Sign In New user? Start here.

कवितांची कविता—गझल

आज मराठी गझलबद्दल अधिक जाणून घेऊ या. गझल हा एक काव्यप्रकार आहे. जसे सुनीत, लावणी, अभंग,पोवाडा इ. काव्यप्रकार आहेत तसाच हाही. मूळचा अरबी-फारसी व नंतर उर्दूतून हा काव्यप्रकार आपल्याकडे आला. नंतर इतर अनेक भाषांमध्येही गझल लिहिली जाऊ लागली. तशी ती मराठीतही आली. एक गझल आधी वाचू या.

कवितांची कविता—गझल

 

संगीता जोशी

आज मराठी गझलबद्दल अधिक जाणून घेऊ या. गझल हा एक काव्यप्रकार आहे. जसे सुनीत, लावणी, अभंग,पोवाडा इ. काव्यप्रकार आहेत तसाच हाही. मूळचा अरबी-फारसी व नंतर उर्दूतून हा काव्यप्रकार आपल्याकडे आला. नंतर इतर अनेक भाषांमध्येही गझल लिहिली जाऊ लागली. तशी ती मराठीतही आली. एक गझल आधी वाचू या.

 

मुळी न केला विचार तेव्हा
खुशाल केला करार तेव्हा...1

नकोच होता घडावया जो
घडून गेला प्रकार तेव्हा...2

अशी कशी हारले कळेना
न खेळताही जुगार तेव्हा...3

जपून मी ठेविला मनाशी

दिलास जो तू नकार तेव्हा..4

मला खरे वाटलेहि होते
तुझे बहाणे हुषार तेव्हा...5

तुम्ही विचारू नका खुशाली
तुम्हीच केलेत वार तेव्हा...6

तुझ्याकडे यायचेच आहे
करू नको बंद दार तेव्हा....7

मला हवा तो दिसे न तारा
नभात होते हजार तेव्हा...8

अजून ही कंप पावते ती
तुवा स्पर्शिली सतार तेव्हा..9

(वृत्त—जलौघवेगा)

या गझल मध्ये नऊ द्विपदी (शेर)आहेत. एका कडव्याला शेर असे म्हणायचे. गझल हे वृत्तबध्द काव्य असते. मुक्तछंदात गझल लिहीत नाही. सर्व शेरांमध्ये एकच वृत्त असते. शालेय अभ्यासात, शार्दूलविक्रीडित, भुजंगप्रयात इ.नावे आपल्या कानांवरून गेली आहेत. तशी गझलचीही अनेक वेगवेगळी वृत्ते आहेत. वरील गझलेच्या वृत्ताचे नाव जलौघवेगा असे आहे. मुख्य म्हणजे, गझलमधील प्रत्येक शेर अर्थाच्या दृष्टी ने स्वतंत्र असतो. एखाद्या शेराचा अर्थ मागच्या किंवा पुढच्या शेरावर अवलंबून नसतो. दोन ओळी हीच एक कविता असते. म्हणूनच गझलला ''कवितांची कविता'' असे म्हटले जाते.

वरील गझल वाचून पाहा, प्रत्येक दोन ओळीत एक संपूर्ण विचार मांडला आहे. सगळे शेर वाचतांना कळते की प्रत्येक शेरात, विचार, करार, जुगार, हुषार इ. समउच्चारी शब्द आले आहेत. पहिल्या शेरात ते दोन्ही ओळीत तर पुढल्या प्रत्येक शेरामध्ये दुसर्‍या ओळीत आले आहेत. यांनाच यमक (काफिया) असे म्हणतात. यमकानंतर प्रत्येक वेळी ''तेव्हा'' हा शब्द आला आहे, त्याला रदीफ असे म्हणतात. हेच गझलचे सौंदर्य असते. वृत्तबध्द असल्याने ती ठेका देऊन वाचता येते व समान उच्चारांच्या शब्दांमुळे वाचायला मजा येते. वरील गझलचे वृत्त '' रनार नाना, रनार नाना'' या ठेक्यात वाचता येईल. तसे वाचून बघा, नक्कीच मजा वाटेल.

अर्थात, केवळ ही मजा म्हणजे गझल नव्हे. प्रत्येक शेरात आशय असलाच पाहिजे ! नाहीतर गझल म्हणजे नुसता सांगाडाच होईल. त्यात आशायाचा आत्मा हवाच. तसा आत्मा नसेल तर ती कविता नव्हेच! तो आशय दोनच ओळीत कसा सामावता येतो हे कवीच्या प्रतिभेवर अवलंबून आहे. म्हाणूनच नुसता गझलेचा आकृतीबंध समजला की गझल लिहिता येते असे नाही. प्रतिभा पाहिजेच, जी उपजतच असावी लागते.

आता हे सर्व समजून पुन्हा वरील गझल वाचा व तिच्या वाचनातून आनंद मिळतो का,ते पाहा.मला खात्री आहे की तुम्हाला गझल हा प्रकार नक्की आवडू लागेल.

आणखी ही गझला पुन्हा केव्हातरी.....

संगीता जोशी.