Sign In New user? Start here.

रुबीची गोष्ट....!

संक्रांतीचा सण येऊन गेला. आकाशात पतंगांचा जल्लोष बघायला मिळाला.हल्ली वाहिन्यांच्या माध्यमातून सगळीच अंतरं वितळून गेल्यासारखी झालीयत्, त्यामुळे गुजरात राज्यातील पतंगोत्सव पाहायचीही संधी मिळते.ते पतंग खूप वेगळे होते असं वाटलं. एक पतंग म्हणजे पतंगांची लांबलचक माळच ! मनात आलं, यांचं वजन वाढलं तरीही हे इतके उंच कसे जातात? काही तर पॅरॅशूटसारखे होते ! उंच जाण्याच्

रुबीची गोष्ट....!

 

संगीता जोशी

कात्रणं जमविण्याचा छंद आजच्या काळात किती 'आऊट-डेटेड' आहे ना? गूगलवर सर्च दिला की सगळं हाताशी. पण आज मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ती गूगलवर नाहीच मिळणार. माझ्याजवळ ती एका जीर्ण बाडात सापडली....आधी वाचा..
रुबी ही एक पत्रकार-लेखिका. फार मोठी प्रसिध्दही नाही. काही नियतकालिकांमधून लेख लिहिणारी. आज रुबी एका ऑपरेशन थिएटरमध्ये वरच्या गॅलरीत बसली आहे. एक महत्त्वाचं गंभीर ऑपरेशन तिथं होणार आहे. हृदयावरची शस्त्रक्रिया. गुंतागुंतीची. रुबी एका मासिकासाठी हृदयरोगावर लेखमालिका लिहितेय्. म्हणूनच हे ऑपरेशन पाहाण्याची खास परवानगी तिला मिळालीय्. नाहीतर इतरांसाठी अशा शस्त्रक्रियेला गॅलरी बंदच असायची.
ऑपरेशनची जय्यत तयारी झाली आहे....कित्येक प्रकारच्या सुर्यां, कातर्याी, अनेक मशिन्स,...त्या काळात उपलब्ध होती ती सर्व साधनं..रुबीला मेडिकल मधलं 'शास्त्रीय' फारसं काही कळत नाही....ती फक्त उत्सुकतेने बघते आहे. तोंडावर हिरव्या रंगाचे मास्क बांधलेल्या नर्सेस आयत्यावेळच्या तयारीत मग्न आहेत. कोणीही कोणाशी एक शब्दही बोलत नाहीए. थिएटरमधलं वातानुकूलित थंड वातावरण गंभीर्यात भर घालतंय्. सगळ्यांचे डोळे एकमेकांशी खुणांनी बोलताहेत....नि हात कामात गुंतलेत...रुबी असलं वातावरण प्रथमच पाहाते आहे.....त्यामुळे तिलाही थोडं अस्वस्थ वाटू लागलंय्. ....
इतक्यात मुख्य दरवाजातून स्ट्रेचर आत आलं. त्यावरचा पेशंट नीटसा दिसू शकत नव्हता. त्यामुळे, जीवन-मरणाशी झगडा करत असलेली ही व्यक्ती कोण असावी असल्या फाजील कुतूहलाला वाव नव्हता. थिएटर मधल्या कर्मचार्यांतना हे नित्याचंच...म्हणूनच का त्यांचे डोळे निर्विकार वाटताहेत? पेशंटला टेबलवर घेतलंय्....हे काही मदतनीस डॉक्टर असावेत...

किंवा शिकावू डॉक्टर्स असावेत. रुबीच्या मनावरचं दडपण वाढू लागलं. तिला किंचित अंधारी आल्यासारखंही वाटू लागलं....तेवढ्यात मुख्य डॉक्टर आत आले..रूबीला वाटलं, मला जर चक्कर आली, तर हे डॉक्टर पेशंटला बघणार की माझ्याकडे ? छेः ! मला काही होता कामा नये.... तिनं गॅलरीचा कठडा घट्ट धरून ठेवला.....आणि समोर पाहिलं तर मुख्य डॉक्टरने रुग्णाच्या छातीवर मोठा 'कट्' घेतला होता अन् तांबडं भडक रक्त एकदम उसळून वर आलं....रुबीला पुढचं काही दिसेनासं झालं.......
त्या अर्धशुध्द अवस्थेत रुबीच्या डोळ्यापुढे काही दृश्ये तरळू लागली.... तिला नुकतीच नोकरी लागली होती. हातात पैसे येऊ लागले. तिनं काय-काय बेत मनात रचले होते...तिला आता पियानोचा क्लास लावायचा होता. उत्तम पियानोवादक होण्याचं तर तिचं उराशी बाळगलेलं मोठं स्वप्न होतं...छान छान ड्रेसेस घ्यायचे होते जी हौस तिला कधीच भागवतां आली नव्ह्ती.... पण त्या एका संध्याकाळी? .....
तिच्या वडिलांनी तिला जवळ बोलावलं नि म्हटलं, '' बेटा, मी आज तुला एक विनंती करणार आहे.... तू कमावतेस त्यापैकी काही पैसे मला देशील? मला सांगायला अवघड वाटतंय्...पण तुझ्या खर्चाच्या जरूरीपुरते ठेवून बाकीचे मला दिलेस तर ...तरच, जेम्स..तुझा भाऊ ..स्वतःचं शिक्षण पुरं करू शकेल...आपली परिस्थिती तुला माहीत आहेच.. माझी सक्ती नाही...तू जर नाही म्हणालीस तर मी त्याला शिक्षण सोडून नोकरी धरायला सांगेन....''
रुबीला वाटलं, परिस्थितीमुळे मी नाही का शिक्षण सोडलं? त्यानेही सोडावं..मान्य आहे, मी त्याच्याएवढी हुषार नव्हते... पण मी आत्ताकुठे जरा आनंदात आहे.. मी आता जरा मौजमजेत राहीन.. माझी स्वप्नं पुरी करीन म्हटलं तर... मला मात्र मनाप्रामाणे जगण्याची संधी नाही, अन् त्याला मात्र....का? तो पुरुष आहे म्हणून? ते काही नाही.. मी नाही देणार माझे पैसे........पण हे सगळे मनातले विचार मनातच राहिले.तिला गप्प पाहून वडील म्हणाले, ''मग?.. काय विचार आहे तुझा? फक्त काही वर्षांचाच प्रश्न आहे....''

रुबीला स्वतःला काही कळायच्या आतच ती म्हणाली, '' हो. देईन मी '' वडील मायेनं तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाले, '' बेटा, किती चांगली मुलगी आहेस तू.मला वाटलंच होतं, तू नाही म्हणणार नाहीस म्हणून...''
त्या अवस्थेतही रुबीला आठवत होती आपली रिकामी पर्स. न खरेदी केलेले आपले आवडते ड्रेस.. न वाजवलेल्या पियानोचे खिन्न सूर....तेव्हढ्यात....ऑपरेशन थिएटर मधली शांतता भंग पावली होती. डॉक्टर्स एकमेकांशी हलक्या आवाजात बोलू लागले होते. बहुधा मुख्य डॉक्टर इतर डॉक्टर्सना काहीतरी समजावून सांगत असावेत. एकीकडे रुग्णाची जखम शिवून टाकली जात होती.. रुबी आता पूर्ण शुध्दीत होती. ती थिएटर मधून बाहेर आली. थिएटरसमोर लांबच लांब कॉरिडॉर...तिथं अगदी शुकशुकाट होता.फक्त एका बाकावर रुग्णाचे सचिंत नातेवाईक ऑपरेशन केव्हा संपतेय् याची वाट बघत बसले होते. थिएटरमधून बाहेर येणारी पहिली व्यक्ती रुबी. नातेवाईक अपेक्षित नजरेनं तिच्याकडे पाहात राहिले. रुबी त्यांच्याजवळ येऊन एवढंच म्हणाली, ''डॉक्टर इतक्यात येतीलच.''
ते होते रुग्णाचे आई-वडील. रुग्ण होती एक सात वर्षाची कोवळी मुलगी.ती जन्मतःच हृदयरोगी होती. पण हे ऑपरेशन त्यावेळी तिला झेपण्यासारखं नव्हतं. रुबीनं त्या आईच्या हातावर हात ठेवून किंचित दाबला व दिलासा दिला. तेवढ्यात मुख्य डॉक्टर आले. उंचापुरा बांधा.. देखणं रूप..पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यातला आत्मविश्वास !, जो त्यांच्या चालण्यातही दिसून येत होता.डॉक्टर जवळ आले.पण कोणाचाही धीर होत नव्हता विचारण्याचा....कसं झालं ऑपरेशन?..माझी लाडकी वाचेल ना आता?...
डॉक्टरच रुग्णमुलीच्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ''सगळं काही ठीक झालं. आता काळजी करू नका..ती काही वेळातच शुध्दीवर येईल. मग तुम्ही तिला भेटू शकाल. आता जा आणि काहीतरी खाऊन-पिऊन घ्या...'' वडील कृतज्ञतेनं काही बोलू पाहतात..पण तोंडून शब्दच फुटत नाहीत...डॉक्टरच पुढे म्हणतात, '' मी काही केलं नाही. त्या ईश्वराची...येशूचीच ही कृपा....''

एवढं बोलून डॉक्टर रुबीकडे वळतात.रुबी त्यांच्याकडे बघून प्रसन्न हसते. डॉक्टरही हसून तिचा हात आपल्या हातात घेऊन म्हणतात, ''चल, थोडी कॉफी घेऊ या.'' ती यंत्रवत् त्यांच्याबरोबर चालू लागते....अभिमानानं...गर्वानं.. तिला जाणवतं, तिचे डोळे भरून येताहेत....ती म्हणते, '' आज तू एक जीव वाचवलास... तुझी हुषारी...तुझं कौशल्य...आणि प्रभूला श्रेय देणारी तुझी नम्रता ! खरंच मला तुझा खूपखूप अभिमान वाटतो....''
डॉक्टर म्हणतात, '' पण अजूनही तुला तुझी रिकामी पर्स आठवते आणि दुःख होतं ना ?'' रुबी उत्तरते, '' यापुढे नाही होणार... कधीच नाही होणार..फक्त आठवेल की माझ्या भावाने एक जीव वाचवला होता.. माझ्यादेखत... आणि तो आणखी कितीतरी जीव वाचवू शकतो एवढं त्याचं सामर्थ्य आहे..मला तुझा नेहमी अभिमानच वाटत राहील... त्या रिकाम्या पर्समुळेच आज मला श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय्, जेम्स...!''
रुबी जेम्सला खेटून चालतच राहिली....चालतच राहिली.....
एक स्त्री म्हणून रुबीवर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? पण एखाद्या कुटुंबात एकालाच शिक्षण देणं आई-वडिलांना शक्य असेल, तर मुलालाच प्राधान्य दिलं जातं, ही वस्तुस्थिती आहे. कारण कुटुंबाचं पोषण करण्याची जबाबदारी पुरुषांची, असं आजही सर्रास मानलं जातं. अपवादात्मक वेगळी उदाहरणं असतीलही. पण पुरुष मुख्य कर्ता व स्त्रीचा फक्त हातभार, असंच चित्र दिसतं. शिवाय मुलीपेक्षा मुलगा हुषार असेल तर त्यालाच प्राधान्य दिलं तर बिघडलं कुठे? आणखी एक मुद्दा, मुलगी लग्न होऊन परक्या घरी जाते. त्यानंतर तिच्या पैशावर वडिलांचा हक्क रहात नाही. तरीही जरूर म्हणून तिनं पैसे दिले तर सासरच्यांना ते कितपत रुचेल? किंवा वडिलांनाही स्वाभिमान दुखावल्यासारखं वाटू शकतं ! थोडक्यात, समाजाची मानसिकता खूप बदलण्याची गरज आहे...


रुबीचं दुःख नंतर समाधानात, आनंदात बदललं. तिच्या त्यागाच्या रूपात तिनं किंमत मोजली. पण या गोष्टीत, स्त्री म्हणून तिच्यावर अन्याय झाला असं मला वाटत नाही. तुमचं मत काय ?...... जरूर नोंदवा.
संगीता जोशी यांचे दर आठवड्यातील वेगवेगळे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात. यासाठी खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.(झगमग टीम)

....संगीता जोशी