Sign In New user? Start here.

प्रेम असं करा !

घर....माणसाची गरज.एक मूलभूत गरज. रोटी-कपड्यांइतकीच. रोटीएवढी हे जास्त महत्त्वाचं. कारण रोटीमुळे पोटाची भूक भागते. घरामुळे भावनिक भूकही शांत होत असावी...व्हायला पाहिजे.तरच ते ‘घर’! दगड-माती..कॉंक्रीटचे ठोकळे म्हणजे का घर?House & Home यातील फरक शिक्षकांनी शाळेत कधीतरी समजावून सांगितला होता. पण त्या सर्व लहान वयात शिकलेल्या गोष्टींचा खरा अर्थ मोठ्या वयातच कळतो.

प्रेम असं करा !

 

संगीता जोशी

व्हॅलेंटाईन डे ! प्रेमाच्या अभिव्यक्तीचा दिवस ! आपल्याकडे आता ही प्रथा चांगलीच रुळली आहे. त्यात गंमत म्हणजे प्रेममूर्ती मदन याचा जन्मदिवसही (वसंत-पंचमी) ह्या वर्षी १४ फेब्रुवारीलाच येत आहे ! रति-मदनाचीही वसंत-पंचमीला पूजा करतात. योगायोगाने यंदा दोन्ही दिवस एकत्रच आले आहेत.

व्हलेंटाईन डे ची कल्पना जरी परदेशी असली तरी आपण ती आता आपलीशी केली आहे. कोणाचे विरोध, कोणाचे आक्षेप, त्यावरून क्वचित होणारं राजकारण हे सारं आपण धुडकावून लावलं आहे. आपला समाज प्रेमासाठी किती आसुसलेला आहे, नाही का? चांगलंच आहे. प्रेम हाच खरा मानव-धर्म आहे! आपण सर्व प्रेमाने जोडले गेलो तर हा विश्व-समाज किती आनंदी होऊन जाईल !

प्रेम ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला केवळ तरुण मुलांमधील प्रेम एवढाच बोध होतो. त्यामुळेच कॉलेजमध्ये तरुणवर्ग ह्या दिवसाची वाट पाहात असतो हे स्वाभाविकच आहे. कोणाला लाल गुलाब द्यायचा किंवा कोणाकडून तो घ्यायचा याचा विचार आधीच होत असावा.

व्हॅलेंटाईन डे म्हटला की मला आठवण होते ती एका फार जुन्या गोष्टीची. म्हणजे एका कथेची. ओ’हेनरी

या इंग्लिश लेखकाची ही कथा आहे.

कथेतील पति-पत्नी एकमेकांवर खूप प्रेम करत असतात. त्यांची नावे जॉन व एमिली. कदाचित् दुसरीही असू शकतील. खानदानी श्रीमंती असते. पण काही कारणांमुळे त्यांना वाईट दिवस येतात. संपत्ती हळूहळू कमी होऊ लागते. घरातील अनेक मूल्यवान वस्तू विकून गरजा भागवाव्या लागतात. पण दोघेही आनंदात असतात.

परस्परांचे प्रेम जराही कमी होत नाही. उलट एकमेकांना परिस्थितीची झळ पोहोचू नये अशी काळजी दोघे घेत असतात.

शक्य त्या सर्व वस्तू विकल्या तरी एक जुने,खिशातील घड्याळ (पॉकेट-वॉच) मात्र जॉन विकत नाही. कारण ते अगदी स्पेशल असतं. त्याच्या वडिलांनी त्याला दिलेलं. रत्नजडित. तो ते नेहमी खिशात बाळगत असे. कधीही ते बाहेर काढलं की पाहणारे त्या सुंदर घड्याळावर लुब्ध होऊन जात. ते विकण्याची कल्पनाही तो करू शकत नसे.

एकदा, ख्रिसमस जवळ आला होता. आता पत्नीला काय भेटवस्तू द्यावी ? जवळ पैसे तर नाहीत! पण ख्रिसमसचे गिफ्ट तर आणलेच पाहिजे ! शेवटी त्यानं विचार केला, की आता घड्याळ विकणं हाच एक उपाय आहे. ते विकून आपण एमिली ला आवडलेली हेअर-पिन गिफ्ट करू शकतो. पैसे वाचवायचे म्हणून तिनं केस कापले नाहीत; आणि लांब वाढलेले तिचे सोनेरी केस मला खूप आवडतात. मग, ठरलं. ती पिन घ्यायचीच.

ती रत्नजडित हेअर-पिन घेऊन जॉन घरी येतो. इकडे, एमिली सुध्दा विचार करत असते की जॉनला काय भेट द्यावी? तिला माहीत असतं की तिचे सुंदर सोनेरी केस विकले तर खूप पैसे येतील. पण जॉनला माझे केस खूप आवडतात. मग काय करावं? पण आता इलाज नाही !

केस कापून, ती एक मौल्यवान साखळी खरेदी करते. जॉनकडील पॉकेट-वॉच कोटाला लावल्यावर ती खूपच छान दिसेल ! हा विचार तिला सुखवितो. त्या घड्याळाबद्दलच्या त्याच्या भावना तिला माहीत असतात. ती आधी घरी पोहोचते.जॉनची वाट बघत बसते. तो आनंदित झाल्याचा क्षण टिपायला ती अगदी उत्सुक झालेली असते. थोड्या वेळातच जॉन येतो. ही दार उघडते. तो तिच्याकडे बघतो....आणि बघतच राहतो !

&nbsp आत येऊन मटकन खुर्चीवर बसतो. कपाळावर हात मारून घेतो. एमिली ला कळतं तो का उदास झालाय् ते ! ती म्हणते,

‘अरे ! इतका का अपसेट होतोयस ? मी केस कापले म्हृणूनच ना? पण काही दिवसातच पुन्हा वाढणार नाहीत का ? अन् केस विकून मी बघ काय आणलंय् तुझ्यासाठी !’

तेवढ्यात तो खिशातील हेअर-पिन काढून खिन्नपणे तिच्या हातात देतो. तीही तिच्या पर्स मधील साखळी

काढते, ‘ही तुझ्या घड्याळासाठी !’ तिचं वाक्य तोडूनच तो म्हणतो,

‘अगं ! मी ते घड्याळ विकूनच ही पिन आणलीय् !’

दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. पण ते प्रेमाचे ! दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची साक्ष पटलेली असते...!

कथा इथे संपते.

‘प्रतिभा-साधन’ हा ना.सी.फडके यांचा एक ग्रंथ आहे. त्यात ‘आदर्श लघुकथा’ म्हणून वरील कथा दिली आहे. ती जरूर मुळातून वाचा;

.....आणि जोडीदारावर असंच प्रेम करा ..!

संगीता जोशी