Sign In New user? Start here.

मी बिल भरते....! भाग - 1

सोमवारची सकाळ. जो तो स्वतःचं आवरून आपापल्या कामाला जायच्या तयारीत...मुलं कॉलेजला ...हे ऑफिसला.. तेवढ्यात यांनी आठवण केली, '' अगं, आज MSEB चं बिल भरायचं आहे, बरं का.. आजच शेवटची तारीख आहे...''
'' अहो पण, तुम्ही शनिवारीच भरणार होतात ना? नाहीच का भरलं?.''

मी बिल भरते....! भाग - 1

 

संगीता जोशी

सोमवारची सकाळ. जो तो स्वतःचं आवरून आपापल्या कामाला जायच्या तयारीत...मुलं कॉलेजला ...हे ऑफिसला.. तेवढ्यात यांनी आठवण केली, '' अगं, आज MSEB चं बिल भरायचं आहे, बरं का.. आजच शेवटची तारीख आहे...''
'' अहो पण, तुम्ही शनिवारीच भरणार होतात ना? नाहीच का भरलं?.''

''शनिवारी मी तिथं पोहोचेपर्यंत ऑफिस बंद झालं होतं. तू असं कर ना, इथं बँकेत भर जवळच्या जवळ. पाच-दहा मिनिटांचं काम, त्यात काय एवढं!! ''
'' अहो, आज नेमकी सरूबाईही येणार नाहीए. मलाच धुणं-भांडी सगळं आवरायचं आहे ''मी जरा तक्रारीच्या सुरात म्हटलं.
'' मग पडू देत दंड ! नको जाऊस..'' जाता जाता यांनी मला उपरोधिक दम दिला.
माझ्या मनात आलं, आता मला बिल भरायला जाण्याशिवाय गत्यंतर नाही.

कामं कशीबशी उरकून मी बँकेत पोहोचले ती हाश-हुश करीतच. ऑक्टोबर–हीट साडेदहाला सुध्दा जाणवत होती.पण इलाज नव्हता. बँकेच्या आवारातून बाहेर बस-स्टॉप पर्यंत एका रांगेत लोक उभे होते. मला वाटलं आपल्याला काय करायचं आहे? आपण पटकन् पाच-दहा मिनिटात बिल भरून येऊ या. म्हणून रांगेतील लोकांच्या अंगावरून मी रुबाबात पुढे गेले आणि पायर्‍या चढून काउंटरपाशी आले. बरीच गर्दी.. त्यामुळे काउंटरवर ठेवलेले त्रिकोणचिती-आकृती ठोकळे काही दिसेनात. मी गोंधळून इकडे-तिकडे पाहिलं आणि एक कागद भिंतीवर चिकटवलेला दिसला.

'' MSEBची देयके 10.30 ते 12.30 या वेळातच स्वीकारली जातील'' ....पण कुठल्या काउंटरवर ?

माझ्यापुढे प्रश्न !! 'चौकशी'ची पाटीही गायब होती.ती पाटी कुठे आहे याचीही चौकशी करता येईना. तेवढ्यात बँकेचा प्यून इकडून-तिकडे काही कागद घेऊन जातांना दिसला. पण छे! तो फारच बिझी होता ! काउंटर पलीकडचा प्रत्येकजण समोरच्या रजिस्ट्रर मधे डोकं खुपसून बसला होता. लोक म्हणतात बँकेच्या लोकांना काऽऽही काम नसतं म्हणून! पण इथं तर वेगळंच दृश्य होतं !!

हं, अगदी काउंटरजवळ बसलेले लोक काय करत होते, हे मात्र दिसत नव्हतं.काउंटरच्या उंचीमुळे त्यांची सोय झाली होती. दोन स्त्रिया शेजारी होत्या,त्यांची डोकी मात्र सारखी जवळ येतांना दिसत होती. बोलत असतील बहुधा काही कामाचं.
शेवटी मी एका ग्राहकालाच विचारलं, '' लाईटची बिलं कुठं भरायची हो?''
'' ती काय, एक नंबर च्या खिडकीवर '' मी अगदी कोपर्‍यातल्या एक नंबर काउंटरकडे नजर टाकली...त्या दिशेने निघाले.. तर प्रत्येकजण माझ्याकडे रागाने बघत होता. का, ते मला लगेच समजलं. ''पुढे कुठे चालली ही बाई?'' '' रांगेत घुसते की काय?''
'' आम्ही काय मूर्ख म्हणून इथे उभे आहोत?'' सगळ्यांच्या नजरा बोलल्या. अरे देवा ! म्हणजे मी ज्या रांगेचं मागचं टोक पाहिलं तिचा उगम इथं होता तर ! हे म्हणाले होते, पाच-दहा मिनिटांचं काम. कसलं आलंय्? येऊन पाहा म्हणावं...

मी बँकेच्या पायर्‍या उतरून बाहेर आले. रांगेचं शेवटचं टोक गाठलं.मी आत जो वेळ घालवला तेवढ्या वेळात रांगेत आणखी भरच पडली होती! कारण मी शेवटी उभे पाहिलेले गृहस्थ आता माझ्या बरेच पुढे गेले होते. मी गुपचूप शेवटी उभी रहिले.आता निरीक्षणास निवांत वेळ होता. माझ्यापुढे काळा,रेघाचा शर्ट घातलेला एक तरुण होता. त्याच्यापुढे एक गार्डन-सिल्कमधील बाई, तिच्यापुढे एक वयस्क पण नीटनेटकी अशी बाई.. खूण म्हणून मी काळा शर्ट लक्षात ठेवला. मागे पाहिलं तर एक पोरसवदा मुलगा. का कोण जाणे, पण शंका येऊन मी पर्सच्या सर्व चेन्स नीट लाचल्याची खात्री करून घेतली व पर्स खांद्याला सुरक्षित अडकवली.

म्हटलं, त्याचा काही विचार असेल तर आपण संधी नको द्यायला.
पाच-दहा मिनिटं झाली, रांग पुढे सरकली असं काही वाटेना.
'' बराच वेळ लागतोय्, नाही?'' मी काळ्या शर्टाशी संभाषण सुरू केलं. त्यानं नुसतं 'हो ना' म्हटलं. ''आपला नंबर येईल ना साडेबारापर्यंत? कारण आज बिल भरण्याची शेवटची तारीख आहे '' मी स्वतःशी वाटावं असं पण मोठ्यांदा म्हटलं.
''हो ती शंकाच आहे. पण साडेबाराला खिडकी बंद म्हणजे उरलेल्यांची बिलं घेणारैत की नाही?'' इति गार्डन-सिल्क. आता पुढचे मागचेही आमच्या संभाषणात सामील झाले. सगळेच रांगेच्या संथ गतीला वैतागलेले !

'' तुमचीही शेवटची तारीख का आज?'' (बिल भरण्याची तारीख, हे आपण समजून घ्यायचं.) मग आणखी एक दोघांना विचारलं. त्याचंही तेच उत्तर ! मघाचे गृहस्थ म्हणाले,
''आपण शेवटच्या तारखेला बिल भरायला येतो ना, त्यामुळेच असं होतं ''
'' अहो, पण आम्हाला सहा तारखेलाच तर बिल मिळालं. मधे सात तारीख तेवढी गेली. नंतर आठ न् नऊ हा शनिवार-रविवारच आला. आणि आज दहा ! मग काय करणार?'' मी.
आता संभाषण वाढू लागलं होतं. सगळ्यांचा वेळ चांगला जात होता. कणकण पुढंही सरकत होतो,ह.ना. आपट्यांच्या कादंबरीतल्या मारुतीराया सारखं.!
''बँकेने ना, दोन काउंटर उघडायला हवेत अशा गर्दीच्या वेळी.'' घाम पुसत वरच्या उन्हाकडे पाहात एकजण.
''बँकेला MSEB कडून जे कमिशन मिळत असेल, त्यात दुसरा माणूस स्पेअर करणं बँकेला परवडलं पाहिजे ना.'' आपला मुद्दा किती बिनतोड, अशा अविर्भावात दुसरे एकजण.
''बँकेपेक्षा MSEB च्या कॅश-ऑफिस मधे कमी गर्दी असते'' तिसरा आवाज.
'' अंहं! गर्दी तिथंही असते पण लवकर लवकर काम होतं.'' एकमेकांची म्हणणी खोडली जात होती.
तेवढ्यात एकानं आपलं बिल काढून वाचायला सुरवात केली. मागच्यालाही ते वाचता येत होतं.

'' तुम्हाला बरंच बिल आलेलं दिसतय् '' मागचा पुढच्याला म्हणाला.
'' हो ना. मागची सगळी भरलेली बिलं घेऊन मी आलोय्.''
'' मुख्य ऑफिसला जाऊन तक्रार करा ना.''
'' केली.तर म्हणाले आधी पूर्ण बिल भरा. दुरुस्ती होऊन पुढच्या बिलात वळते होतील ''
अशाच आणखी मजेशीर गप्पा ऐकत सगळे रांग एन्जॉय करत होते...पण पुढे काय? ते पुढच्या भागात.....

संगीता जोशी.