Sign In New user? Start here.

प्रेम

संक्रांतीचा सण येऊन गेला. आकाशात पतंगांचा जल्लोष बघायला मिळाला.हल्ली वाहिन्यांच्या माध्यमातून सगळीच अंतरं वितळून गेल्यासारखी झालीयत्, त्यामुळे गुजरात राज्यातील पतंगोत्सव पाहायचीही संधी मिळते.ते पतंग खूप वेगळे होते असं वाटलं. एक पतंग म्हणजे पतंगांची लांबलचक माळच ! मनात आलं, यांचं वजन वाढलं तरीही हे इतके उंच कसे जातात? काही तर पॅरॅशूटसारखे होते ! उंच जाण्याच्

प्रेम

 

संगीता जोशी

सध्या झी. मराठी चॅनलवर चाललेली ''एका लग्नाची दुसरी गोष्ट'' ही मालिका खूपच लोकप्रिय आहे. देश-परदेशातील मराठी माणसं ती बघतात. या मालिकेचा नायक घना(घनःश्याम) याच्या तोंडी एक वाक्य आहे, ''या जगात सगळ्यात सुंदर, सगळ्यात महत्त्वाची अशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे प्रेम !!''

तुम्ही आम्ही सर्वजण घनाशी सहमत होणार हे नक्की. प्रेम ही जगायला बळ देणारी ऊर्जा आहे, शक्ती आहे. ती अदृश्य असते. म्हणजे शरीरात (म्हणजे हृदयात /मेंदूत) अशी काही दाखवता येत नाही. सगळ्या शक्तिमान गोष्टी अशा अदृश्यच असाव्यात असा सृष्टीचा नियमच आहे की काय, कोणास ठाऊक. इथे मला अणूची आठवण होते. अणूसुध्दा प्रचंड शक्तिवान पण तोही कोणी पाहिला नाही. आणि आत्ताच सापडलेला ''हिग्ज बोसॉन कण'' तोही तसाच ! तुकारामांनी म्ह्टल्याप्रमाणे, ''अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा!'' अवघ्या जगाला व्यापूनही जे उरतं ते प्रेम ही असंच आहे. ते दिसत नाही पण व्यक्त मात्र होतं.

प्रेम शब्दाचा उच्चार करताच प्रथम आपण त्याचा संबंध तारुण्यातलं प्रियकर-प्रेयसी यांच्यातील प्रेमाशीच लावतो. ते साहाजिकच आहे म्हणा. पण ते प्रेमाचं एक रूप झालं. त्या किंवा पतिपत्नी च्या प्रेमाला अनुराग म्हणतात. या एका प्रेमावर पूर्वीची उर्दू शायरी बर्यालच प्रमाणात अवलंबून होती. तो गालिबचा शेर ऐकलाच असेल तुम्ही.

इश्क ने 'गालिब' निकम्मा कर दिया
वरना हम भी आदमी थे काम के.....

अर्थ- आम्ही प्रेमात पडलो, प्रेमाशिवाय दुसरं काहीही करायला नालायक ठरलो. कारण दुसरं काही सुचतच नाही ना! नाहीतर आम्हीही दाखवलं असतं आमचं कर्तृत्व.

जिगर मुरादाबादी काय म्हणतात पाहा,

इक लफ्जे-मुहब्बत का अदना सा फसाना है
सिमटे तो दिले-आशिक,फैले तो जमाना है....

प्रेम ही एक अगदी छोटीशी गोष्ट आहे. इतकी छोटी की प्रेमिकाच्या हृदयात ती सामावून जाते.पण हीच छोटी गोष्ट एवढी मोठी आहे की ती विस्तारली तर सार्यार जगाला व्यापून टाकते.
मीर तकी मीर ह्या शायराची मुलगी 'बेगम' या टोपण नावाने शायरी लिहायची. तिचा एक शेर असा आहे.

इस इश्ककी हिम्मत से मैं सदके हूं कि 'बेगम'
हर वक्त मुझे मरनेपे तैय्यार तो रक्खा....

प्रेमाची ताकद एव्हढी की त्यावरून मला जीव ओवाळून टाकावासा वाटतो. त्याच्यामुळे माझ्यातही सामर्थ्य आलंय्. मृत्यू पत्करायला मी सदैव तयार राहिले.(मरणयातना भोगण्याची हिंमत माझ्यामधे निर्माण झाली.) जुनी उर्दू शायरी ही बहुतांश असफल प्रेमामुळेच निर्माण झालेली आढळते. शायराची सौंदर्यवती प्रेयसी आणि त्याची तिने केलेली उपेक्षा, हे शायरीचे मुख्य विषय बनून गेले होते.

मीरचा एक शेर पाहा,

दिखाई दिये यूं कि बेखुद किया
हमें आपसे भी जुदा कर चले....

तिचं दर्शन आम्हाला झालं आणि आम्ही भानच हरपलो. जणू बेशुध्दच झालो. एव्हढंच नाही, तर ती गेली तर आमचं अस्तित्वच बरोबर घेऊन गेली. आमच्यातला आत्माच तिच्याबरोबर गेला !
ह्या शेराला एक गर्भितार्थही आहे, की हे ईश्वरा, मला जेव्हा तुझं दर्शन झालं तेव्हा माझ्या सर्व इंद्रियांच्या जाणिवाच नष्ट झाल्या. तू प्रकट झालास व माझ्यातील मी निघून गेला.
ही मात्र प्रेमाची सर्वोच्च स्थिती होय. परमेश्वराशी निगडित होण्याची स्थिती. त्याच्याशी एकरूप होण्याची अवस्था. भक्ती ही सुध्दा प्रेमाचीच पायरी आहे. पण त्यातही द्वैत शिल्लक उरतंच. म्हणून शेवटची अवस्था परमप्रेम. यात द्वैत संपतं. ईश्वरा, तू म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तू.
असं म्हणतात, कृष्ण जेव्हा गोकुळ सोडून मथुरेला निघाला, तेव्हा तमाम गोकुळवासी रडत होते. फक्त राधा याला अपवाद होती. कृष्णाने तिला जाऊन विचारले, ''तुला दुःख होत नाही मी चाललो आहे याचं?''
तेव्हा तिनं उत्तर दिलं, ''तू दूर जाऊच कसा शकशील? कारण तू आणि मी वेगळे थोडेच आहोत?'' हे खरं दिव्य प्रेम ! Divine Love !!
आपण सर्वजण प्रेम करतच असतो. आईवर, मित्रमैत्रिणींवर, मातृभूमीवर...आणखीही प्रेमाच्या इतर जागा असतात. कले वर(एखादी कला), भाषेवर... यादी वाढत राहील..
ही सगळी त्या दिव्य प्रेमाचीच रूपे आहेत. पण म्हणून ही सगळी प्रेमाची रूपं आपल्या मनात असली म्हणजे आपण ईश्वरावरच अप्रत्यक्ष प्रेम करत आहोत असे होत नाही. जसं, फर्निचर लाकडापासून बनविलेलं असलं, तरी ते एकत्र करून मूळ झाड तयार होणार नाही, तसं ! म्हणून दिव्य प्रेमाची अनुभूती स्वतःच स्वतंत्रपणे घ्यावी लागते....
....संगीता जोशी

संगीता जोशी यांचे दर आठवड्यातील वेगवेगळे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात. यासाठी खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.(झगमग टीम)