Sign In New user? Start here.

सोमवारची सकाळ. जो तो स्वतःचं आवरून आपापल्या कामाला जायच्या तयारीत...मुलं कॉलेजला ...हे ऑफिसला.. तेवढ्यात यांनी आठवण केली, '' अगं, आज MSEB चं बिल भरायचं आहे, बरं का.. आजच शेवटची तारीख आहे...''
'' अहो पण, तुम्ही शनिवारीच भरणार होतात ना? नाहीच का भरलं?.''

आयुष्य तेच आहे, अन हाच पेच आहे...!

 

संगीता जोशी

संगीता जोशी
(गझलकार)

आज अनेक क्षेत्रात महिला सहज वावरतांना दिसतात. मात्र १९७०-८० च्या दशकात महिलांना एवढं स्वातंत्र्य नसायचं. किंवा तेव्हा महिला अधिक शिक्षितही नव्हत्या. अशातही संगीता जोशी ह्या पहिल्या गजलकार म्हणून समोर आल्यात. त्यांचे अनेक गजलसंग्रह प्रकाशित झालेत. अनेक मुशायरे, परिसंवाद त्यांनी गाजवले. एक महिला म्हणून त्यांचा हा प्रवास कसा होता, त्यांना कसे अनुभव आलेत आणि पहिली महिला गजलकार होणाचा सन्मान त्यांनाच असल्याने त्यांना काय वाटतं. याबाबत आम्ही महिला दिनाच्या निमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न केला....

संगीताताई तुमची या क्षेत्रातील सुरवात कशी झाली?

* पहिली महिला गजलकार म्हणून माझी या क्षेत्रातील सुरवात कवितेने झाली. मुळात जेव्हा मी गजल लिहिली तेव्हा मला महितीच नव्हते की ती गजल आहे. कालांतराने सुरेश भटांच्या गजल वाचनात आल्यात आणि मला कळाले की, मी जे लिहिते ती गजल आहे. या अनुषंगाने मी गजलचा अभ्यास करणं सुरू केलं. गजलेची बाराखडी जाणून घेतली. मुळात मला संगीत आवडतं, गायन आवडतं, त्यातलं थोडं कळतं म्हणून गजल आणखी चांगली लिहू शकले. त्यानंतर गजलेची वॄत्त माहित झालीत. गजलेची वॄत्त ही आपली शाळेतील वॄत्त नसतात. म्हणून मग गजलांच्या वॄत्तांचा अभ्यास केला. मी पहिली गजल १९६० साली लिहिली ती देवप्रिया वॄत्तात होतीत. हे मला ८० साली कळालं. गजलच्या आधी मी ‘राजू’ या नावाने कविता लिहित होते. खुप वर्षांपूर्वी याच नावाने माझ्या कविता अनेक दैनिकात प्रसिद्धही झाल्या आहेत.

दु:खं माझ्या अंतरीचे काय सांगू साजणी ?
आठवूनी निर दडे माझिया गे लोचनी...!
ही ती पहिली गजल होती.

असा हा प्रवास सुरू असतांना माझा एक कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला. खरंतर तेव्हा मला माहितीही नव्हतं की, मी इतकी मोठी कवयित्री होणार आहे. किंवा हेही माहिती नव्हतं की, आपल्या कविता खरंच प्रकाशित करण्याच्या लायकीच्या आहेत का? कॉन्फिडन्स नाही असा याचा अर्थ नाही. पण एक संकोच होता की, आपण कुठे अजून इतके मोठे आहोत. नंतर १९८६ साली मी माझं हस्तलिखित सांस्कॄतिक मंडळाला दिलं आणि त्यांनी ते प्रकाशित करण्याचं ठरवलं.

* या क्षेत्रात अजूनही जास्त स्त्रिया नाहीत. काय कारण असावं?

पूर्वी मी एकटीच महिला गजलकार होते. मात्र आता काही महिला गजल लिहायला लागल्यात. पण काय होतं की, महिला आज शिकतात. नोकरी करतात. यासोबत संसार सुद्धा सांभाळतात. या संसाराचा गाडा चालवण्यात त्या खुप व्यस्त होऊन जातात. त्यामुळे त्यांना इच्छा असूनही दुसरं काही करता येत नाही. सोबतच काव्य लिहिण्यासाठी एक प्रतिभाही लागते. ती सर्वांकडेच असते असं नाहीये. ती कला जर उपजतच असेल तर लिखाणाचं पोषण केलं पाहिजे. स्त्रिया या क्षेत्रात कमी असण्याचं दुसरं एक कारण असंही आपण सांगू शकतो की, मुळातच स्त्रियांना मोकळेपणा असा नसतोच. त्यांच्यावर बरीचशी बंधने असतात. आता माझ्याबाबतीत असं झालं नाही. मला घरच्यांनी खुप पाठिंबा दिला. त्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहचू शकले. या सर्व प्रवासात खरंतर मला काही अडचणी आल्याच नाहीत. उलट मला माझ्या कवितांच्या माध्यमातून स्त्रियांचं विश्व आणखी प्रखरपणे मांडता आलं.

मला माझे अनुभव रेखाटता आले. कधीही कुठलाही विचार मांडण्याची भिती मनाला जाणवली नाही.

मी एका गजलमध्ये बंदिस्त स्त्रीचं विश्व मांडलं आहे. ते असं की,
ओठ शिवण्याचे कुठे शिकलीस पोरी?
उमलण्या आधीच का मिटलीस पोरी?

नव ॠतु येता कळीचे फुल झाले,
पाहुनी ते खिन्न का हसलीस पोरी?

तान्हुल्या ओठी दुधाचे थेंब देण्या,
आटवूनी रक्त तू झिजलीस पोरी,

भाकरीची भूक जेव्हा आग झाली,
मुक तू खिडकीतही बसलीस पोरी,

हे दयाळू जग आता आले म्हणाया,
घे चिता ही नीज हो दमलीस पोरी...!
याला मुसलसल गजल म्हणतात....!

* पहिली महिला गजलकार असण्याचा बहुमान तुम्हाला मिळाला, याबद्दल कसं वाटतं?

काव्य क्षेत्रात आल्याने अनेक फायदे मला झालेत. अनेक लोकांशी परिचय झाला. विचारांची देवाणघेवाण करता आली. पहिली स्त्री गजलकार म्हणून मी साहित्यात काहीतरी करू शकले, हा खुप मोठा सन्मान आहे माझा...शिवाय पुढे कधीही गजल विषयावर कोणीही अभ्यास करेल तेव्हा माझा उल्लेख त्यात केल्याशिवाय त्या व्यक्तीला पुढे जाता येणार नाही. हा खुप मोठा आनंद आहे माझ्यासाठी...

२१ व्या शतकातील स्त्रीबद्दल तुमचं काय मत आहे?

२१ व्या शतकातील स्त्रीबद्दल बोलायचं झालं तर हेच म्हणेन की, मला अजूनही असं वाटतं की, स्त्रिया खुप विचार करत नाही. हे माझं निरीक्षण आहे. आज स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण मिळूनही त्याचा त्या कितपत फायदा करून घेतात ही शंकाच. कारण मुळात स्त्री ही जास्त विचारच करू शकत नाही असं मला वाटतं. याला कारण म्हणजे तिच्यावर असलेली बंधनं...तिने स्वत:चा विचार केला पाहिजे. आता बघा ना की, आज अनेक निवडणुकांमध्ये महिला निवडून येतात. पण प्रत्यक्षात त्यांचे पतीच राज्य करतील असं चित्र दिसतंय. त्यामुळे स्वत:ची क्षमता वाढवणं महत्वाचं आहे. विचारांना चालना देण्यासाठी स्त्रियांनी खुप वाचन करायला हवं. वेगवेगळ्या क्षेत्रातील वाचन त्यांनी करावं. तसलीमा नसरीन चं ‘लज्जा’ असो की, आणखी काही....पण वाचन केलंच पाहिजे. स्त्री मुक्ती याला काही अर्थ नाहीये, स्त्रीचं सक्षमीकरण झालं पाहिजे.

आजही महिलांवर अनेक अत्याचार होतांना दिसतात. याबाबतीत मला हे सांगायचं आहे की, हल्ली नवीन पिढीमध्ये असं दिसतं की, मी मला हवं तसं वागणार, मला हवे तसे कपडे घालणार. मी स्वतंत्र आहे...म्हणजे मुक्तीचा अर्थ त्या असा घेतात की मला काहीही करायला मुभा आहे. त्यांना जर म्हटलं की, इतकाले मोठे गळे असलेला ड्रेस घालू नको, तर त्यांना ते स्वातंत्र्यावर बंधन वाटतं. आता एक लक्षात घ्या की, स्त्री आणि पुरूष यांचा विचार केला, तर निसर्गामध्येच हे आहे की,

कशात तुम्ही पुरूषांची बरोबरी करताय? पुरूष आयपीएस ऑफीसर झाला त्यात बरोबरी करा, कुणी पायलट झाला त्यात बरोबरी करा. हे सर्वांसाठीच नाहीतर ज्यांना हे अत्याचार नको आहेत त्यांनी मात्र मर्यादेत राहणं गरजेचं आहे. तरच हे अत्याचार कमी होतील. मॉडर्निटी ही तुमच्या देह उघडं टाकण्यात नाही तर तुमच्या विचारातून दिसू द्या, असं मी म्हणेन.

सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!

अमित इंगोले