Sign In New user? Start here.

सुभाषिते...

ती एक जाहिरात तुम्ही टी.व्ही.वर पाहिली आहे ना? एक मुलगा सोफ्यावर पहुडला आहे. सायकलच्या घंटीचा आवाज ऐकून पग जातीचा कुत्रा त्या मुलाला टी-शर्ट ओढून उठवतो...सायकलवरून त्याची आवडती मुलगी तिथून जाते..

सुभाषिते...

 

संगीता जोशी

देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे,
एक दिवस घेता घेता, देणा-याचे हात घ्यावे...

कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या ह्या ओळी आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाच्या आहेत. आता ह्या ओळी पहा, ‘’अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.’’ह्या ओळी कुसुमाग्रज यांनी सागराला उद्देशून म्हटल्या आहेत. हे दोघेही ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कवी आहेत.

सुरेश भट यांच्या ह्या ओळी पाहा,
उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...

अशा ओळी सहज सर्वांच्या ओठी घोळतात.एकवेळ कवीचं नाव माहीत नसेल, पण त्यांच्या ओळी मात्र नेहमीच्या वापरातले वाक्प्रचार वापरावेत, तशा वापरल्या जातात. त्यामुळे ते कवी अजरामर झालेले असतात. ह्यांनाच म्हणतात, सुभाषिते.

अशीच एक ओळ..."आहे मनोहर तरी गमते उदास" तुम्हाला आठवलं ना की सुनीताबाई देशपांडे यांच्या आत्मचरित्राचं ‘’आहे मनोहर तरी..’’हेच शीर्षक आहे!

पण ज्या कवितेतील ही ओळ आहे, ती कविता वा तो कवी आपल्याला फारसा माहीत नाही. ते कवी होते, दिनकर नानाजी शिंदे. त्यांनी सरस्वतीकंठाभरण ह्या टोपण-नावाने लेखन केलं आहे.

पूर्वी, कवितेची एखादी ओळ देऊन कवींना समस्यापूर्ती करण्यास सांगत असत. म्हणजे, दिलेली ओळ आणखी ओळी लिहून त्यात गुंफायची. आहे मनोहर तरी गमते उदास, या ओळीची समस्यापूर्ती करणारी आठ कडवी दिनकर नानाजी शिंदे यांनी लिहिली. ती सगळीच कविता फार सुंदर आहे.

सगळं काही आहे, पण एक काहीतरी नाही अशी खंत, आणि त्यामुळे येणारे औदासीन्य प्रत्येक कडव्यात आलेलं आहे. त्यातील काही कडवी अशी आहेत... कविता वसंततिलका या वृत्तात लिहिलेली आहे.

सर्वांगसुंदर,सुभूषण वस्त्रयुक्त । चैतन्य, वाणि, मन,बुध्दिहि ज्या प्रशस्त ।
ऐसे शरीर, परि शील नसे तयास । आहे मनोहर तरी गमते उदास ।।

खरंय् ना ? एखाद्या व्यक्तीजवळ शरीरसौष्ठव आहे, ते सुंदर वस्त्रालंकारांनी नटलेलं आहे, व्यक्तिमत्त्व प्रसन्न आहे, ती व्यक्ती बोलण्यात चतुर आहे, मनानं निर्मळ आहे, बुध्दिमानही आहे, पण त्या व्यक्तीची वागणूक मूल्यांना धरून नाही, तर ते सर्व गुण वाया गेले असेच नाही का?

पुढील कडवे असे आहे..

आम्रादिकी गगनचुंबित थोर वृक्षी । उद्यान एक भरले लतिका-विशेषी।
तेथे परंतु न वसंत करी विलास । आहे मनोहर तरी गमते उदास ।।

एखाद्या उद्यानात आंब्याची डौलदार झाडं आहेत, विशेष प्रकारच्या सुंदर वेली आहेत, पण या सगळ्यावर मोहोरच नाही, फुलांचा वसंतच नाही,तर काय उपयोग? पुढे कवी लिहितो,

निद्रेत मी नृपति होउनि सौख्य भोगी ।
की चित्पदी मिळुनि जाइ बनोनि जोगी ।

जेव्हा कळे सकल हा परि स्वप्नभास ।
आहे मनोहर तरी गमते उदास ।।

---एखादेवेळी आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नात आपण राजा असतो,सगळी सुखं आपल्या पायाशी लोळण घेत असतात;किंवा एखादेवेळेस स्वप्नातच आपण कुणी योगी असतो; आपली साधना सफल होऊन आपण ईश्वरचरणी विलीन होऊन जातो, एकरूप होऊन जातो....ही दोन्ही स्वप्ने आनंद देणारी आहेत.. पण ती स्वप्नेच आहेत. जाग आल्यावर जेव्हा कळतं की तो आनंद क्षणिकच होता, तेव्हा मन अगदीच उदास होऊन जातं...

पण उदास न होता आपण शाश्वत आनंदाचा शोध घ्यायचा असतो.
तसा आनंद शोधणं हेच तर मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे !

संगीता जोशी