Sign In New user? Start here.

आजकालची पिढी अत्यंत हुषार, चलाख व बुध्दिमान आहे यात शंकाच नाही. हात धुण्याच्या साबणाची एक जाहिरात आपण पाहतो.एक मुलगा सांगतो सगळ्यांनी अगदी एक मिनिटभर हात धुवायला पाहिजेत. एक चलाख (आणि थोडीशी आगाऊ सुध्दा...!) मुलगी त्याला म्हणते, तुझा साबण स्लो आहे का रे?

नवे पंचतंत्र ?

 

संगीता जोशी

आजकालची पिढी अत्यंत हुषार, चलाख व बुध्दिमान आहे यात शंकाच नाही. हात धुण्याच्या साबणाची एक जाहिरात आपण पाहतो.एक मुलगा सांगतो सगळ्यांनी अगदी एक मिनिटभर हात धुवायला पाहिजेत. एक चलाख (आणि थोडीशी आगाऊ सुध्दा...!) मुलगी त्याला म्हणते, तुझा साबण स्लो आहे का रे?

अस अनपेक्षीत प्रश्न आजच्या मुलांना सुचतात, हे त्या जाहिरातीचे स्क्रिप्ट ज्याने लिहिले, त्याने बरोबर टिपले आहे. कावळा –चिमणीची गोष्ट ऐकणारे तर किती लहान असतात. पण आजकाल काय घडते? वाचा.

आई सांगत होती, ‘’खूप पाऊस पडत होता...कावळा आला चिमणीकडे...’’ पण चिमणीने दार उघडले नाही. कारण ती बाळाला ....’’ मुलाने विचारले, ‘’ पण, कावळा तिच्याकडे का आला? शेणाचं घर बांधू नाही, हे त्याला कळत नव्हतं का? ‘’

त्याच्यापेक्षा थोडी मोठी त्याची बहीण म्हणाली, त्याच्याकडे घर बांधायला पुरेसे पैसे नसतील ! हो किनई ग मम्मा ?’’ आईला गोष्ट पुढे नेताच येईना.....

वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. एका घरात वृध्द आजीची पंच्याहत्तरी साजरी होत होती. गावातले, परगावचे खूप नातेवाईक जमले होते. धार्मिक विधी, समारंभ सारे यथासांग पार पडले. जेवणानंतर मोठ्या हॉलमध्ये सारे गप्पा मारत बसले. गप्पांचा केंद्रबिंदू होता, अर्थात् आजी. इतरांनी काही भाषणेही केली. आजींसंबंधी. नंतर सगळ्यांनी आजींना त्यांचे त्याकाळातले अनुभव, त्यांचा संसार वगैरेबद्दल सांगण्याचा आग्रह केला. त्या कशाबशा तयार झाल्या. म्हणाल्या ,

‘’ मला काय बोलता येणार तुमच्यासारखं ? मी थोडीच शिकले आहे ? आमचे अनुभव ते काय ! उंबर्या्च्या आतले. शिवाय ह्यांचा स्वभाव तापट. बोलण्याची सवयच नव्हती. दहा माणसांच्या रगाड्यात रांधा,वाढा यातच जन्म गेला माझा. त्यातच चौदा मुलं झाली. सहा गेली, आठ जगली.....’’

सगळे एकाग्रतेने ऐकत होते.. पण चौदा मुलं हे शब्द ऐकताच लहान चिन्मयने सगळ्या शांततेचा भंग करत सहजतेने विचारलं, ‘’पणजी आजी, चौदा मुलं? तेव्हा ‘निरोध’ नव्हतं का?.....’’

सगळे अवाक् झाले.... कोणी हसलेही नाही.. चिडीचूप... ! सात वर्षाच्या मुलानं हा प्रश्न विचारला होता याला कारण फक्त टी.व्ही. वरची जाहिरात होती ! चिन्मयला एवढंच जाहिरातीतून माहीत झालं होतं, ‘’दोन मुलांच्या वर मूल न होण्यासाठी निरोध वापरा’’

अशी कॅच –लाईन त्याने हजारवेळा ऐकली होती...बिचार्या’ला आपण काय चुकीचं बोललो हे कळत नव्हतं. पण सगळ्यांचे गंभीर चेहरे पाहून तो धास्तावला !त्याच्या आईने मग प्रसंग सावरून घेतला. तेव्हा कुठे तणाव कमी झाला.. नंतर टी.व्ही.च्या दुष्परिणामांची चर्चा मात्र चांगलीच रंगली....

एका बारा-तेरा वर्षाच्या मुलाची आय. क्यू. टेस्ट चालू होती. विविध प्रश्नांबरोबरच,त्यात काही बोधप्रद गोष्टींचाही समावेश होता. मुलाला टेस्ट देतांना कंटाळा येऊ नये हाही त्यात उद्देश होता. गोष्टी साध्याच व परिचित असत. शेवटी मुलांकडून कोणती प्रतिक्रिया येईल त्यावर गुण द्यायचे असत. सुजितला गोष्ट सांगितली गेली. सर्वांना ती माहीत आहे. एका कावळ्याला एक मांसाचा तुकडा सापडलेला असतो...तो घेऊन तो आनंदात झाडावर जाऊन बसतो.... आनंदाने तो खाणार एव्हढ्यात खालून जाणार कोल्हा कावळ्याशी बोलू लागतो... कावळेदादा, खरेतर तुम्ही किती छान गाता! लोक आपले उगीचच कोकिळेचे कौतुक करतात....जरासे गाऊन दाखवा ना.... कावळा खूष होऊन तोंड उघडतो...मांसाचा तुकडा खाली पडतो...तो घेऊन कोल्हा पळून जातो....

गोष्ट संपल्यावर सुजितला प्रश्न विचारला गेला, ‘’ तुला गोष्ट कळली का? कळली असेल तर या गोष्टीचे तात्पर्य काय आहे?’’

‘’या गोष्टीचं तात्पर्य? म्हणजे त्यातून काय शिकायचं तेच ना?’’

‘’हो तेच’’ यावर थोडा वेळ विचार करून सुजित उत्तरला,’’ आपले काम करून घ्यायचे असेल, आपला फायदा होणार असेल तर दुसर्यायची खोटी स्तुती करायला हरकत नाही !’’

टेस्ट घेणार्या शिक्षिका अवाक् झाल्या कारण ‘’खोट्या स्तुत्तीवर भाळू नये. तसे केल्यास आपला तोटा होतो.’’ हे उत्तर अपेक्षित होते.म्हणजे गोष्टीचा लेखक (ही पंचतंत्रातील गोष्ट आहे) कावळ्याला बोध देत होता पण सुजित मात्र कोल्य्हाच्या बाजूने होता !! सुजितचा आय्‍.क्यू. शोधतांना जुन्या निकषांचा उपयोग नव्हता तर !

विचार येतो, की आधुनिक जगाचं प्रतिबिंबच त्या वाढत्या मुलाच्या विचारात दिसलं. आजकालचं जग हे कोल्ह्या-लांडग्यांचंच आहे का? अत्यंत स्वार्थी?

पंचतंत्राच्या लेखकाला- विष्णुशर्माला आजच्या जगातील व्यवहारात उपयोगी पडतील अशा नवीनच गोष्टी लिहाव्या लागतील ! पण त्या पूर्वीच्या गोष्टीत सांगितलेल्या व जपलेल्या मूल्यांचे मग काय? ती मूल्ये चिरकालीन आहेत, सत्‍ आहेत.. त्याप्रमाणे व्यवहार करणंच श्रेयस्कर आहे... आपण मूल्ये विसरलो आहोत म्हणूनच आज जग अधोगतीला जात आहे... लक्षात घेऊ या, गोष्टी नव्याने लिहिणं गरजेचं नाही.. आपण बदललं पाहिजे.....आपण तंत्र आणि ताळ सोडलेला आहे...तंत्रज्ञानाची प्रगती ही चांगलीच गोष्ट आहे. पण पंचतंत्रातील उपदेशाची ही व्यवहार-गीता बासनात गुंडाळून ठेवली आहे ही चिंताजनक बाब आहे. मोठे झाल्यावर सुजित कसा वागेल, याची झलक त्याच्या विचार करण्याच्या पध्दतीतून दिसत आहे.अशा अनेक सुजितांना वेळेवर मार्ग त्यांच्या आई-बाबांनी दाखवावा...ही प्रार्थना.....

संगीता जोशी