Sign In New user? Start here.

माझ्या प्रिय पावसा...

माझ्या प्रिय पावसा...

 

सुभग ओंक

सियाटल मध्ये रोजच पाऊस, तेव्हा इथे पाऊस “पडत” नाही, तो असतो ... सतत... शरत-ऋतूत इथल्या झाडांची पाने गळून पडतात. पण पाऊस नाही थांबत, निसर्ग बदलतो पण पर्जन्य राजा नाही! कधीच तो आपल्याला एकटं सोडून जात नाही. आकाशात ढग नाही पाहिले तर आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, अनोळखी वाटतं. हा ‘पाऊस’ माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे आता; ह्यात आवड-नावड नाही, कंटाळून त्याला पत्करणे नाही किवा कुठलाच मनोभाव नाही. तो असतो अगदी माझ्याच असण्यासारखा....

मी ह्या पावसाशी बोलतो, मनमोकळ्या गप्पा मारतो,
कधी चिडतो, हसतो कधी, कधी रुसतो, त्याला गुपितंही सांगतो.

हा पाऊस ‘माझ्यासाठीच’ पडतोय अशी एक संकल्पना मी करून घेतली आहे. नलेश पाटीलांच्या कवितेत त्यांनी एक सुंदर विचार मांडला होता, की “पाऊस हा ढगांचा संदेश घेऊन येणारा एक निरोप्या आहे” तेव्हा तो निरोप ऐकायचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो. कधी निरोप छोटा पण प्रखर असतो, कधी तो कळायच्या आतच संपतो, कधी कधी मात्र ती एक लांब-लचक गोष्ट असते .... पण नेहमी पाऊस मला काहीतरी नक्की देऊन जातो, सांगून जातो (वर्षाराणी चा तसा उदेश्य तरी असतो)! बघा ना, मेघ दाटतात बरसण्यासाठी, पाऊस कोसळतो नदी भरण्यासाठी, नदी वाहते सागरात मिसळण्यासाठी, सागर साठवतो पाणी वाफेसाठी आणि वाफ घेते भरारी मेघ होण्यासाठी. ह्या निसर्ग चक्रात माणूस कुठे आहे? मग “पाऊस मला आवडत नाही” म्हणणारा तो कोण? हेच मला पाऊस समजावतो. मला अलीकडेच पाऊसाची सुंदर व्याख्या ऐकायला मिळाली....“Don’t feel bad about rain, it’s just another form of pure water!” किती सोप्पी संकल्पना.

तो पाऊस मला अजूनही स्मरतो ...
ज्याच्या बरोबर मी लहानाचा मोठा झालो.

“ये रे ये रे पावसा” ह्या बालगीताने माझी आणि पावसाची ओळख झाली असणार. शाळेत “rainy shoes” आणि “रेनकोट” हे पावसाचे “identifiers” होते. छोटा असताना आई-बाबा मला घेऊन द्यायचे ह्या गोष्टी, पण पुढे नको ती अक्कल आल्यावर त्यातही “fashion statement” येऊ लागली. नखरेल छत्र्या आणि “wind-cheaters” (ह्या गोष्टीला नक्की काय म्हणतात हे मला अजुनहि माहित नाही...) आले. ह्या गोष्टी शोभेच्या असून पावसाशी किवा पावसापासून वाचवण्यासाठी त्यांचा काडीमात्र उपयोग नाही असं मला वाटतं. पावसामुळे शाळेची सुट्टी आठवते, डबक्यात सोडलेल्या होड्या आठवतात, चिखलात रुतलेला बूट आठवतो, शेवाळ्या-वरची घसरण आठवते, दप्तरातली प्लास्टिक बाग आठवते (पुस्तक भिजु नये म्हणून आईने शिवेलेली) आणि ती गोगलगाय-गांडुळे आठवतात.... पावसात तेव्हा मज्जा असायची, भज्जी असायची, खट्याळ पणा होता, पाऊस तेव्हा नकोसा कधीच नव्हता ... अगदी ४ फुट पाण्यात चालत असताना हि!

वय वाढलं आणि पावसाशी असलेलं नातं हि बदललं. आता पावसाचा राग येऊ लागला, रस्त्यावरचे खड्डे दिसू लागले, चीक-चीक जाणवू लागली, होणारा उशीर छळू लागला आणि पाऊस नकोसा झाला. मग पावसानेही त्यांचे “सांगणे” बदलले आणि “रोमांस” काय असतो ते शिकवले.... ती उत्कंठा, ते उचंबळून येणे, तो हृदयाचा ठोका आणि तो स्पर्श जाणवू लागला. गाला-वरचे थेंब कसंसं करू लागले, ती ओली चिंब प्रतिमा मनात रेंगाळू लागली, मिठीला सौंदर्य पावसाने दिले, प्रेमाची कळ-कळ वर्षाराणीने दिली. पुन्हा पाऊस हवासा झाला, मनमुराद अनुभवण्यासाठी .... पूर्वी पेक्षा जास्त कारण आता आम्ही तिघे होतो .... मी, ती आणि पाऊस!

पण प्रेमात माणूस पागल होतो. मला तिला ‘पावसा’बरोबर शेअर करणे पसंत नव्हते आणि पुन्हा एकदा माझे पावसाशी नाते बदलले.... ती जवळ आली .... पाऊस दुरावला. पाऊस हा कंटाळवाणी रिप-रिप वाटू लागला. माझ्या अवतीभवतीच्या इतर गोष्टीं-प्रमाणेच मी पावसावर हि चिडायला लागलो , रागवायला लागलो, मला “Vitamin D” मिळत नाही म्हणून कुण-कुण करु लागलो (जशी काही बाकीची vitamins माझ्यात दुथडी भरून वाहतच होती)... आणि काहीही झाले की पावसाला दोष देऊ लागलो. पाऊस शहाणा आहे, कारण तो गप्प बसून असायचा. मुन्नाभाईच्या “गांधीगिरी” सारखा नुसता सहन करायचा ... आणि एकदा त्याने तोंड उघडले (२६/७ ला). बस, माझे तोंड गप्पं, कायमचे. मी भारतात नव्हतो ... पण आई-बाबा-भाऊ-वाहिनी ह्यांची काळजी आणि सामोरे आलेले दृश्य माझ्यासाठी पुरेसे होते, मला जागं करायला. पाऊस काय आहे? हे शिकवायला.

सियाटल मध्ये राहून एखाद्या दोस्ताशी दुष्मनी करणे परवडेल पण पावसाची नाही, तो काही धोकादायक नाही पण तो सारखाच सगळीकडे असतो आणि आपण त्याला टाळू शकत नाही, हे महत्वाचे. म्हणून मी पावसालाच माझा मित्र करून घेतला आहे. तो मला चार समजुतीच्या गोष्टी सांगतो, मी त्याला माझे प्रश्न विचारतो, तो त्याची उत्तर देतो. तो माझ्यासाठीच येतो असं मला आता वाटतं. पावसाने मला खूप काही शिकवलं आहे. मी ऋणी आहे त्याचा. प्रेम, आपुलकी, कधी कड-कडात, तर कधी रिम-झिम शालीनता, कधी बरसणं, कधी सोसणं, कधी माया तर कधी शिक्षा. पावसाने मला वाहणं शिकवलं... आणि मुख्य म्हणजे पावसाने मला “मुक्तपणे भिजायला” शिकवलं, छत्री उडून गेल्यावर जसे बेभानपणे आपण ओले-चिंब होतो ...तसच चिंतांची,भयाची आणि दुखाची छत्री उडवून स्वच्छंदपणे जगायला शिकवलं.

आता पाऊस माझा मित्र, सखा आणि गुरु....
शिवाय माझ्या बायकोचा तो प्रिय... हे कसा मी विसरू.
प्रिय पावसा, असाच रहा माझा सोबती, आयुष्यभर... इतकच.

-सुभग ओक

 
आणखी ब्लॉग