Sign In New user? Start here.

आई, एक interesting formula.

आई, एक interesting formula.

 

सुभग ओंक

मला जेव्हापासून जाण आली, तेव्हापासून मी माझ्या आईला कायम काम करताना पाहतोय. लहानपणी मला वाटे कि माझी आई कधी झोपतच नाही. सकाळी मी उठायच्या आधी तीचा चहा-नाश्ता तयार असायचा, अंघोळ व देवपूजा झालेली असायची आणि बाबांचा डब्बा भरलेला असायचा. माझी "५ मिनिटे" काही संपलेली नसायची, मी अजून अंथरुणात असायचो आणि आईचे पालुपद चालूच असायचे.... दुसरी कडे ती बाबांना सकाळची पोळीभाजी वाढत असायची, भावाचे कपडे कपाटातून काढत असायची, भाजीवाल्याशी तिची हुज्जत चालूच असायची आणि रेडिओच्या सकाळच्या बातम्यांचे श्रवण चालूच असायचे. शेवटी माझं पांघरूण ती ओढायची (मुंबईच्या गरमीत सुद्धा, फुल पंख्या-खाली, डोक्यावरून पांघरूण घेऊनच झोपायचो मी) आणि डोळे उघडताच माझ्या दिवसाची सुरवात तिच्या त्या निर्मळ-सुमुखी दर्शनाने व्हायची. एवढी कामं करून ही एवढी शांत, एवढी प्रसन्न, एवढी समाधानी पण तितकीच आतुर, तितकीच उत्कट आणि तितकीच घाई-गडबडीत.... माझी आई! तिला बघताच, आजचा दिवस, नेहेमीसारखा, सुंदर असणार हे कळून जायचे. उठल्यावर सर्वात प्रथम देवाचे किवा चांगल्या गोष्टीचे दर्शन व्हावे .... लहानपणी आपसूक ते सुख, ते पुण्य लाभायचे... आता ते सुख नाही. अमेरिकेत आई नाही, बायको आहे पण ती कामा निमित्त लवकर घराबाहेर पडते ....आणि खरं सांगतो.... आई, ती आईच.

माझी आई, House-wife असूनही आम्हा सगळ्यां-पेक्षा जास्त काम करायची दिवसभरात (बॅंक-ची कामे, खरेदी, भाजी-निवडणे, घर-काम, शिवणकाम एक-ना-दोन)...पुन्हा रात्री सर्वात थकलेली असूनही ती ताजी-तवानी! माझा अभ्यास घ्यायला, मला नाटकाची आवड निर्माण करायला, शाळेत माझी भाषणं लिहून द्यायला, माझं पाठांतर घ्यायला, मी दौऱ्यांवर असताना माझ्या मित्रांकडून अभ्यास उतरवून घ्यायला तिला वागलीच स्फूर्ती येत असे. मणीभवन इथे गांधीजींवर भाषण करून बाहेर taxi मध्ये माझ्या नंतरच्या प्रयोगाचे कपडे घेऊन उभी असणारी माझी आई मला अजून आठवते. त्या taxi मध्ये मी कपडे बदलून प्रयोगाला उभा राहिलो होतो. हि उर्मी, उत्कटता, हि जिद्द, हि तळमळ तिच्यात कुठून आली देव जाणे. सदैव माझ्या पाठीशी उभी राहणारी, ती माझी आई माझ्या प्रयोगाला/कार्येक्रमाला मात्र, न-सांगता येऊन बसायची आणि नंतर तिचे परीक्षण आम्हाला कळू द्यायची. तिची तऱ्हाच वेगळी होती, पण आज मला कळतंय ती असं का करायची, तिला आमच्यावर नसतं दडपण टाकायचे नव्हतं आणि मुळात एका सामान्य प्रेक्षकाची प्रतिक म्हणून ती आम्हाला तिच्या प्रतिक्रिया देऊ पाहत होती.

माझ्या अमेरिकाला येण्या मागे तीच....तिनेच सगळी माहिती गोळा केली, विसा आणि अन्य कागद पत्र तिनेच तयार केले. मला पूर्ण माहित आहे ... कि मी इथे अमेरिकेत आलो, नोकरी करतोय, १० वर्ष राहिलो हे सगळं घडलं केवळ तिच्याच पुण्याई मुळे...... एरवी मी एवढा हुशार ही नाही (अहो, अमेरिकेत येण्या पूर्वी मला साधी गाडीही चालवता येत नसे... तिनेच मला मोटर-ट्रेनिंगस्कूल ला घातले आणि त्याकरिता सकाळी उठेवले). आज मी जो काही आहे... तो केवळ तिच्याच मुळे....

मला माहित आहे, कि "आई" ह्या विषयावर वर मी बरंच काही लिहू शकतो पण खरं म्हणजे काही लिहायची गरज हि नाही..... कारण "आई" हे रसायन असंच काही आहे कि त्याचा formula फक्त देवालाच माहित आहे. “आईपण” ठरवून बनवता येत नाही पण जगातल्या प्रत्येकावर त्याचा परिणाम होतो.... कारण "आई ही आई असते". आपण फक्त "आई-पणाला" वंदन करू शकतो..... आणि त्याच्याच हा प्रामाणिक प्रयत्न. मित्रहो, आज "आई" जर तुमच्या जवळ असेल तर तिला कडकडून मिठी मारा, तिच्या अविरत कष्टासाठी तीला प्रणाम करा. तिचे स्मरण करा! आज मी अमेरिकेतून माझ्या आईला फोन केला ... तिला वंदन केले, तिला "thanks" म्हणालो.... अपेक्षित उत्तर आले .... "अरे काय वेडा आहेस का, आईचे कधी पासून आभार मानू लागलास?"....मनातल्या मनात म्हंटल मी "US ला आल्या पासून". मी जेव्हा भारतात होतो... तेव्हा मला वेळच नव्हता....काळजीच नव्हती, "आईची" ओळख नव्हती, कारण ती सदैव समोर होती....दिसत होती पण कळत नव्हती..... आता कळू लागली आहे.

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी...... हेच खरं. जगातल्या सगळ्या “मातांना” माझा सादर प्रणाम!

- सुभग ओक

 
आणखी ब्लॉग