Sign In New user? Start here.

श्रद्धा कलेवरची...!

सोमवारची सकाळ. जो तो स्वतःचं आवरून आपापल्या कामाला जायच्या तयारीत...मुलं कॉलेजला ...हे ऑफिसला.. तेवढ्यात यांनी आठवण केली, '' अगं, आज MSEB चं बिल भरायचं आहे, बरं का.. आजच शेवटची तारीख आहे...''
'' अहो पण, तुम्ही शनिवारीच भरणार होतात ना? नाहीच का भरलं?.''

श्रद्धा कलेवरची...!

 

संगीता जोशी

आज तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं आहे की हजारो मैलांवर चाललेली मॅच आपण घरबसल्या पाहू शकतो. सचिनने महाशतकाची काढलेली शंभरावी धाव पाहून आनंद लुटू शकतो. आज आपल्याला टी.व्ही., मोबाईल, कॉम्प्यूटर इत्यादि शिवाय जगता येईल का? कोणीही हो म्हणणार नाही. पण आमच्या आधीची पिढी अशी होती की ते लोक सुधारणांपासून कोसो दूर होते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीची काही चिन्हं दिसतही होती. पण त्याचा उपयोग करून जीवनमान सुधारणं सामान्य माणसाच्या आवाक्यात नव्हतं. उदा.ग्रामोफोन किंवा रेडिओ! एकतर मोठी शहरं सोडली तर वीजही नसायची. मग या साधनांचा काय उपयोग? फक्त श्रीमंतांनाच ह्या गोष्टी परवडत असत.

असंच एक मिनी-शहर. धुळे. तिथे जुन्या धुळ्यात एक कुटुंब रहात असे. त्या गृहस्थांचं नाव केशवराव कुलकर्णी. त्यांना शास्त्रीय संगीताची फार आवड. तेव्हा रेडिओ क्वचित कोणाकडे तरी असे. अशाच एका श्रीमंत घरी ते शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकायला कधीकधी जायचे. पूर्वी माणुसकी जागृत होती. पाहुण्यांचं आदरातिथ्यही व्हायचं. अर्थात् तरीही केशवरावांना संकोच व्हायचा. पण काय? संगीताचं प्रेम स्वस्थ बसू देत नसे.त्यांची पत्नी एकदा म्हणाली, ''तुमचा स्वभाव संकोची. असं करू या का? आपणच रेडिओ घेऊन टाकू.'' पत्नीचं खरंच कौतुक होतं. त्यावेळ्चे तुटपुंजे पगार व रेडिओची किंमत पगाराच्या साठ सत्तर पट ! पण पतीची ओढ पत्नीने जाणली होती.

खूप काटकसर करून हे जमवायचेच असे दोघांनी संमतीने ठरविले. त्यावेळी एकाच कंपनीचा रेडिओ मिळायचा. बहुधा नॅशनल ! पूर्वी हप्त्याने काहीही मिळत नसे.

पैसे जमल्यावर केशवराव रेडिओ घरी घेऊन आले.वीजही होती. पत्नी व मुलांना वाटले,आता गाणे ऐकू येणार. पण घरातला विणलेला 'रुमाल' केशवरावांनी रेडिओवर घालून तो झाकून ठेवला. मग त्यांनी 'लिसनर'चा अंक मागून आणला. व हिराबाई बडोदेकर यांचे गाणे कधी आहे ते शोधले.(त्यावेळी पूर्ण महिन्याचे कार्यक्रम लिसनर या अंकात येत असत.) मुंबई रेडिओवर पंधरा दिवसांनंतर हिराबाईंचे गाणे होते. त्यावेळी प्रोग्रॅम लाइव्ह असत. रेकॉर्डिंगचा शोधच लागला नव्हता. केशवरावांनी सगळ्यांना संगितले, ''पंधरा दिवसांनंतरच रेडिओ लावायचा. त्यांच्याच गाण्याने शुभारंभ करायचा.!'' सगळे हिरमुसले. पण केशवराव बधले नाहीत. शिवाय वडिलांचा उपमर्द करण्याची कोणाची हिम्मत नव्हती व इच्छाही नव्हती.

अखेर तो दिवस आला. रेडिओवरचा रुमाल निघाला. प्रेमाने रेडिओ पुसला.त्यावर फुले वाहिली गेली. उदबत्तीही लावण्यात आली. आणि घड्याळात सकाळचे साडेसातला काही सेकंद बाकी असतांना बटन ऑन करण्यात आले.(पूर्वीचे रेडिओ तापायला काही क्षण जात.) तसे क्षण गेले आणि हिराबाईंचा षड्ज ऐकू आला.केशवरावांच्या डोळ्यात पाणी तरळले..!हिराबाईंवर केवढी श्रध्दा ! त्यांच्या गाण्यावर केवढं अपार प्रेम !! केशवराव समाधानात बुडून गेले.डोळे मिटून भक्तिभावाने गाणे ऐकत राहिले....

गाणे संपले.उद् घोषणा झाली. ''हिराबाई बडोदेकर राग अल्हैयाबिलावल गात होत्या. तबल्याची साथ निजामुद्दिन खॉं यांनी केली.''

रेडिओ बंद केला गेला. पत्नी बाहेर आली. तिच्या हातात गोड शिर्‍याच्या बशा होत्या. नैवेद्याची वाटी रेडिओपुढेही ठेवण्यात आली. सर्व जण आनंदात होते..एक सोहोळा पार पडला होता...! असे होते पूर्वीचे लोक ! तुम्हाला हसू येतंय्? नका हसू. कारण त्यांच्या त्या भावना अस्सल होत्या. ती श्रध्दा होती.

चाळीसच्या दशकात घडलेली ही घटना नावासह संपूर्ण खरी आहे ! खंत वाटते, कुठे गेली आता तशी माणसे? त्या श्रध्दा? ती कलेची पूजा?

आपण फारच कोरडे होऊन गेलो आहोत का?

संगीता जोशी.(मराठी कवयित्री-गझलकार)