Sign In New user? Start here.

संक्रांतीचा सण येऊन गेला. आकाशात पतंगांचा जल्लोष बघायला मिळाला.हल्ली वाहिन्यांच्या माध्यमातून सगळीच अंतरं वितळून गेल्यासारखी झालीयत्, त्यामुळे गुजरात राज्यातील पतंगोत्सव पाहायचीही संधी मिळते.ते पतंग खूप वेगळे होते असं वाटलं. एक पतंग म्हणजे पतंगांची लांबलचक माळच ! मनात आलं, यांचं वजन वाढलं तरीही हे इतके उंच कसे जातात? काही तर पॅरॅशूटसारखे होते ! उंच जाण्याच्

पतंग

 

संगीता जोशी

संक्रांतीचा सण येऊन गेला. आकाशात पतंगांचा जल्लोष बघायला मिळाला.हल्ली वाहिन्यांच्या माध्यमातून सगळीच अंतरं वितळून गेल्यासारखी झालीयत्, त्यामुळे गुजरात राज्यातील पतंगोत्सव पाहायचीही संधी मिळते.ते पतंग खूप वेगळे होते असं वाटलं. एक पतंग म्हणजे पतंगांची लांबलचक माळच ! मनात आलं, यांचं वजन वाढलं तरीही हे इतके उंच कसे जातात? काही तर पॅरॅशूटसारखे होते ! उंच जाण्याच्या स्पर्धेत कोण जिंकणार? ही स्पर्धा तरी कशासाठी? कोणतं आकाश गाठायचं आहे यांना ?असं वाटत होतं.. फक्त एक कागद! पण भक्कम दोर्‍याची साथ मिळताक्षणी त्याचं ध्येय केवढं उंचावलं ! थोडावेळ ती स्पर्धा, ते पतंग पाहिल्यानंतर मात्र मन खूपखूप मागे गेलं. भूतकाळात. आणि तेव्हा वाचलेली एक कथा आठवली. तिचा आठवतो तो सारांश असा---

पाच-सहा वर्षे वयाचा एक लहान मुलगा. नाव राजू समजू. आई-बापाविना असं ते पोर आपल्या काका-काकी जवळ रहात होतं. कथेतले काका-काकी दुष्ट नव्हते. छळवादीही नव्हते. उलट अत्यंत प्रेमळ होते. जुन्या कथेतील तो जुना काळ होता ना ! त्यावेळी माणसं माणसाला जीव लावीत असत. पोर आपलं असो वा दुसर्‍याचं, त्याच्यावर मायाच केली जायची. लहान मुलं ही देवच असतात असं मानलं जायचं.

काका-काकींचं खूप प्रेम होतं राजूवर. काकाचं प्रेम होतं, तेवढेच ते शिस्तीचे भोक्ते होते. राजूला चांगलं वळण लागावं याची ते सतत काळजी घेत.राजूचंही काका-काकूवर प्रेम होतं. राजूला काकांचा धाक वाटत असे. पण काकी जवळ मात्र सगळे लाड चालायचे. आधीच आईविना पोर, असं वाटून ती त्याला आणखीनच जपायची. आजूबाजूचे लोक नावंही ठेवायचे. ‘पोटचं पोर नाही तरी बिन्नी एवढा जीव लावते; स्वतःचं झाल्यावर तर काय करेल !’

पण एक दिवस वेगळाच उगवला. राजू सकाळी उठला तर घरातलं वातावरण त्याला वेगळंच दिसलं. काकी नेहमीसारखी त्याच्याआधी उठली नव्हती. ती भिंतीजवळ कांबळीवर झोपूनच राहिली होती. शेजारच्या बायका तिच्या अवतीभवती बसल्या होत्या. तोंडावर पदर धरून दबल्या आवाजात रडत होत्या. राजू धावत काकीकडे निघाला तर बायकांनी त्याला अडवलं. एकीनं त्याला उचललं आणि बाहेर काकाजवळ आणून दिलं. काकाचा चेहरा नेहमीसारखा करारी नव्हता, पार उतरला होता. राजूलाही ते पाहून रडू आलं. त्याच्या रडण्यामुळे काकाचाही बांध फुटला. राजूला कवटाळून काकाही मोकळा होऊन अश्रू गाळू लागला. राजूला कळेना; झालंय् तरी काय? रडतच त्यानं काकाला विचारलं, ‘काकीला काय झालं ? ती उठत का नाही?’

काका राजूची समजूत काढत म्हणाला, ‘ती देवाकडे गेली.’

राजूनं न समजून विचारलं, ‘देवाकडे? का गेली ती मला न सांगता?... आता केव्हा येणार परत?..’

त्याचे सततचे प्रश्न ऐकून काका नं उत्तर दिलं ‘ती नाही येणार आता कधीच’

राजूला काहीच समजेना. तेवढ्यात एका बाईंनी त्याला उचलून शेजारच्या घरी नेऊन दिलं. तिथं राजूपेक्षा वयानं थोडा मोठा मुलगा होता; भोला. तो राजूचा मित्रही होता. त्याला माहीत असेल म्हणून राजूनं त्याला विचारलं, ‘देवाकडे गेली म्हणजे कुठे रे गेली काकी?’

भोला म्हणाला, ‘मलाही नक्की माहीत नाही; पण देव आभाळात असतो हे माहीत आहे.’

तेव्हढ्यात बायकांच्या रडण्याचा मोठा आवाज आला. राजू अन् भोला धावत बाहेर आले. चार माणसं काकीला उचलून कुठेतरी नेत होती. राजू मागे धावला, पण कोणीतरी त्याला पकडून परत भोलाजवळ सोडले. राजू रडायला लागला; पण भोलानं त्याला समजावलं.

काही दिवस गेले. राजू काकीविना सैरभैर झाला होता. पण कोणा मोठ्यांना त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. काकी नव्हती तरी घरात गुरुजी आले; गोडधोड जेवणं झाली.पण राजूला काहीच रुचत नव्हतं. त्यानं काकाजवळ जाऊन पाहिलं तर काका लक्ष द्यायलाच तयार नव्हता. घरात आलेले पाहुणे निघून गेले.

आता घरात काका आणि एक कुठलीतरी आजी यांच्याशिवाय कोणी राहिलं नाही. रोज भोला व राजू यांची खलबतं चालायची. कशावर, याचा इतरांना पत्ता नव्हता.

अंधार्‍या माजघरात बसून दोघं बोलत होते. भोला म्हणाला, ‘एक युक्ती आहे,काकीला परत आणण्याची’.

‘कोणती? सांग ना लवकर.’राजू
‘काकी आभाळात गेलीय्. आपण जर एक मोठ्ठा पतंग पाठवला वर, तर ति त्याला धरून खाली सहज येऊ शकेल.’ भोलानं वडिलकीच,या नात्यानं सांगितलं.

‘हांऽऽ!’ राजू खूष झाला. ‘मग पतंग आणू या?’

‘हो. पण मोठ्ठा आणायचा बरं का ! त्यामुळे जास्त पैसे लागतील.’

‘किती लागतील? एक रुपया आहे माझ्याकडे. काकीनंच खाऊला दिला होता.’

‘अजून पाच लागतील. मांज्या लागेल ना. काचवाला. तुटणार नाही असा.’ भोलानं म्हटलं.

राजू गप्प झाला. भोलाला ‘उद्या भेट’ म्हणाला.

त्यानं खूप विचार केला. शेवटी संधी साधून काकाच्या कोटाच्या खिशातून पाच रुपये गुपचुप काढून घेतले व मुठीत गच्च धरून तो भोलाकडे धावला.

आता पतंग आणून, कन्नी बांधून मांज्या,आसारी अशी जय्यत तयारी चालू होती; पण सर्वकाही अगदी चोरून ! अंधार्‍या माजघरात ! दुपार होऊन गेली. राजू खूष होता. आता काकी खाली येणार,यात काहीच अडचण नव्हती. तेवढ्यात राजूला आठवलं, ‘काकीला समजणार कसं, हा पतंग तिच्यासाठी आहे ते?’

भोला क्षणभर विचार करून म्हणाला, ‘हं; आपण नाव लिहू या तिचं याच्यावर.’

‘मला कुठे येतं लिहिता ?’ राजू म्हणाला, ‘तूच लिही’

मग काकाच्या डेस्कवरून लाल शाई आणली व भोलानं पतंगावर मोठ्या अक्षरात नाव लिहिलं. आता बाहेर पडणार इतक्यात....

काकाची हाक आली. ‘राजू, मी नव्हतो, तेव्हा इथं कोणी आलं होतं ?’

राजू एकदम घाबरला. चाचरतच ‘नाही’ म्हणाला. ‘मग,माझ्या खिशातले पाच रुपये कुठे गेले?’

लहानग्या राजूला रडू फुटले.काकाने ओळखले. ‘तू घेतलेस ! हो की नाही?’ काकाने दरडावून विचारले.

राजूनं भोलाकडे पाहात फक्त मान हलविली. आधीच दुःखात असलेल्या काकाला सहन झाले नाही.

‘चोरी केलीस? आता हेही गुण उधळायला लागलास का?...जा,चालता हो डोळ्यासमोरून.’असे म्हणून एक दोन रट्टे ठेवून दिले.राजू हुंदके देत उभाच राहिला. भोलाने हळूच पळ काढला.

‘कुठैत पैसे? खाल्ले? खर्च केले? काय केलं?’

‘पतंग आणला.’ राजूनं रडत रडत सांगितलं. ‘कुठाय् पतंग?’ काकानं विचारलं.

‘तिकडे माजघरात.’राजू
‘चल, दाखव.’ असं म्हणून राजूचं बखोटं धरून दोघं माजघरात गेले. ‘कशाला हवा होता पतंग?’

‘ काकीला खाली आणायला. भोला म्हणला, आभाळात गेलेली काकी पतंग धरून खाली येईल.’

काका अवाक् झाले. मटकन् खाली बसले.जमिनीवरचा पतंग उचलला व पाहिले, त्यावर लिहिले होते

‘काकी’!!

राजूला पोटाशी धरून काकाही राजूबरोबर हमसाहमशी रडू लागले.

गोष्ट इथे संपते. आपले डोळेही ओले झालेले असतात.एवढी वर्षं झाली, सुमारे पन्नास-पंचावन्न; पण अजून ही गोष्ट लक्षात आहे. तपशीलात फरक झालाही असेल, पण मी काकीला विसरू शकलेले नाही. गोष्टीचे लेखक कोण हेही आठवत नाही. तुम्हा कोणास माहीत असेल तर जरूर कळवा. मूळ कथा हिंदी आहे. स्व. प्रेमचंद यांची नाही असं काहीजण सांगतात.

कथा इतकी हृदयाजवळ आहे याचं माझ्यामते,एकच कारण. त्यातील पात्रांमध्ये दाखवलेलं परस्परांमधील प्रेम ! मनात येतं, या संघर्षमय व टेक्नोसॅव्ही जगात आपण नात्यानात्यांमधलं प्रेम विसरून गेलोय् का ?

ह्यालाच आपली प्रगती झालीय् असं म्हणायचं का?

संगीता जोशी