Sign In New user? Start here.

घुटमळतो मी, गोंधळतो मी, स्वतः स्वत:लाच मग कळतो मी.

घुटमळतो मी, गोंधळतो मी, स्वतः स्वत:लाच मग कळतो मी.

 

सुभग ओंक

घुटमळतो मी, गोंधळतो मी, स्वतः स्वत:लाच मग कळतो मी.
गहिवरतो मी, बावरतो मी, स्वतः स्वतःलाच सावरतो मी.

“कसा दोष देऊ मी काट्यास येथे? मला येथली फुले दंशली!”, ह्या ओळी मनात घर करतच असतात आणि तेव्हाच दुसरं गाणं ऐकू येतं “काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फुल हि रुतावे, हा दैव योग आहे!”.... आणि मनात विचारांची घालमेल सुरु होते, मुळात “काटे दुःखच देणार” असं नसतं ...आणि कुठलहि फुल आनंदी ठेवेल ह्याची हि शाश्वती नाही! पण गुलाबाला काटे असतात हे माहित असूनही आपण ते हाती घेतोच आणि कट्याने काटा काढताना आपण सोयीस्कर पणे त्या फुलला विसरतोच! तात्पर्य काय, तर वेळेनुसार अन् काळानुसार “काटा आनंद देतो आणि फुल दुखवू शकते”.

बरं, “दंशणे किवा रुतणे” हे ‘दुःख’ का? वाईट का? अहो, बरेचदा मी असं पाहिलंय की आपलं “दु:ख” हे दुसऱ्याचे “सुख” असते (दुसऱ्याची प्रगती आपल्याला खुपते, त्यांनी नवीन गाडी घेतली की आपण विचारात पडतो, तो अमेरिकेला गेला की आपण देशात खितपत पडलोय असे वाटू लागते, त्याचा पैसा आपल्या डोळ्यात भरतो, तिचे रूप मला बेचैन करते ... एक न दोन). त्यामुळे वरील काव्य-पंक्ती मला बऱ्याच मुद्द्यांवर विचार करायला भाग पडतात! जेवढा मी हा विचार करतो, तेवढा एक ध्यानात येते की आपण जेवढे ह्या सुख-दुःखाच्या पाठी धावू, तेवढे ते अधिकच पिच्च्छा पुरवते. “मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपून जाई, ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई” : अंधाराला भिऊन मी अंधा-या खोलीत बसतो आणि माझ्या पाठी दबा-धरून बसलाय, खोल दरीतला काळोख, आता मी कुठे जाऊ? एका संन्याशाला पडलेलं हे कोडं म्हणजेच जीवनाची गोम आहे.

आयुष्य कसे जगावे, हे मला माहित नाही, कारण ते मी अनुभवतोय, माझ्या पद्धतीने... “केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली” अशी रात्र मला हवी-हवीशी वाटते. डोळे मिटवते, तृप्त करते आणि हरवून जाते. पुन्हा मला ती शोधायचीच नाही कारण मला असं वाटतं की ती मला पुन्हा कधी मिळणारच नाही....तशीच पूर्वी सारखी. ती जेव्हा भेटेल तेव्हा तशीच असू शकते, तीच असू शकत नाही (similar instance, not the same). पुन्हा भेटल्यावर ती मला वेगळा ‘अनुभव’ देईल, कारण ती जरी तशीच असली तरी मी नक्कीच बदलेला असेन.

ह्या विश्वात येताना आपल्याला काही माहित नसतं, आपण कोण? आपले कोण? परके कोण?...पण हळू हळू आपण हि नाती ठरवतो ...आणि तिथेच “काटे नि पुष्प” रुतु लागतात. तिथेच गोंधळ सुरु होतो. कारण ‘चांगले-वाईट समजायला’ लागते. पण हा गोंधळ संपत कधीच नाही: “इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’. का जीवन आपल्याला इतके सतवते? कारण आपणच ते अवघड केले आहे. “साधे-सोप्प” जीवन कोणाचे असते? कोणाचेच नाही ... कुणीही तसा दावा करू नये. माणूस कुठल्यातरी गोष्टीला घाबरतोच, कुठल्यातरी गोष्टीने दुखावतोच. दुःख आणि भीती, माझ्या मते एकमेकांना पूरक आहेत, एक नाही तर दुसरे हि नाही, असे मला वाटते. त्याला कोणता-तरी “काटा” “दंशतोच”....आणि ह्या काट्याचे भय ... त्याला सतत घुटमळत ठेवते, मरत-मरत “जगत” ठेवते. कुणी म्हणेल की ह्या वर उपाय म्हणजे ..... काटा कुठला? आणि पुष्प कुठले? हे तुम्ही ठरवू नका....ते नियतीवर सोडा: “मिळो सुख किवा दुःख, नाही म्हणायचे नाही, नियतीने दान दिले, खाली टाकायचे नाही! पण असे जगायला मोठी तपश्चर्या करावी लागते....माझ्यासारख्या सामान्य माणसाला ते कसे जमायचे?

मग एक सोप्पा मार्ग सापडतो. आपण ह्या जगात एकटे आलो आणि जाताना एकटेच जाणार: जरी सोबत्यांनी मला साथ केली, तरी अंती उरला कुणीही न वाली; हि विरक्ती नाही ... वस्तुस्थिती आहे. आपल्या जन्मापूर्वी आपण जगू शकत नाही .... पण मेल्यावर आपण नक्कीच जगू शकतो.... कारण माणसाला एक अभूतपूर्व शक्ती आहे... “स्मरण शक्ती”. तेव्हा मरत जगायचे की मेल्यावर जगायचे हे तुम्ही ठरवा आणि ह्या प्रश्नाचे उतर तुमचे जगणे थोडे सुसैह्य करू शकते. शेवटी काय: रडतच आलो येताना, पण हसतच जावे जाताना! तेव्हा माणसा हसत रहा, हसवत रहा ... आणि जगत रहा!!

-सुभग ओक

 
आणखी ब्लॉग