Sign In New user? Start here.

श्वास उच्छ्वास विश्वास अन निश्वास....

श्वास उच्छ्वास विश्वास अन निश्वास....

 

सुभग ओंक

देह जगतो संपतो, जीव श्वास-उच्छ्वास, इथे येणे आणि जाणे, त्रास मानायचा नाही..... जगणं साधं-सोप्पं केलं की खूप चांगल्या गोष्टी घडत जातात. स्वतःवर विश्वास हवा, काहीतरी करण्याची जिद्द हवी आणि अपयश हसत स्वीकारण्याची तयारी हवी. लोकं काय म्हणतायत ह्या पेक्षा आपलं मन काय म्हणतय? आपल्या मनाला काय हवय हे महत्वाचे. बऱ्याच वेळी आपल्याला तेच नेमकं माहित नसतं आणि आपण विनाकारण त्रास करून घेतो आणि दुसऱ्यालाही त्रास देतो. बरं अपयश येणार हे माहित असूनही आपण ते पचवू शकत नाही .... त्यला घाबरतो आणि म्हणूनच आपण आपली पावलं मोजून मापून टाकतो. त्यामुळे बऱ्याच संधी आपल्या समोरून जातात आणि आपण त्यांच्या कडे ढुंकून हि पाहत नाही... केवळ भीती पोटी.

सायकल चालवताना आपण पडणार, पोहोताना हात-पाय मारल्याशिवाय आपण बुडणार हे माहित असूनही आपण त्या गोष्टी करतोच, कारण लहानपणी भय कमी असतं किवा श्वास-उच्छ्वासा साराखेच त्या गोष्टीही नैसर्गिक आहेत, असे भासवले जाते. आई मला म्हणायची "तुला पोहायला येत नाही .... सायकल चालवायला येत नाही....अरे असं कसं चालेल..." तेव्हा असं वाटे कि त्या गोष्टी जगण्या-इतक्याच महत्वाच्या आहेत. ती सांगण्याची पद्धत खूप जबर होती, परिणामकारक होती.

अजून एक गोष्टं मला स्वतःला नेहेमी वाटे "त्याला जे जमतं, ते मला का जमत नाही"..... आयुष्यात बऱ्याच गोष्टी मी "प्रयत्न" म्हणूनच केल्या. काही जमल्या काही फसल्या.

तो कसा स्टेजवर उभं-राहून बोलू शकतो, "मला हि जमायला पाहिजे". तो कसा "इंग्रजी इतकं चांगलं बोलू शकतो", तो अभिनय कसा करतो, तो गाणी कशी कॉम्पोस करतो.. मला प्रयत्न तरी केलाच पाहिजे, असे वाटे. एक प्रसंग मला अजूनही आठवतो: दहावीत मी शाळेचे नाटक बसवले... त्याला १ले पारितोषिक मिळाले. माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने मला बोलावले आणि त्या मला म्हणाल्या "तू दहावीत आहेस. माहिते आहे ना"... मी म्हणालो "हो, मी अभ्यास करतोय, पण मी काही हुशार नाही तेव्हा मला माहित आहे मला किती मार्क्स मिळतील". तेव्हा त्या म्हणाल्या होत्या... "सुभग, तू नाटकं बसवतोस, तुझ्या मित्रांना शिकवतोस, त्यांना घडवतोस आणि ते नाटक चांगले व्हावे म्हणून अथक परिश्रम घेतोस.... मग स्वतःचाच बाबतीत असे नकारात्मक धोरण का? तुला माहित आहे तू काय आहेस हे चांगलं आहे, पण तुला तुझे मित्र हि माहित आहेत. ते जे करतात ते तुला का जमू नये? अथक प्रयत्न कर, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि एक महत्वाचे, तुझे मित्र जसा अभ्यास करतात... तो बघ, त्याचे निरीक्षण कर, तुझी पद्धत ठरव आणि जे त्यांना जमतं ते तुला जमायला काहीच हरकत नाही?" झालं..... डोक्यात किडा गेला... जे त्यांना जमतं ते मला का नाही? शेवटी मी बोर्डात आलो आणि माझा माझ्यावरचाच विश्वास बळावला.

नाटकात एन्ट्रीहि अशीच... जे माझ्या भावाला जमतं, ते मला हि जमलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करायला हवा. अमेरीकला आलो तो हि मित्र आले म्हणून ... त्यांना जमलं मग मला का नाही .ह्याच विचाराने. मला खूप आधी "सोफ्ट-वेयर कोडींग" यायचे नाही ... पण ते येत नाही म्हणूनच ‘का येत नाही?’, ह्याच्या शोध घेत-घेत मायक्रोसोफ्ट मध्ये सिनीयर डेवलपर हि झालो. पण नक्की कोण मी? जे लोकं करतात त्यांचे अनुकरण करणारा? मला माझे असे काही अस्तित्व नाहीच का? मी कोण? कोण मी? तर मी ... लोकांच्या चांगल्या गोष्टींचे निरीक्षण करणारा आणि त्यातल्या मला जमतील अश्या गोष्टी प्रयत्नपूर्वक करू पाहणारा एक सुखी इसम. ‘सुखी’ कारण मला अपयशाच्या दु:खापेक्षा माझ्या प्रयत्नाचे सुख जास्त मोलाचे वाटते.

मला काय येतं ? हा कठीण प्रश्न आहे. आज पर्यंत बऱ्याच गोष्टी केल्या चांगल्या-वाईट/यशस्वी-अयशस्वी ... पण आज हि आपल्याला नक्की काय येतं ह्या प्रश्नाचे नेमकं उत्तर नाही. म्हणून कैक वेळी "Jack of all trades, master of none" असा मी झालोय असच वाटते. म्हणून नैसार्गिक राहूनही, स्वतःवर अढळ विश्वास असूनही.... अजून निश्चिंत निश्वास सोडता येत नाही आणि ते चांगलच आहे.

अजून खूप काही करायचे आहे. माझ्यासठी, माझ्यांसाठी, समाजासाठी. नवीन काय करू ह्याच विचारात असतो, त्रास न करता जगतो, आनंद पसरवतो आणि नवीन ध्येय शोधत फिरतो, कुठेतरी पूर्ण होण्यासाठी. पण मला हे माहित आहे कि "पूर्णत्व" कुणालाच प्राप्त होत नाही. ज्यांना तसं वाटते तो त्यांचा भ्रम असतो, निश्चिंत निश्वास कोणालाच सोडता येत नाही कारण त्या निश्वासातही श्वास दडलेला आहे!

सुभग

 
आणखी ब्लॉग