं? विश्वास बसत नाही. कालपर्यंत कधी वाटलं नाही की उद्याच हे पडेल म्हणून !...पण किती उजाड वाटतंय्..ही जागाही भकास वाटतेय्...’

का घडत असेल असं ? झाड काही सांगू शकत नाही; पण त्याचं कोसळणं ही काही एक दिवसाची प्रक्रिया नक्कीच नाही. त्या दिवसाच्या कितीतरी काळ आधीपासून ते आतून ‘जळत’ असलं पाहिजे.पोखरलं जात असलं पाहिजे. त्याला आधार देणारी मुळं ज्या मातीत गेलेली असतात, त्या मातीची रोज धूप होत असते; मुळं उघडी पडलेली असतात; आधार सुटत असतो; पण ते बिचारं कसंतरी तग धरून असतं. रीतीप्रमाणे नव्या ऋतूचं स्वागत करत फुलत असतं. गाभ्यातलं जळणं लपवून नवनवी पोपटी पालवी धारण करत हसत असतं. उघड्या पडलेल्या मुळांकडे पाहात स्वतःशीच हसत असतं. त्याला कळलेलं असतं की आता ते फार तग धरू शकणार नाही ! पण ही पक्ष्यांची नवी घरटी इथं वसली आहेत, त्यांचं काय? त्या पक्ष्यांचा संसार होईपर्यंत तग धरता येणार आहे ? उन्मळणं थोपवता येणार आहे ?

.........आणि तो दिवस येतोच ! कारण तग धरणं झाडाच्या हातात नसतं. म्हणून ते कोसळतंच. मघाशी सांगितलं तसं. ज्या जमिनीनं त्याला ‘जीवन’ दिलं त्याच धरणीच्या चरणी ते माथा टेकतं....

बुंध्याचा छेद लोकांच्या नजरेला पडतो. त्यांच्यात चर्चा होते; ते म्हणतात, ‘ आतून गाभ्याला कसं काळं झालं आहे पाहा. पण हे आतून कसं जळलं? वीज पडली म्हणावं तर बाहेरून ठीक दिसतंय्. विजेच्या तारा गेल्याहेत जवळून! त्यामुळे तर असं झालं नसेल ? पण पाहा ना; आतून एवढं पोखरलं गेलंय् तरी खूप तग धरला म्हणायचा. आतली कीड पाहता, ह्याआधीच उन्मळायला हवं होतं...!’ अनेकांचे अनेक तर्क !!

त्यांना कशी कळणार होती झाडानं जगण्याची केलेली पराकाष्ठा? जळत राहूनही फुलत राहण्याची किमया करण्यासाठी केलेली साधना? कुणाला कळणार होती ?

आता फक्त म्युनिसिपालिटीचा डंपर येण्याचीच वाट बघायची होती....बस् !