Sign In New user? Start here.

कशावरून ? विनाकारण....

कशावरून ? विनाकारण....

 

सुभग ओंक

ती : अलीकडे तुझे माझ्यावर प्रेमच नाही उरले ....
तो : कशावरून?
ती : बघ, बघ ... आता हे हि तुला मी सांगू? तुला ते समजत देखील नाही ....
तो : कशावरून?
ती : काल मी इतकी दुखी होते...कळले सुद्धा नाही तुला.
तो : कशावरून?
ती : पूर्ण दिवस वाईट वाटत होतं मला, पण तुला त्याचे काय?
तो : कशावरून?
ती : मी पाहत होते ना ... तू कामात गर्क, माझ्याकडे ढुंकून सुद्धा पहिले नाहीस दिवसभर.... माझच चुकले?
तो : कशावरून?
ती : मला वाटले होते की येशील विचारपूस करायला, पण नाही आलास, तुला माझी काळजीच नाही.
तो : कशावरून?
ती : लग्नाआधी माझ्या अवतीभवती गोंडा घालायचास, स्वतःहून ... चांगलं इम्प्रेशन पाडलं होतस माझ्यावर ... त्यावरच भुलले आणि फसले.
तो : कशावरून?
ती : फसले नाही का? तरी मला आई-बाबा म्हणत होते, एवढी घाई करू नकोस. ह्या मुलाचे काही खरे नाही ...
तो : कशावरून?
ती : एवढं प्रेम करतोय, एवढा गुलुगुलू बोलतोय .... सगळा वर-वरचं असणार. अशी मुलं दिसतात का कुठे? अशी मुलं असतात का कुठे? आणि love-marriage मध्ये डिवोर्स चे प्रमाण जास्तच असते...
तो : कशावरून?
ती : ते पण टी.व्ही बघतात. आमच्याकडे १९८६ पासून कलर टी.व्ही आहे ... एशिआड नंतर घेतला...मीच हट्ट धरला ...
तो : कशावरून?
ती : माझ्या मैत्रिणी कडे सुद्धा होता कलर टी.व्ही... प्राची कडे ... मग मला पण हवा होता... घेतला बाबांनी. तिचा प्रेम-विवाह आणि माझं तुझ्यावर होतं प्रेम ... मग मी हि परत हट्ट धरला.
तो : कशावरून?
ती : तुझ्याशीच लग्न करण्यावरून... बाबांनी लगेच परवानगी दिली. त्याना मी धमकीच दिली होती...
तो : कशावरून?
ती : प्राची सारखी पळून जाईन .....
तो : कशावरून?
ती : स्कुटर वरून .... मग लगेच तयार झाले बाबा आपल्या लग्नाला.
तो : कशावरून?
ती : २ महिन्यात साखरपुडा आणि लगेच लग्न. पण लग्ना नंतर हे असं.... अगदी प्राची सारखं... तिचा हि डिवोर्स झाला.
तो : कशावरून?
ती : ती ambitious आहे...आणि तो हि... दोघे कामा निमित्त सारखे प्रवासा साठी बाहेर ....
तो : कशावरून?
ती : विमानावरून .... कधी तो सिंगापोर तर ती ऑस्ट्रेलिया... कधी तो लंडन तर ती न्यू योर्क... कसा होणार संसार. बघ बघ हे सगळा अगदी आपल्या सारखच आहे.....
तो : कशावरून?
ती : तू असतोस ऑफिस मध्ये, मी स्कूल मध्ये ... मग तू घरी laptop मधे, मी स्वयंपाक घरात ... तिकडे तू पेटी वाजवत गात बसणार, इकडे मी नेल-पोलिश लावत बसणार.... तू बाहेर नाटकाची तालीम करणार आणि मी दुसरीकडे डांस बसवणार. मला टेन्शन आलय ...
तो : कशावरून?
ती : आपल्यावरून... आपलं हि प्राची सारखच होणार
तो : कशावरून?
ती : आजवर तिचे आणि माझे आयुष्य एक सारखेच चालेलं आहे .... तीचा आणि माझा जन्म एकाच महिन्यात, एकच शाळा, एकच वर्ग, ती सायकलने शाळेला जायची ७ वाजता ... आणि मी हि ...
तो : कशावरून?
ती : त्याच सायकलवरून ... डबल सीट. तिचा प्रेम-विवाह, माझाही. ती ambitious आणि मी हि ...
तो : कशावरून?
ती : मी केवढं काय काय करते....सोशल वर्क, घरची अवरा-आवरी, बायकिंग, शोप्पिंग, सोशिअलाय-जिंग .. दमून दमून जाते रात्री येते तेव्हा ....
तो : कशावरून?
ती : कामा-वरून .... येते आणि मग स्वयंपाक ... मग जेवण की झोप. बोलायला सुद्धा वेळ नसतो आणि मग मलाच वाईट वाटतं.
तो : कशावरून?
ती : एका ठिकाणी राहत असून सुद्धा आपण भेटतच नाही .... बोलतच नाही ....
तो : कशावरून?
ती : पूर्वी आठवतं... आपल्याला बोलायला “topic” लागायचाच नाही ..... मी “कशावरूनही” बोलत बसायची ...आणि तू “कशावरूनही” ऐकत बसायचास........
तो : कशावरून?
ती : पार्क च्या बाकावरून, समुद्राच्या वाळूवरून, ट्रेन च्या स्टेशन वरून , कॉलेजच्या कट्ट्यावरून...अगदी कशावरही बसून..... आठवतं एकदा मी गाणं सुद्धा म्हंटल होतं?
तो : कशावरून?
ती : रेडिओ वरून .... तू मला तुझ्या घरी म्हणायला लावलं होतस... सगळे मला अजून चिडवतात...
तो : कशावरून?
ती : मी अंगाई म्हंटली होती ना .... “लिंबोणीच्या झाडा मागे, चंद्र झोपला ग बाई”... आणि तू झोपला होतास. मला पूर्ण यायचं ते गाणं.... आता विसरले मी ...
तो : कशावरून?
ती : बरं ... म्हणू आता... नको, नाहीच म्हणत नाहीतर पुन्हा चीड्शील....
तो : कशावरून?
ती : सूर लागत नाही.... हल्ली पेटी वाजवतोस न तू . माझी कला तर मारून टाकलीस तू ...
तो : कशावरून?
ती : कित्ती वेळा तुला सांगते मी... की मला घेऊन बस पेटी वाजवायला ... मी गाते तू वाजव ... काल पण माझ्या मनात हेच होतं, पण तू एकटाच बसलाच “दार लावून”... अलीकडे तुझे माझ्यावर प्रेमच नाही उरले ....
तो : कशावरून?

-सुभग ओक

 
आणखी ब्लॉग