Sign In New user? Start here.

असे कसे असतात बाबा, हे कोण मला सांगणार?

असे कसे असतात बाबा, हे कोण मला सांगणार?

 

सुभग ओंक

असे कसे असतात बाबा, हे कोण मला सांगणार?
माया असते भर-भरून, प्रेम असतं अपरंपार,

डोळ्यात तरीही धाक त्यांच्या आणि जीभ धारदार.
आयुष्यभर पैसे साठवण्याची धडपड, भविष्याचा विचार,

जगणं राहून जाते एकीकडे, डोक्यावर जीवनाचा कारभार.
असे कसे असतात बाबा, हे कोण मला सांगणार?

मला नेहेमी वाटतं, “आई” म्हणण्यापेक्षा “बाबा” म्हणणं सोप्पं आहे, तरी लहान बाळाच्या तोंडातून “आई” हा शब्द पहिल्यांदा कसा येतो (निदान असं मी नेहेमीच ऐकलंय). कधी कुठल्या बाबांनी अभिमानानी सांगितलंय, कि बाळाने “बाबा” हा शब्द प्रथम उचारलाय (निदान मी तरी कधी ऐकलं नाही), ह्यातच ‘बाबापण’ लपलय. निस्वार्थ जीवन, केवळ आपल्या कुटुंबासाठी.....

कळ-कळ, तळ-मळ, जीवाची कालवा-कालव होत असते फार,
मुलांचे शिक्षण, त्यांची प्रगती, त्यांचे सुख.... हाच एक संसार.
असे कसे असतात बाबा, हे कोण मला सांगणार?

माझे बाबा त्र्यंबकेश-हून आले. मग त्यांनी मुंबईत शिक्षण घेतले, नोकरीला चिकटले, लग्न केले आणि संसारला जुंपले. नोकरी निमित्त परगावी गेले आणि माझ्या आईने घर सांभाळले व आम्हा मुलांना वाढवले. खरच माझ्या वडिलांची जीवनगाथा हि दोन शब्दात मांडता येईल ... “नोकरी आणि घर”. बाबांचा मी लाडका (माझा मोठा भाऊ हि त्यांना प्रिय आहे .... पण जवळचा असतो एक), तेव्हा माझे लाड पुरवले गेले, कधीही “नको/नाही” असे शब्द कानी नाही पडले माझ्या... तसे फारसे मोठे लाड नव्हतेच आमचे. पण बाबांनी आम्हाला चांगले शिक्षण दिले, चांगल्या मैत्रीचे महत्व समजाविले आणि चांगले संस्कार घडवले. अजूनही रात्री झोपताना त्यांच्या “रामरक्षेची” आठवण येते, त्यांचे “हत्ती रे हत्ती, मैसूर चे मुख्यमंत्री जत्ती” हे बडबड गीत कानी घुमते आणि त्यांची ती ‘गीत रामायणाची” तबकडी आठवते. फार न बोलता, बाबा नुसत्या एका दृष्टीने त्यांना काय हवे आहे ते आमच्या पर्यंत पोहोचवायचे, गोड-गोड बोलून त्यांचे म्हणणे पटवायचे आणि वेळ प्रसंगी आईच्या मार्फत त्यांचे म्हणणेच आमच्या तर्फे करवून घ्यायचे. आम्ही नाटकात कामं करतो हे त्यांना फारसे आवडत नसे. तेव्हा कधीही आमची नाटकं पाहिला स्वताहून आले नाहीत पण प्रोत्साहन मात्र नेहेमी दिले... न बोलता. बाबा चिडायचे, रागवायचे, हसायचे आणि वेळ प्रसंगी हळवे हि व्हायचे ... अजूनही होतात. मी दहावीत बोर्डात आलो तेव्हा त्यांनी सगळ्या कॉलोनीला पेढे वाटले होते... फार अभिमानाने. मला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पारितोषिक मिळाले तेव्हाही त्यांना प्रचंड आनंद झाला होता .... आणि तशीच तृप्ती त्यांना मी अमेरिकेला आलो तेव्हा झाली.... आमच्या ७ पिढ्यात “ओकांकडून” इथे आलेला मी पहिला.... हे त्यांच्यासाठी खूप होतं (जरी ह्याला पूर्ण जबाबदार माझी आई असली तरी)

मुलांची स्वप्ने आणि त्यांच्या इच्छा करण्यासाठी साकार,
अविरत कष्ट, दुप्पट श्रम आणि मनाचा निर्धार.
असे कसे असतात बाबा, हे कोण मला सांगणार?

हल्ली बाबा खूप थकले आहेत. नोकरी सोडून त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरु केला आणि तो जोमाने सुरु आहे. पण वय आणि प्रकृती आता त्यांना साथ करत नाहीत...... आणि ते आमचे ऐकत नाहीत.... बाबा असतातच असे.. आपण त्यांचे सगळे ऐकावे आणि त्यांनी आपले ऐकून सोडून द्यावे. थकलेले असूनही अजून त्यांची जिद्द तशीच आहे, उमेद तशीच आहे ...अजून त्यांना पैसे कमवायचे आहेत आमच्यासाठी, आमच्या पुढच्या पिढी साठी. अजूनही त्यांना आम्हाला सुखी पहायचं आहे, आनंदी पहायचंय ... स्वतःचा आनंद त्यांना अजूनही दिसत नाही.

स्वतःचे दुःखं झाकुन, मुलांचे सुख पहाणार,
त्यांच्यासाठी जगणार ..... त्यांच्यासाठीच मरणार,
असे कसे असतात बाबा, हे कोण मला सांगणार?

हल्ली, मला माझाच खूप राग येतो. मी त्यांना दर आठवड्याला फोन करू शकत नाही...कामा निमित्त (मला माहित आहे कि हे एक फुटकळ कारण आहे) आणि त्यांचा फोन आला, तर मी फार बोलत नाही. का? कारण ....? कारण ....? खरं कारण.... हेच .... कि मी आज इथे, एवढ्या लांब आहे. त्यांना माझी गरज आहे, माझ्या अस्तित्वाची, माझ्या असण्याची, माझ्याशी बोलण्याची आणि मला माझी कामं असतात, वेळ नसतो (इतर गोष्टी खूप असतात) . आयुष्य इतकं अवघड का असतं? इतका पेच का असतो ? आम्हाला जेव्हा वेळ होता, आम्ही जेव्हा घरी एकाच टेबलावर जेवायला बसायचो, तेव्हा “बाबा” कामात गुंग होते, ७:३० च्या बातम्या त्यांना जास्त प्रिय होत्या, सकाळी ६:०० ची इंद्रायणी गाठायची होती.... आणि आता मी इतक्या लांब आलो कि माझी आणि त्यांची वेळ बरोबर उलटी झालीय, ती जमतच नाही..........का असे? हाच प्रश्न सतत त्रस्त करतो मला.

पण ह्या पितृदिनी च्या निमित्ताने मी ठरवलंय कि ... बाबांशी बोलायचं... आयुष्यावर, जगण्यावर.... कशावरही. विषय महत्वाचा नाही .... बोलणं महत्वाचे आहे. तुम्ही हि बोला तुमच्या बाबांशी ... मनमोकळेपणाने, स्वच्छंदपणे अगदी निरोगी गप्पा मारा त्यांच्याशी. त्यांना तुमचा आवाज ऐकायचा असतो. माझी खात्री आहे तुम्हाला खूप बरं वाटेल आणि त्याहून तुमच्या बाबांना!

मी आणि माझे बाबा, दोस्त होणार,
बोलणार एकमेकांशी .... एकमेकांचे ऐकणार
असे कसे असतात बाबा, हे मी त्यांनाच विचारणार?
असेच असतात बाबा, हे, माझे बाबाच मला पटवणार.
असेच असतात बाबा, हे, माझे बाबाच मला दाखवणार.

-सुभग ओक

 
आणखी ब्लॉग