Sign In New user? Start here.

अटळ हा बदल, अचल हा बदल, सतत हा बदल, बदल हा बदल.

अटळ हा बदल, अचल हा बदल, सतत हा बदल, बदल हा बदल.

 

सुभग ओंक

माझा एक मित्र आज सियाटल सोडून ‘बे अरिया’ ला गेला. त्याला एक चांगला जॉब मिळाला. १० वर्ष सियाटल मध्ये काढल्यावर, घर सोडून, बायको-मुलाला घेऊन तो आज रवाना झाला. आपला मित्र आपल्याला सोडून चालला ह्याची खंत होती पण मग मनात विचार आला कि आयुष्यात असे हे बदल यायचेच.... काही चांगले, काही कटू, काही लादलेले आणि काही आपण स्वताहून ओढवून घेतलेले, पण सगळेच आपल्याला काही न काही शिकवणारे.

आयुष्य म्हटलं कि बदल आलेच. आपला जन्म हाच एक मोठा बदल असतो नाही का? ९ महिने आईच्या पोटात सुखरूप आणि मस्त झोपून आपण पहिल्यांदा डोळे उघडतो आणि हे विश्व आपल्या कडे आवासून बघत असतं, हे विश्व, त्यातले बदल आणि त्यावर आपल्या प्रतिक्रियांचा खेळ सुरु होतो. लहानपणी बदलत्या विश्वाला आपण अगदी सहजतेने सामोरे जातो ... ह्या बदलत्या गोष्टींना अगदी लगेच स्वीकारतो. पण जस-जसे आपण मोठे होतो, आपल्याला जग कळू लागते, नात्यांच्या गुंत्यात आपण अडकू लागतो तस-तसे आपण स्थिरावतो .... आणि मग बदल आपल्याला नकोसा वाटतो.

पण बदल अटळ आहे. माझे बाबा जर त्र्यम्बक सोडून मुंबईत आले नसते, तर कदाचित मी त्र्यम्बकेश्वरीच वाढलो असतो. मुंबई काय असते, कदाचित मला कळलेच नसते? माझी शाळा, माझे मित्र, माझे महा-विद्यालय हे सगळे बदल माझ्या पूर्ण आयुष्याला, माझ्या आजच्या अस्तित्वाला पोषक आणि पूरक आहेत. मी जेव्हा आई-वडिलांना सोडून अमेरिकेत आलो, तेव्हा सुद्धा असाच बदल माझ्या आयुष्यात आला, फार मोठा बदल. लग्न झाले, तेव्हा माझी बायको मला नेहेमी म्हणायची “आपण परत जाऊ ना, मला नाही करमत इथे, अमेरिकेत”.... मी तिला म्हणायचो.... “आयुष्यात इतका मोठा निर्णय घेतला आहे, इतका मोठा बदल पत्करला आहे... तर थोडे अनुभव तर घेऊ, -थोडे अनुभव तर देऊ .... थोडे शिकू आणि मग बघू”.... आणि सुरु झाला “x + १” syndrome! १० वर्ष झाली, बायको रुळली, आयुष्यातल्या मोठ्या बदला तितक्याच धैर्याने सामोरी गेली आणि “बदलली”. आता पुन्हा एक बदल (भारतात परत जाण्याचा...)सध्या तरी नकोसा वाटतो.

पण बदल हा होतच असतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. १९९६ मध्ये इंजिनियर च्या दुसऱ्या वर्षी पहिल्यांदा कॉम्पुटर हाताळला आणि १५ वर्षांनी कॉम्पुटर शिवाय जगाची मी कल्पना हि करू शकत नाही, US मध्ये आलो तेव्हा ५५ सेंट्स ला भारतात बोलायचो... आज १ सेंट लागतो, स्मार्ट फोन आले, I-PAD आले आणि आज मी आई-बाबांना “skype” वर बघू शकतो, जणू माझ्या घरी “साता-समुद्रा पलीकडचे दाखवणारी एक खिडकीच” आहे! गेल्या २० वर्षात technology मधले बदल अवाक करणारे आहेत.... आणि मी त्यातला एक आहे, ते अनुभवणारा एक आहे, त्यात माझे थोडे योगदान हि आहे (मायक्रोसोफ्ट मधे काम करत असल्यामुळे) .... हे माझे भाग्यच आहे.

बदल, अवघड असतो. आपल्याला खूप घाबरवून सोडतो, पण त्याच वेळी तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो आणि बहुतौंशी योग्य निर्णय घ्यायाला प्रवृत्त करतो, धाडसी बनवतो. बदल अचल आहे, दिवा-रात्रीच्या चक्रासारखा, ऋतू सारखा ... निसर्गासारखा.

ह्या ‘बदलाला’ हसत स्वीकाराय असतं .... आयुष्य समृद्ध करायच असतं....हेच तर खरं जीवनचे रहस्य आहे! मी आजच एक छानसं वाक्य वाचलं - “Change is hard. Change is disorienting. Change can slow you down. But at the same time, change is inevitable and the only constant thing is change”.

-सुभग ओक

 
आणखी ब्लॉग