Sign In New user? Start here.

पंखभर आकाश

संक्रांतीचा सण येऊन गेला. आकाशात पतंगांचा जल्लोष बघायला मिळाला.हल्ली वाहिन्यांच्या माध्यमातून सगळीच अंतरं वितळून गेल्यासारखी झालीयत्, त्यामुळे गुजरात राज्यातील पतंगोत्सव पाहायचीही संधी मिळते.ते पतंग खूप वेगळे होते असं वाटलं. एक पतंग म्हणजे पतंगांची लांबलचक माळच ! मनात आलं, यांचं वजन वाढलं तरीही हे इतके उंच कसे जातात? काही तर पॅरॅशूटसारखे होते ! उंच जाण्याच्

पंखभर आकाश

 

संगीता जोशी

कसं घडलं कोणास ठाऊक ! पण एक पक्षी तिच्या बंद खिडकीच्या गजांवर अलगद येऊन उतरला. त्याच्या पंखाच्या तडफदार झापेनं तिचं लक्ष एकदम त्याच्याकडे वेढलं गेलं, अन् मान वर उचलून तिनं त्याच्याकडे पाहिलं. हे इतकं क्षणार्धात घडलं की, हातात असलेलं दो-याचं रीळ तिच्या हातातून उडून लांब उलगडत गेलं वेडंवाकडं. आता त्याचा नक्कीच गुंता होणार.....

तिनं पाहिलं आणि ती पाहातच राहिली. त्या पक्षाचे रंग नजर बांधून घेत होते. कुठले कुठले होते ते रंग? निळा? पारवा? स्कार्लेट ? सोनेरी? ...सुंदर किरमिजी? की हे सारेच?... कोणजाणे ! पण बहुधा ह्या सर्व चमकदार रंगांचं एक सौम्य मिश्रण होतं ते. रंग इतके बेमालूम मिसळले होते की इंद्रधनुष्यालाही संभ्रम पडावा.....

त्या पक्ष्याच्या अस्तित्वानं ती हरखून गेली. तिच्या खिडकीच्या गजांना आनंदाची पालवी फुटली. कारण त्या पक्ष्यानं तिच्यासाठी आणलं होतं दोन पंखभरून आकाश ! खिडकीच्या गजांमधून त्यानं ते सहज भिरकावून दिलं तिच्यासाठी ...तिनं झेलावं म्हणून !

आणि काय सांगावं ?... तिच्याही हातांना कुठल्या सामर्थ्याचा स्पर्श झाला कोण जाणे, पण त्यानं दिलेलं ते पंखभर आकाश तिनं लीलया झेलून घेतलं. जणू ती नेहमीच त्याला अंगण समजून त्यात विहरत होती ...!

तिच्या खिडकीच्या गजातून आत येता यावं म्हणूनच जणू इवलंसं झालेलं ते आकाश ....ते अमर्याद आकाश आता तिचं होतं... त्यात दडलेल्या तारका आता तिच्या होत्या...त्यातून सांडणारं चांदणं तिचं होतं...एवढंच नव्हे, त्या आकाशाचा स्वामी असलेला तो तेजःपुंज रवी ? तो देखील सौम्य शीतल होऊन गजांमधून आत आला होता....केवळ तिच्यासाठी...!

आकाशातल्या संपत्तीचा तो बहुमोल खाजिना तिच्यापुढे असा खुला झाला की, तिला कसलंच भान उरलं नाही. उलगडत गेलेल्या दो-याचं टोक हातून निसटलं. हातातल्या जुन्या वस्त्राला घालत असलेले चारदोन टाकेही नकळत उसवून गेले....मिळालेल्या आकाशात ती हरवून गेली. आणि त्या हरवून जाण्यानं सुखावूनही गेली...! गजाआडच ! ! ती वेचीत बसली, हाती लागतील ती तारका-फुलं....आणि न्हात राहिली मूकपणे त्या चांदण्याच्या दुग्ध-धवल रसात...धुंद...बेभान...

.....पण काहीतरी पुढं सरकत होतं...अशुभाचं सृप !...तिच्या नकळत..! ......आणि तिच्या हातात आलेलं आकाश एका कोपर्या!नं काळवंडू लागलं...हळूहळू अंधारू लागलं...काळोख तिला विळखा घालू लागला. मिट्ट कळोख ! कधी ''पहिला'' नव्हता असा..! पण ती काळोख 'पाहणार' तरी कसा होती?

फक्त जाणीव होत होती त्याची. त्याच्या गडदपणाची ! तारकाफुलांचे विझलेले कोळसेच तिच्या हातात राहिले होते. हातातलं ते आकाश तिनं गच्च धरून ठेवण्याचा निकराचा प्रयत्न तिनं केला....पण ते करण्यात तिचे पायही आता निसटू लागले होते.....

तिनं अंदाजानंच त्या खिडकीच्या दिशेने मान वळविली...तो सुंदर पक्षी.... तिथंच असला पाहिजे अजून....

'' ह्या काळोखाला आता तूच थोपवायचं आहेस ! तूच दिलंस ना हे आकाश मला ? तू स्वतःहून घेऊन आलास हे माझ्यासाठी ! माझ्या गजांना त्याची ओळख तूच ना करून दिलीस? गजांनाही भुरळ पडली ! त्यांनी खुशाल आत येऊ दिलं तू आणलेल्या आकाशाला...आणि आता का हा काळोख... ?''

तिला हे सारं सांगायचं होतं त्या पक्ष्याला. पण ओठातून एक शब्दही फुटत नव्हता....ती असहाय्य...! तेव्हढ्यात पंखांची उघडझाप झाल्याचा 'फडफड' असा आवाज झाला...तो अजून तिथंच होता तर....!

तिथंच होता तो पक्षी, खिडकीच्या गजांना पकडून 'पाहत' होता तिची असहाय्य धडपड...शांतपणे..! कदाचित् त्या काळोखाला थोपविण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे नसेल....किंवा आकाश हाती आलं तरी त्याच्या फक्त काळोखात बुडून जाणं, हेच तिचं प्राक्तन असेल...!

 

त्याचं गजाबाहेरचं अस्तित्व जाणवल्यावर तिची अस्वस्थता अधिकच वाढली. हात चाचपडत होते आणि पाय अडखळत होते....ओठांवर केवळ थरथर....

तिचं मन मोठ्यांदा ओरडून सांगत होतं ...''असू दे हा काळोख हेच माझं प्राक्तन. पण ह्या काळोखापूर्वीचं ते उजळ आकाश माझ्यासाठी ज्यानं आपल्या पंखांवर वाहून आणलं, त्या पक्ष्याला मी माझ्या हृदयात एक घरटं दिलंय्, एवढं तरी बोलण्याचं बळ, माझ्या ओठांनो,

मला द्या....सांगू द्या त्याला एवढंच....!!''

संगीता जोशी