Sign In New user? Start here.

रांगेतील प्रतिक्षेचा ताण कमी करण्याचा सर्वांचा प्रयत्नत होता, त्यामुळे अनोळखी असूनही गप्पा सुरू झाल्या होत्या.'' किती उकडतं आहे नाही? एखाद्या कुशल धंदेवाईकाने कोल्ड-ड्रिंक्स पुरविली तर केवढा धंदा होईल त्याचा !'' कुणीतरी आपली कल्पकता दाखविली.

मी बिल भरते... भाग 2

 

संगीता जोशी

एकदा काय झालं,

रांगेतील प्रतिक्षेचा ताण कमी करण्याचा सर्वांचा प्रयत्नत होता, त्यामुळे अनोळखी असूनही गप्पा सुरू झाल्या होत्या.

'' किती उकडतं आहे नाही? एखाद्या कुशल धंदेवाईकाने कोल्ड-ड्रिंक्स पुरविली तर केवढा धंदा होईल त्याचा !'' कुणीतरी आपली कल्पकता दाखविली.

''खरोखर असं झालंही आहे. परवा पेट्रोल-पंपावर टंचाईच्या वेळी खूप रांगा होत्या तेथे हॉटेलवाल्यानं भरपूर फायदा मिळवला...'' एकूण त्याचा रांगेचा अनुभव बराच मोठा दिसत होता ! '' एखाद्या पेन्शनर पण धडधाकट माणसानं लोकांची वेगवेगळी बिलं भरण्याचा उद्योग केला तर त्याला चांगलं जोड-इनकम होईल..''

सगळेजण हसले. रांग थोडी पुढे सरकली होती, पण मंद गतीनंच. तेवढ्यात एक त्रासलेली व्यक्ती म्हणाली, '' आमच्या वेळेचा अगदी अपव्यय आहे हा. रांगेतल्या लोकांना काही उद्योग नसतो, ते रिकामटेकडे असतात असं वाटतं की काय या लोकांना !(म्हणजे MSEB वाल्यांना !)''

'' हो ना, मला वर्कशॉपमधे जायचं होतं. पण माझी सगळी सकाळ इथेच गेली.'' एक तरुण. आपण ग्राहक संघटित नाही म्हणून असं होतं''

''फोनच्या बिलांना नाही बाई एवढा वेळ लागत.'' बाईंच्या हातात मोबाईल दिसत होता. दुसर्याा बाईंची चुळबुळ सुरू झाली.त्यांनी पहिलीला विचारलं, '' कुठे राहता तुम्ही?''बाईंनी सांगितलं.

'' हो का? आम्ही पण तिथेच. काय बाई आपल्याकडचे रस्ते झालेत ! मोठे-मोठे खड्डे ! परवाच माझ्या मुलाचं अमेरिकेतून पत्र आलं, रस्ते नीट झाले का म्हणून. तो येणार आहे ना. पण हे रस्ते नीट व्हायला हवेत बाई त्याआधी. तसा अजून वर्षभर तरी नाही येणार म्हणा तो. कारण सूनही शिकत्येय्.''

रांगेमधल्या सर्वांना यावरून बाईंच्या 'स्टेटस' ची कल्पना आली. त्या बाईंचा अहंकार कुठेतरी सुखावला. असं हे सगळं चाललेलं असतांना माझ्या मनात आलं, रांगेत उभं राहाणं म्हणजे काही अगदीच बोअर गोष्ट नाही!

एव्हाना आम्ही बँकेच्या पायर्यां पाशी येऊन पोहोचलो होतो. तेवढ्यात एक म्हातार्याठ बाई साळसूदपणे आमव्याजवळ येऊन उभ्या राहिल्या व हळूच काळ्या शर्टाच्या पुढे रांगेत शिरू लागल्या. बहुधा त्यांना वाटलं, आपल्या वयाचा मुलाहिजा ठेवून लोक गप्प बसतील. पण पुणेरी पाणी साधं नाही! रांगेत तासन् तास उभं राहण्याची शेळपट सहनशीलता त्यांच्याजवळ असेल पण कुणाला मधे घुसू देणार ? शक्यच नाही.

रांग सरकून आम्ही बँकेच्या हॉलमध्ये आलो,तेव्हा बारा वाजून गेले होते.अजूनही रांग बस-स्टॉप पर्यंत होती. साडेबारा पर्यंत कितीजण खिडकीपाशी पोहोचणार??

अजूनही गप्पा चालूच होत्या.एका गृहस्थांचा नंबर बाहेरच्या मोठ्या खिडकीजवळ होता.त्यांना स्टॉपवर बस थांबलेली दिसली. गच्च भरलेली. कुणीही उतरलं नाही, उलट आणखी काही जण लोंबकळले.ते गृहस्थ म्हणाले,'' हल्ली जिकडे तिकडे गर्दी.पाहा ना, बस किती भरली होती !

त्यांच्यामागे एक वृध्द आजोबा उभे होते.विनोदबुध्दी चांगली असावी. म्हणाले, ''गर्दी तर काही विचारूच नका.

तिचं नाव ' बस ' असलं तरी तिच्यामधे उभं राहावं लागतं अन् तिच्यासाठीही उभंच राहावं लागतं. म्हणायचं फक्त ''बस''! ''

बारा दहा ! बापरे! आता आपण बिल भरू शकणार की नाही? का दोन तास वायाच जाणार? आपला नंबर आला की हा बाबा खिडकी पटकन् बंद करायचा.

'' तीस पस्तीस सेकंदात एकाचं काम होतंय् म्हणजे अजून चाळीस जणांचं काम व्हायला हरकत नाही.'' काळा शर्ट.

मी म्ह्टलं, ''सगळ्यांना पैसे, बिलं हातात तयार ठेवायला सांगू या. मोजकेच पैसे काढा म्हणावं, म्हणजे वेळ नको जायला...''

सर्वांनी पैसे तयारच ठेवले होते.आता प्रत्येक सेकंद महत्वाचा वाटत होता. बँकेच्या घड्याळात सव्वाबारा वाजले. टेन्शन सॉलिड वाढलं. तेवढ्यात पहिल्या नंबरकडे लक्ष गेलं.त्याला फार वेळ लागत होता.तो कॅशियरशी काहीतरी बोलत होता.

'' अहो, लवकर आटपा हो. प्रॉब्लेमेटिक असेल तर बाजूला व्हा.तुम्ही एकट्यानं चार मिनिटं लवलीत. आठ माणसांचा वेळ गेला.'' मागून आवाज आला.

कुणीतरी आणखी म्हणालं, ''अगदी एक्सायटिंग आहे नाही? वन-डे मॅच सारखं !इतकी मिनिटं इतका नंबर! ओव्हर्स आणि रन्स सारखं !''

''आता एकच ओव्हर राहिली.'' माझ्या पुढचा काळा शर्ट म्हणाला.
त्याचा सहावा नंबर होता. सिक्स पीपल टु गो... माझा सातवा नंबर !

एकदाचा नंबर आला!! मी पैसे व बिल खिडकीतून दिलं आणि तपश्चर्या फळाला आल्याचं समाधान मला लाभलं. ''रिसीट सहा नंबरवर घ्या.'' यानंतर खिडकी बंद झाली.

मी रिसीट घेतली,बाहेर पडून तडक रिक्षा केली व घरी येऊन कुलूप उघडलं. रांगेत करमणूक झाली होती पण दमणूकही झालीच होती.जेवायचं सुध्दा सुचत नव्हतं. आल्या आल्या पंख्याचं बटन दाबलं. मस्त गारव्यात पडायचा विचार होता.पण MSEB ला ते मान्य नव्हतं.पंखा फिरेना तेव्हा उगीचच बटन दोन-चार वेळा खटखट दाबून पाहिलं. पण वीज गेली होती !!

' बिलं मात्र वेळच्यावेळी हवीत यांना अन् समाधानकारक सेवा देण्याची नैतिक जबाबदारीही यांना वाटत नाही.' मी रागारागाने मनाशीच बडबडले.
हे आल्यावर यांना सगळा किस्सा सांगितला. मला वैतागलेली पाहून हे म्हणाले,
'' तुला मी म्ह्टलं नव्हतं की तू 'ऑनलाईन' बिलं भरायला शिकून घे....''
'' पण तुम्ही नाही का भरू शकत ...?''
माझा प्रश्न ऐकायला हे तिथं होतेच कुठे???

संगीता जोशी.