Sign In New user? Start here.

मिटली पापणी अन् हृदयाचा एकच ठोका ऐकला....

मिटली पापणी अन् हृदयाचा एकच ठोका ऐकला....

 

सुभग ओंक

तेवढ्यात दहा वर्ष पूर्ण झाली, श्रद्धेच्या ह्या सौभाग्याला.

खरच, काही वर्ष हरवून गेली...ती कुठे गेली कळलंच नाही. एक एक दिवस आठवतो आणि तरीही हा काळ एवढ्या लवकर कसा सरला असा प्रश्न हि पडतो!

६/६/२००२ ला एक सुंदर जीवन-गाठ बांधली गेली आणि तिने आयुष्य समृद्ध केलं, आनंदी बनवलं, सुख जपायला शिकवलं आणि दुःख विसरायला भाग पाडलं. प्रेम तर होतंच...आहेच...पण प्रेमापेक्षा वाढला तो विश्वास, एकमेकांवरचा. जे मनात आहे ते हि गाठ बोलते, जे ओठांवर येते ते मनापासून व भल्यासाठीच...म्हणूनच ही गाठ आता ‘निर्गाठ” झाली आहे, गुंता नाही. सरळ-साधेपणा ह्या गाठीने कधीही सोडला नाही, आणि तेच मला प्रचंड आवडते....

“१८ ऑगस्ट १९९८ ला आला मला फोन आणि फोनवरच्या मुलीला मी विचारलं आपण कोण” ... अशी सुरु झालेली ही परीकथा १० वर्षांच्या विवाह संस्थेत अडकली नाही.... तर बहरली, फुलली आणि ताजी-टवटवीत झाली. “चल, राणी पडू प्रेमात पुन्हा एकदा, नाचू मुक्तपणे ... आनंदाने, जरी झाली आपल्या लग्नाला वर्षे दहा हि, फुटेल नवा बहर प्रेतीला अजूनही” ... असे मनोमन वाटते. १० वर्षात खूप काही मिळाले ... शिक्षण, नोकरी, घर आणि खूप खूप मित्र. अमेरिकेत असे काही आप्तेष्ट जे मनापासून काळजी घेतात ....सहकार्य करतात .... वाट-वाकडी करून मदत करतात. आम्हा दोघांवर ते प्रेम करतात .... आम्हा दोघांमुळेच! मी थोडा व्यावसायिक आहे (कामापुरता बोलणारा) आणि माझी सावली नाते-संबंध जपणारी, मी मृदू-भाषिक (चिडलो नाही तर), थोडा सांभाळून घेणारा मंद वारा तर ती जीव लावणारी, रोख-ठोक कोसळणारी श्रावण सर, म्हणूच दोघेही “हवे-हवे” से वाटतात. आम्ही लोकांना आनंद देतो .... आणि म्हणूनच आम्ही आनंदी राहतो.

हे नाते बळकट झाले ते आम्हाला मिळालेल्या अनुभवांमुळे.... चांगले, वाइट, आनंदी आणि कधी कधी डोळ्यात पाणी आणणारे. अनुभवांची शिदोरी हीच तर खरी कमाई.... त्यातून आपण शिकायचे, शिकवायचे आणि प्रौढ व्हायचे.. आपले नाते दृढ करायचे. त्यातून काय घ्यायचे हे आपण ठरवायचे! “ना ते ....ना हे” .... असे म्हणत... अनुभव गोळा करत ... आपले “ना-ते” समृद्ध करायचे... हीच तर जीवनाची गुरु किल्ली आहे.... विवाह म्हणजे दुसरे काय? जुळवून घ्यायचे, जुळून घ्यायचे, नको ते टाकून द्यायचे, हवे ते आपलेसे करायचे आणि दोघांनी एकत्र एकजुटीने एकात्मतेने जगायचे. विरोध असतील, मतभेद असतील, भांडणं होतील पण त्याचा हेतू नाते “एकसंघ” करायला झाला ... दोन विभिन्न रंग मिसळायला झाला तर किती छान. दोन दगड एकमेकांवर आधलून जर “प्रेमाची ठिणगी” पेटली तर ती कोणाला नकोय?

शेवटी एवढच, असाच राहो हा सहवास, हि वाटचाल जिथे आम्ही दोघेही संगतीने चालतोय आणि एकमेकांची वाट हि पाहतोय... कधी थांबतो, थबकतो, विसावतो आणि पुन्हा चालू लागतो ... एकत्र. मला काही रुचलं नाही तर ते नेमकं तिला सुचतं... आणि तिला काही आवडलं नाही तर ते मला कळतं .... ही डोळ्यातली भावना, ही मनातली बातचीत अशीच सुरु राहावी....कायमची.

दहा वर्ष सरली, मिटली पापणी उघडली,
कडा पाणावल्या, पुन्हा डोळे बंद केले .....
पुढची दहा वर्षे पाहण्यासाठी!

-सुभग ओक

 
आणखी ब्लॉग