Sign In New user? Start here.

वाह् गुरु....

वाह् गुरु....

 

सुभग ओंक

मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम कुंभार करतो आणि तसच काहीसं काम “गुरु” आपल्या आयुष्यात करतात. माझ्या आयुष्यात बरेच चांगले गुरु मला लाभले हे माझे सद्-भाग्यच. आई-बाबा हे आपले पहिले गुरु. त्या नंतर, मला मिळालेला पहिला शिक्षक होता माझा भाऊ. माझ्या पेक्षा ६ वर्ष मोठा असल्याने, त्याच्या पावलावर पाउल ठेवायला शिकलो.... तेव्हा त्याचे अनुकरण करायचो. आमच्या मध्ये एका सांकेतिक भाषेचा उगम झाला. त्यला काय म्हणायचे होते, ते मला तो न-सांगताच कळायचे, आजही कळते! त्याने मला खूप काही शिकवले: पायावर उभं राहायला, सभा-धीट व्हायला आणि मुख्य म्हणजे “स्ट्रीट-स्मार्ट” व्हायला! त्यांनीच मला नाटकाचा छंद लावला जो आज पर्यंत टिकला आहे.

शाळेत मला आठवता त्यात “कोल्हटकर टीचर”. माझं अक्षर सुधारावं म्हणून “उभ्या” पट्टीने त्या माझ्या बोटांवर मारायच्या. पु.लं च्या चितळे मास्तरांप्रमाणे एका ओळीत किती शब्द असावेत ह्याबद्दल जरी त्या दक्ष नसल्या तरी दोन ओळींच्या मध्ये अक्षर समान हवं, हा त्यांचा सारखा कटाक्ष असे. तसे जर झाले नाही, तर मग बोटांवर उभी लाकडी पट्टी त्या मारत असे ! माझे अक्षर सुवाच्य होण्या मागे त्यांच्या पट्टीचे मोठे योगदान आहे. राजपूत टीचरनी दिलेले प्रेम, नाबर टीचर ने दिलेली शिस्त, चौबळ तिचरांचे drawing, मुजुमदार सरांनी algebra-geometry शिकवताना मारलेले खडू, साठे तीचरांचे मधुर संस्कृत, तरंगिणी खोत ह्यांनी लिहिलेली आणि पाठ करून घेतलेली संस्कुत भाषणं आणि प्रिन्सिपल सिन्हा madam ह्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास .... ह्या सगळ्या गोष्टी मला शालेय जीवनी “अभ्यासाव्यतिरिक्त” खूप काही शिकवून गेल्या! कारखानीस सरांच्या “गणिताच्या” private tuitions, खरच private होत्या (रात्री १०:३० ते १२:३० पर्यंत असायचो आम्ही तिथे), नाडकर्णी सरांचे ते अभ्यास करवून घ्यायचे वेगळेच तंत्र आणि राज्याध्यक्ष सरांचे केयर-फ्री attitude, आजही मला, त्या सोनेरी क्षणांची आठवण करून देतात.

ह्या शालेय शिक्षकांच्या व्यतिरिक्त, अजून काही महत्वाचे गुरु मला लाभले. सौ. सुधा करमरकर ह्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन....... त्यांनी मला नुसत नाटकं नाही तर जगायचा कसं - वागायचं कसं, हे शिकवलं. विनोद हडप, ह्यांनी मला विनोद शिकवला, “timing” शिकवलं, मला “मराठी” वाचयला शिकवलं, वाक्य ‘समजून बोलायला’ शिकवलं. संजीव वढावकर ह्यांनी मैत्री – अल्लड पणा शिकवला, तर सतीश जोशी ह्यांनी मला हरहुन्नरीपणा शिकवला. ह्या सगळ्यांनी मला शिकवली ती “निरीक्षण शक्ती”, “स्मरण शक्ती”, “कल्पना शक्ती”, “एकाग्रता” ,”कलात्मकता”, “संघ-भावना” आणि मुख्य म्हणजे “मुलांना-लोकांना आनंद कसा द्यायच्या!”. चेतन दातार ह्यांनी “theater” शिकवलं, अजित भुरे ह्यांनी “आंतर-नाट्य” दाखवलं तर विजय केंकरे ह्यांनी “साधेपणा आणि सरळ-सोप्पं नाट्याचे” दर्शन दिले.

अमेरिकेत ह्या सगळ्या शिकवणीचा उपयोग झाला, “time management, scheduling, commitment, product-release, work-life balance” असं बरंच काही शिकलो, “नाही” म्हणायला शिकलो, कामाची तत्परता शिकलो....पण आता मला ‘अनुभव’ शिकवतात, “माणसे” नाहीत. “Mentor” बरेच लाभले पण गुरु म्हणून कोणीच नाही. प्रत्येक क्षणी मी त्या गुरूच्या शोधात असतो, पण अजूनही हवा-तसा नवा गुरु सापडला नाही L. अशी माणसे का नाही दिसत आता, हा प्रश्न पडतो? कदाचित मी मोठा झालो म्हणून मी स्वतः स्वतःचे शिकण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी “गुरु” नाही ह्याची खंत मला वाटते, तो मिळत नाही म्हणून काळजी हि वाटते, मला आता गुरुची गरज नाही असे हि वाटते.

पण हे खरे नाही! एकतर अशी माणसे दुर्मिळ झाली आहेत किवा माझे “अनुभवी” डोळे अशा व्यक्तींना बघू शकत नाहीत. आता चांगलं व हिताचं बघायला शिकवणारा गुरु शोधला पाहिजे! डोळे आहेत, पण दृष्टी नाही -- खोटे अनुभव आहेत पण खरी माणसं नाहीत असं झालाय कि काय ? वाह् गुरु ..... आह् गुरु .....

-सुभग ओक

 
आणखी ब्लॉग