Sign In New user? Start here.

गुलोंमें रंग भरे.....

काही दिवसांपूर्वी एक दुःखद बातमी कानावर आली आणि मन भूतकाळात गेलं. सत्तरीचे दशक असेल. माझे वडील मला सांगत आले,''आज एका पाकिस्तानी गायकाचं गाणं ऐकून आलोय्, रेडिओवर !तुला आवडते ना, तशी ती गझलच होती बहुतेक ! पण काय आवाज होता त्याचा ! मऊ रेशमी मुलायम !''

गुलोंमें रंग भरे.....

 

संगीता जोशी

काही दिवसांपूर्वी एक दुःखद बातमी कानावर आली आणि मन भूतकाळात गेलं. सत्तरीचे दशक असेल. माझे वडील मला सांगत आले,''आज एका पाकिस्तानी गायकाचं गाणं ऐकून आलोय्, रेडिओवर !तुला आवडते ना, तशी ती गझलच होती बहुतेक ! पण काय आवाज होता त्याचा ! मऊ रेशमी मुलायम !''

''नाव काय त्याचं?'' मी विचारलं. ''मेहेंदी हसन. तो आधी ठुंबरी गायचा,म्हणे. पण आता गझलच जास्त गातो.''

(त्याचं नाव मेहेंदी नसून मेहदी आहे हे नंतर कळ्लं.) मी लक्ष्मी रोडला पत्कींच्या पूना म्युझिक मध्ये चौकशी केली. पण त्यांना नावही माहीत नव्हतं. पण काही दिवसांनी त्यांच्या दुकानातला मुलगा निरोप घेऊन आला, ''तुम्हाला पाहिजे ती रेकॉर्ड आली आहे.''

पत्कींनी ती मला मोफत ऐकवली. माझा आनंद मात्र अनमोल होता !

गुलोंमें रंग भरे बादे-नौबहार चले
चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले....

ऐकतांना भान हरपून गेले होते. कवीचं नाव होतं फैज अहमद 'फैज''. ते गाणं-गझल- कुठल्याशा एका पाकिस्तानी फिल्म साठी त्यांनी गायलं होतं.

काही काळानंतर बाजारात कॅसेट्स् आल्याची माहिती मिळाली. मेहदी हसन ची पहिली कॅसेट घरात आली. पण टेप-रेकॉर्डर-प्लेअर कुठे होता? चौकशी केली तर खूप महाग होता. पॅनासोनिकचा. एकमेव मॉडेल. पियानोसारख्या बटनांचा. अडीचशे रुपये पगार त्याची किंमत पंधराशे ! त्याकाळी!! पण रसिक मनाला त्या आवाजाची ओढ होती. केवळ हौस नव्हती. शेवटी हिय्या करून खरेदी केली.आणि मेहदी हसन यांच्या सुरांनी घर व मन भरून पावलं.

मेहदी हसन प्रथम ठुंबरी व क्लासिकलच्या मैफली करत असत. पण गझलगायकीला त्यांनी असंकाही नवं रूप दिलं की, पुढे गझल हीच त्यांची ओळख झाली. एका हमालानं, ऐपत नसतांना ''गुलोंमें रंग...'' साठी ती फिल्म 20-25 वेळा पाहिली होती म्हणे!

पुढे काही वर्षातच त्यांना गझलचा शहेनशहा असं म्हटलं जाऊ लागलं. ऐंशीच्या दशकात त्यांची मैफल पुण्याला होणार होती, तेव्हा त्यांच्या भेटीचाही योग आला. मी व माझा मुलगा अभिजित, (तो तेव्हाही उर्दूचा चांगला जाणकार होता,) दोघे त्यांना भेटलो. त्यांच्या गझलांवर थोडी चर्चा झाली.भारतातच माझे जास्त 'फॅन्स' आहेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. तेव्हाही त्यांच्यासोबत मोठा लवाजमा होता. त्यांचे कुटुंब. त्यांच्या दोन छोट्या नाती खूप सुंदर व गोड होत्या. आम्ही त्यांच्यासोबत खूप फोटोही काढले. माझे वडील ''सवाई गंधर्व उत्सवाचे'' आयोजन करणार्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य असल्याचं कळल्यावर तो उत्सव पाहायला त्यांना यायचंय्, असं ते म्हणाले होते. बेगम अख्तर यांचे गझल-गायन उत्सवात एकदा झाले होते. पण हसन साहेबांचा योग काही आला नाही.

अमेरिकेत त्यांची एकॅडमी पाहाण्याची संधी आली होती. पण त्यावेळी ते नेमके पाकिस्तानात गेले होते.

दोन-तीन वर्षापूर्वी त्यांचे चिरंजीव यांचे प्रोग्राम्स भारतात मुद्दाम आयोजित करण्यात आले होते. उद्देश होता मेहदी हसन यांना आर्थिक मदत व्हावी. औषधपाण्याचा खर्च भागवता यावा. चाहत्यांनी भरभरून हात दिला हे वेगळे सांगायला नकोच. पुण्यातल्या त्यांच्या कार्यक्रामांना मी गेले होते. तेव्हापासूनच त्यांच्या प्रकृतीची काळजी होतीच. शेवटी व्हायचे ते झालेच.... !! युगामधूनच अशा दैवी आवाजाची कृपा एखाद्यावर होत असते. त्या सुरांनी कित्येकांच्या जीवनात आनंद निर्माण केला...शायरांच्या गझलेत लपलेल्या दुःखाला आपल्या स्वरांची भर्जरी किनार लावून मैफिली, सीडीज् सारख्या तबकातून पेश करून रसिकांना आनंदाचे नजराणे दिले....अशी व्यक्ती कुठल्या देशाची आहे, कुठल्या धर्माची आहे असे संकुचित विचार येण्यास जागा तरी राहते का?

भारत-पाक संबंधाबाबत आम्ही गमतीने म्हणायचो, की दोन्ही डेलिगेट्स् चे प्रमुख जर मेहदी हसन व लता मंगेशकर असतील ना, तर प्रश्न सामंजस्याने, चुटकीसरशी सुटेल यात शंकाच नाही !!....
पण ते जाऊ दे...! आता फक्त सूर मागे रहिले आहेत....
दिलसे धुऑं और ऑंखोंसे ऑंसू निकलते हैं....

संगीता जोशी.