Sign In New user? Start here.

कला की निर्विकार जीवन की प्रेरणा की ‘फेक-लूक’ की समृद्धी की सुख = आयुष्य?

कला की निर्विकार जीवन की प्रेरणा की ‘फेक-लूक’ की समृद्धी की सुख = आयुष्य?

 

सुभग ओंक

गेल्या आठवड्यात मी “कला” दशक महोत्सवाला कॅलिफोर्निया येथे गेलो होतो. माझ्या “माणूस घर” ह्या समीप रंगमंच्यावर सादर होणा-या एकांकिकेसाठी. शुक्रवारी पोहोचलो (सियाटलहून) आणि एखाद्या अस्सल रंग-कर्मी सारखा “कला” आयोजकांना मदत करायला धावलो. नाटकात काम करणे धम्माल असते, पण त्याहूनही आनंददायक असते नाटक घडवणे....ते उभं करणे....नाटकाच्या मागे उभं राहणे. हे करत असताना, मला माझे जुने दिवस आठवले. सेट्स लावणे, रंगभूषा/वेशभूषा साकारणे आणि ते करत असताना प्रयोगशील राहणे, मी “कलात्मक” झालो. “कले” मुळे बरेच मुद्दे पुन्हा मला डिवचून गेले.

इथे अमेरिकेत, नाट्यकलेची जोपासना बक्षिसासाठी किंवा पारितोषिकासाठी मी करत नाही.... ते मिळाले तर आनंदच आहे, पण तो हेतू नाही. आपली संस्कृती जपण्याचा, जोपासण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न असतो. “आम्ही आमची भोळी-भाबडी कला मांडतो” , “न-राहून करतो, प्रामाणिक पणे करतो”, एवढं मात्र खरं! भारतात असताना किंवा इथे अमेरिकेत आल्यावर सुद्धा, नाट्यकलेवर माझी “उपजीविका” अवलंबून नाही, त्याच मुळे माझा प्रयत्न प्रामाणिक आहे. आजही इथे मी “$५” तिकीट लावून नाटक दाखवतो.... लोकांनी प्रयत्नाला दाद द्यावी हा आणि फक्त हाच हेतू. प्रयत्न उच्च दर्ज्याचाच असतो...निदान प्रयत्न तरी तसाच असतो. शिवाय ह्या समाजाला मी काही देणं लागतो हि भावना हि असते....जीवन निर्विकार आहे, हि संकल्पना माझ्यासाठी मोठी आहे, फार मोठी.... मी छोटा आहे. समाज मला खूप काही देतो, जीवन मला प्रचंड समृद्ध करते...मग मी हि ह्या घटकांना का काही देऊ नये? “मी देणारा कोण?” असा विचार येतो...

मी दिलेले लोक घेतील का? त्यांना ते रुचेल का? ..... असे प्रश्न मलाहि पडतात. पण म्हटलेच आहे “कीर्तनकाराने कीर्तन करत जावे, कोणी ऐकायला आहे की नाही ह्याचा विचार करू नये”! मला जे आवडेल ते मी करतो, त्याच्या बदल्यात मला काही नकोय. पण शाबासकी, बक्षिस मिळाले तर चांगलेच आहे की.... ते नको म्हणण्या इतका मी मोठा नाही. मान्य की आयुष्य खूप मोठं आहे.... घटनांच्या पावसाची सर आहे, आपण भिजायचे की आडोश्याला उभं रहायचं, हे आपण ठरवायचं. पण एकदा तरी ओलं झाल्या शिवाय, ते कसं ठरवता येणार? मी संवेदशील आहे, घटना मला हलवतात.... मला खेळवतात .... मला अस्वस्थ करतात आणि म्हणूनच मी एक कलाकार आहे असं मला वाटतं. त्या घटनांचा माझ्यावर परिणाम होतो.... म्हणून मी ब्लॉग लिहितो, नाटक लिहितो, नाटक बसवतो .... काहीतरी “निर्माण” करतो! प्रेरणा हा प्रतिभेचा केंद्रबिंदू आहे, स्फूर्ती हि कीर्तीची कळ-कळ आहे आणि “संवेदना” हि कलाकाराची गरज आहे असं मला वाटतं. ‘काही’ मिळण्यासाठी ‘काही’ करू नका .... पण ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवा...साधन आणि साध्य ह्यात फरक असतो ..... नाजूक आणि अवघड असा.

मला आवडतं म्हणून मी नाटक करत असलो तरी त्याचा परिणाम मला महत्वाचा आहे. “समीप” म्हणजे परिणाम-कारक. नाटक हे, प्रेक्षक आणि कलाकार ह्यांची भिंत फोंडून झाले पाहिजे.... “फेक” वाटले तर ते फसलेच. लोकांना काय वाटते हे जरी कलाकाराला ठरवता येत नसले तरी कलाकाराला काय म्हणायचे आहे ह्यावर त्याचे नियंत्रण असायला हवे. “माणूस घर” हे अवघड नाटक: नवरा-बायको ह्यांच्या आत-बाहेर चालणा-या भिन्न भावनांचे ते दर्शन! लोकांना ते आवडले.... परिणाम कारक झाले.... “माझ्या बायकोला, तुमच्या मुस्काटात मारावीशी वाटत होती”.... हि प्रतिक्रिया खूप काही बोलून गेली. जर मी निर्विकार असतो, “भावनांनी” त्रस्त झालो नाही, तर अशी अवघड भूमिका, “समीप” ला सादर करणे अशक्य होते, ते पोहोचवणे त्याहून कठीण होते.

आम्ही “फेक” नाही, आम्ही “प्रामाणिक” आहोत. नोकरी धंदा सांभाळून करतो म्हणून आम्ही “कमी दर्ज्याचे फेक” प्रयोग सादर करतो, असे आरोप केले जातात. लोकांच्या प्रतिक्रियेला लेखकाच्या वाक्याचा प्रभाव म्हणून ओळखलं जातं... त्यावेळी वाईट वाटतं. अमेरिकेत राहून आम्ही आमची कला आत्मीयतेने, मनोभावे आणि कळ-कळीने सादर करतो. ‘कला’ नुसती जोपासतच नाही तर ती समृद्ध हि करतो ...तोच तर ध्यास आहे ... तीच तर उमेद आहे! प्रयोग पाहून “उथळ” प्रतिक्रिया येणारच .... पण त्यांच्या मागचे कारण हि शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो.

सर्वात महत्वाचे म्हणजे आनंद! आपण जे करतो ते आपल्याला “आनंद” देतं का? समृद्ध करतं का? सुखी करतं का? “सुख म्हणजे नक्की काय असते?” ... तर जे तुम्हाला जगायला प्रवृत्त करतं, ते सुख. मझ्या मते (सोप्या भाषेत) “झोपताना, उद्या उठायला तुम्ही उत्सुक असल्यास तुम्ही सुखी आहात!” ‘कले’च्या निमित्ताने थोडा “philosophical” झालो .... बरं असतं कधी कधी ते!

-सुभग ओक

आणखी ब्लॉग